बदलापूर, 12 मार्च : कोरोनाचं संकट असल्याने मुख्यमंत्र्यांनी कोणतेही कार्यक्रम मोठी गर्दी जमा करून साजरे करू नका, असे आदेश दिला आहेत. त्यामुळे कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने मोठ्या संख्येने नागरिकांच्या कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान बदलापूर शहरातील शिवसेनेने महिला दिनाच्या कार्यक्रमात शेकडो महिलांची गर्दी जमवून महिला दिनाचा कार्यक्रम साजरा केल्याच्या पोस्ट भाजपने सोशल मीडियावर व्हायरल केल्या आहेत. या कार्यक्रमाला जमलेल्या महिलांच्या गर्दीचे फोटोदेखील या व्हायरल पोस्टला जोडण्यात आले आहेत. मनसेने देखील यावर टीका केली आहे. (Shiv Sena leader disobeys CMs orders Hundreds of people celebrated Womens Day in Badlapur)
बदलापूर शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी जांभूळ एमआयडीसी भागातील महाराजा रिसॉट येथे या कार्यक्रमाचं आयोजन केल्याचं सांगितलं जात आहे. याठिकाणी महिला दिनाच्या कार्यक्रमाला तब्बल 700 पेक्षा जास्त महिला उपस्थित होत्या, अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 1500 महिलांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाल्याचे म्हटले आहे. निवडणुका जवळ आल्या असून रिसॉर्ट पार्टींना बळी पडू नका, असे देखील मनसेने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान या व्हायरल पोस्टमुळे शहरात मोठी चर्चा रंगली आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश शिवसेनेचे नेते पायदळी तुडवत असतील तर मग त्यांच्यावर काय कारवाई होणार असा सवाल देखील यानिमित्ताने विचारला जात आहे. (Shiv Sena leader disobeys CMs orders Hundreds of people celebrated Womens Day in Badlapur)
हे ही वाचा-लॉकडाउन लावण्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मोठे विधान, म्हणाले....
शिवसेना नेत्याची प्रतिक्रिया
मात्र जागतिक महिला दिनी आपण असा कोणताही सार्वजनिक कार्यक्रम साजरा केला नाही. मात्र काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून शिवसेनेची बदनामी करण्याचा प्रयत्न बदलापुरातील राजकीय पक्षांनी केली असून त्याचा निषेध करतो असे शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश पाळणारे आहोत, मात्र राज्यातील सरकारला बदनाम करण्याचे हे षड्यंत्र असल्याचे देखील म्हात्रे यावेळी म्हणाले. राज्यात कोरोनाने पुन्हा थैमान घालायला सुरुवात केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझर ही कोरोना नियमांची त्रिसूत्री काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन राज्यातील जनतेला केले. इतकंच नाही तर काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल असे देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र कोरोना नियमांचे पालन करायला सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्याच आदेशाला राजकीय पक्षांचे नेतेच जुमानत नसतील, तर संपूर्ण राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर होऊन राज्यातील जनतेला पुन्हा लॉकडाऊन सामोरे जावे लागेल, अशी टीका केली जात आहे.
बदलापूर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साजरे केले जात आहेत कार्यक्रम
कुळगांव बदलापूर नगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार मतदारांना आकर्षिक करण्यासाठी छोटे मोठे कार्यक्रम आयोजित करत आहेत. शिवाय अनेक उमेदवारांनी जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाचा जणू सपाटाच लावला आहे. मात्र हे कार्यक्रम करत असताना कोरोना नियमांकडे दुर्लक्ष होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Badlapur, Celebration, Covid19, International women's day, Rules violation, Shivsena, Social distancing, Womens day