धुळे ता,1 जूलै : धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. मुलं चोरणाऱ्या टोळीच्या संशयावरून राईनपाडा इथं जमावाने 5 जणांची निघृण हत्या केली. दुपारी 12 च्या सुमारास ही घटना घडलीय. या प्रकरणी 10 जणांना पोलीसांनी अटक केली आहे.
राईनपाडा आणि परिसर हा आदीवासी पाड्यांचा भाग आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात मुलं चोरणारी टोळी फिरत असल्याची अफवा होती. आज राईनपाडा इथं आठवडी बाजार होता त्यामुळं लोकांची गर्दी होती. आठवडी बाजारामुळं आफवेची चर्चा जास्त झाली.
संशयावरून काही लोकांनी पाच जणांना ताब्यात घेतलं आणि त्यांना ग्रामपंचायतीच्या खोलीत कोंडून ठेवलं. संत्पत नागरिकांनी या ग्रामपंचायतीला वेढा घातला आणि कार्यालयाची दारं खिडक्या तोडून ते आत घुसले आणि पाचही जणांना प्रचंड मारहाण केली. लाकडाच्या दांडक्याने मारत त्यांना ठार केलं.
जमाव एवढा हिंसक होता की तो कुणालाही जुमानत नव्हता. ठार झालेले सर्व जण हे भविष्य सांगणारे कुडमुडे ज्योतिषी असल्याची माहिती स्थानिक आमदार दादा भुसे यांनी दिली आहे. पिंपळनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस तपास करत आहेत.
सर्व पाचही जणांचे मृतदेह पिंपळनेरच्या सरकारी दावाखाण्यात आणण्यात आले आहेत. राईनपाडा गावात तणावाचं वातावरण असून अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलीसांनी केल आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Child theft, Dhule, Mob lynching, Rumours, Sakri