चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी पुणे, 5 जून : शिरूर लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी देखील दावा केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शिरूरमधून कोणाला संधी देणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र आता शिरूर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांनाच संधी मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार आज पुण्यात पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र दुसरीकडे विलास लांडे हे अद्यापही आपल्या दाव्यावर ठाम आहेत. त्यांच्याकडून शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर दावा करण्यात आला आहे. विलास लांडे यांनी आपल्या वाढदिवशी मतदारसंघात पोस्टरच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन केलं होतं. लांडे यांनी शक्तिप्रदर्शन करत एकप्रकारे या जागेवर दावाच केला होता. मात्र आता शरद पवार यांनी अमोल कोल्हेंच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती समोर आल्यानंतरही ते आपल्या दाव्यावर ठाम आहेत. राष्ट्रवादीची बैठक दरम्यान दुसरीकडे येत्या 9 जून रोजी राष्ट्रवादीचा वर्धापन दिन आहे. हा वर्धापन दिन अहमदनगरला साजरा होणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा आणि नियोजनासाठी पुणे ग्रामीणची आढावा बैठक आज बोलावण्यात आली होती. या बैठकीला राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.