पुणे, 18 सप्टेंबर : पुण्यात कोरोनाच्या संकटातही नागरीक कामासाठी बस, रेल्वेनं आणि मेट्रोने प्रवास करतात. या सर्व पार्श्वभूमिवर आज पहाटे 6 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी करण्यात आली आहे. धावत्या मेट्रोत अजित पवार यांनी संपूर्ण पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांचीही चर्चा केली आहे.
यावेळी अजित पवार यांनी संत तुकाराम नगर ते पिंपरीपर्यंतच पहिला प्रवास केला. मेट्रोच्या रस्त्यातील काही झाडं काढली जाणार आहेत, त्यांचं पुनररोपन कसं केलं जाणार याचीही माहिती त्यांनी यावेळी घेतली. याचा एक व्हिडओदेखील समोर आला आहे.
पहाटे 6 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी pic.twitter.com/fjx6yEmlQV
दरम्यान, कोरोनाचा धोका असताना आता राज्य अनलॉकच्या प्रक्रियेत आहेत. पण असं असलं तरी कोरोनाचा धोका काही कमी होताना दिसत नाहीये. पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे गरज पडल्यास पुण्यात पुन्हा जनता कर्फ्यू लागू करा अशा सूचना उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानंतर आता कोरोनाला रोखण्यासाठी पुणे महापालिका नव्या उपाय योजना करणार आहे.
मुंबई प्रमाणेच नागरिकांसाठी आता आचारंहिता लागू करण्यात येणार आहे. आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. कोरोनाचा प्रसार वेगात होत असल्याने महापालिका नवे नियम करणार आहे. जे या नियमांचं पालन करणार नाहीत त्यांना दंडही करण्यात येण्याची शक्यता आहे.
या नियमांमध्ये दोन पेक्षा अधिक नागरिकांना एकत्र उभे राहता येणार नाही. आदेशामध्ये नमूद केलेल्या कारणांशिवाय घराबाहेर पडता येणार नाही किंवा रस्त्यावर फिरता येणार नाही कुठल्याही कारणास्तव मास्कचा वापर टाळता येणार नाही. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणेही सक्तीचं करण्यात येणार आहे.
तर सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करणाऱ्या दुकानदारांविरुद्धही महापालिकेने कारवाईला सुरूवात केली आहे. नियमांच पालन न करणाऱ्या 5 दुकानदारांविरुद्ध महापालिकेने कारवाई केली आहे.