पंढरपूर, 27 ऑक्टोबर: उपमुख्यमंत्री अजित पवार हे लवकर कोरोनामुक्त होऊन घरी यावेत. त्यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विठ्ठलाला साकडं घातलं आहे.
अतिवृष्टी आणि महापुरामुळे राज्यातील हजारो हेक्टरवर क्षेत्रावरील विविध पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान अजित पवार यांनी नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. याचदरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा...पुण्यात राडा! शरद पवारांच्या 'त्या' बैठकीला पंकजांसह सुरेश धसांना नाकारला प्रवेश
अजित पवार यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणं दिसत असली तरी त्यांना सध्या उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे अजित पवार यांनीच सांगितले आहे. पंढरपूर येथील शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष संदीप मांडवे व त्यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी पाषाण पुंश एकादशीचे औचित साधून संत नामदेव पायरी येथे विठ्ठलाची पूजा केली. यावेळी कार्यकर्त्यांनी अजित पवार लवकर बरे व्हावेत आणि जनतेच्या सेवेसाठी पुन्हा सक्रिय व्हावेत, असं विठ्ठलरुक्मिणी चरणी साकडं घातलं.
विठ्ठल साखर कारखान्याचे संचालक भगिरथ भालके हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आले असून त्यांच्यासाठी ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विठ्ठलाला साकडं घातलं.
अजित पवार ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अजित पवारांना सोमवारी मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झालो आहे, अशी माहिती खुद्द अजित पवार यांनी दिली होती. तसंच, 'राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोडाशा विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन' असंही अजित म्हणाले.
हेही वाचा..Go Corona Goची घोषणा देणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना झाला कोरोना
याआधीही राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यानंतर धनंजय मुंडे यांचाही कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसह अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचाराअंती त्यांनी कोरोनावर मात केली.