बारामती, 29 मार्च: राज्यात ‘कोरोना’ बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना बारामतीत ही एक रुग्ण सापडला आहे. हे संकट आपल्या दारात आले असताना आपण घाबरून न जाता या परिस्थितीचा संयमाने मुकाबला करावा. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. कोणीही घरा बाहेर न पडता एकसंघता आणि संयमाच्या ‘बारामती पॅटर्न’चा राज्यासमोर आदर्श घालून देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना केलं आहे. हेही वाचा.. बारामतीत रिक्षा चालकाला कोरोनाची लागण, शहरात अनेक ठिकाणी फिरल्याचं आलं समोर ‘कोरोना’चे संकट संपूर्ण जगावर घोंगावत आहे. आपल्या राज्यातही आलेले हे संकट आता आपल्या दारात आले आहे. बारामतीत सापडलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी तयार करण्याचे काम सुरु आहे. बारामतीतील काही परिसर सील करण्यात आला आहे, तसेच तातडीने निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार अत्यंत खंबीर पावले उचलत आहे. या संकटाचा विस्तार होऊ नये म्हणून आपण ‘लॉकडाऊन’चा पर्याय निवडला आहे. या संकटाला आपल्याला याच टप्प्यावर रोखायचे आहे. त्यासाठी कोणीही अनावश्यक घराबाहेर पडू नये. आपल्या बारामतीच्या पॅटर्नचा देशभारत लौकिक आहे, या लौकिकाला साजेसच या संकटाला आपण तोंड देऊया, असंही अजित पवार यांनी सांगितले आहे. हेही वाचा.. कोरोनाच्या धास्तीमुळे बाईकवर गावी जाणाऱ्या पती, पत्नी आणि मुलाचा अपघातात मृत्यू या संकटाचा सामना करण्यासाठी आपण सक्षम आहोत, मात्र या परिस्थितीत कोणत्याही अफवेला बळी पडू नका. नेहमी प्रमाणे एकसंघपणे या संकटाचा मुकाबला करू या. राज्य सरकार आणि प्रशासनाने केलेल्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. दरम्यान, बारामती शहरातील श्रीराम नगरात राहणाऱ्या एका रिक्षा चालकाला कोरोनाची लागण झाल्याचं रविवारी स्पष्ट झालं. रुग्णाला पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याची टेस्टही पॉझिटिव्ह आली आहे. या पार्श्वभूमीवर बारामती शहरात प्रशासनाने नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे. हेही वाचा.. खाकी वर्दीतला ‘क्रूर’ चेहरा आला समोर, ‘News18 लोकमत’च्या प्रतिनिधीला बेदम मारहाण श्रीरामनगर परिसरातील हा रुग्ण बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. त्याचा त्रास वाढल्याने त्यास पुण्यातील ससूनला हलवण्यात आले होते. आता त्याला नायडू हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे. संबंधित रुग्ण हा रिक्षा चालक असल्याने तो बारामती शहरात वेगवेगळ्या ठिकाणी त्याने रिक्षा फिरवली असावी. तसेच त्याच्या संपर्कात अनेक जण आले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्याची इतर नागरिकांना बाधा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सकर्तता बाळगावी, घरातच राहावे, घराबाहेर फिरू नये, असं प्रशासनाने आवाहन केलं आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत नागरिकांनी स्वतःहून जनता कर्फ्यू लागू करून त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रांताधिकारी दादासो कांबळे यांनी केलं आहे. श्रीराम नगर परिसराच्या आजूबाजूचा तीन किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला आहे. नागरिकांची तपासणी केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.