पुणे, 8 फेब्रुवारी : भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने चिंचवड विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली असून, येत्या 26 फ्रेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. चिंचवडमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजप उमेदवार अश्विनी जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे आणि ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्यामध्ये ही लढत असणार आहे. चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले हे तीनही उमेदवार कोट्यधीश असल्याची माहिती समोर आली आहे. उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या शपथ पत्रातून ही माहिती समोर आली आहे. कोणाकडे किती संपत्ती? भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांच्याकडे 2 किलो सोन्यासोबतच 23 कोटींची संपत्ती आहे. तर भाजपचे डमी उमेदवार शंकर जगताप हे सोने, चांदी, ट्रॅक्टर आणि एका बंदुकीसह 23 कोटींचे मालक आहेत. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना काटे यांच्याकडे एकूण 19 कोटींची संपत्ती असून, ज्यामध्ये 35 तोळे सोन्याचा समावेश आहे. ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे हे तब्बल 35 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. उमेदवारांनी उमेदवारी अर्जसोबत सादर केलेल्या शपथपत्रातून ही माहिती समोर आली आहे.
40 उमेदवार रिंगणात चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवार अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे आणि राहुल कलाटे यांच्यासह एकूण 40 उमेदवारांकडून 53 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. ही निवडणूक तिरंगी होणार असून, कलाटे यांच्या बंडखोरीचा महाविकास आघाडीला फटका बसू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.