अकोला, 07 मे : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. परंतु, दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्याही दिलासादायक आहे. अकोल्यात एका 3 वर्षांच्या चिमुरड्याने महिनाभर लढा देऊन कोरोनावर मात केली आहे.
तब्बल एक महिने कोरोनाशी चिवट झुंज देऊन, त्याने आज विजयी मुद्रेने रुग्णालयाबाहेर पाऊल ठेवले. यावेळी सर्व डॉक्टर्स आणि उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्याला टाळ्या वाजवत निरोप दिला.
या चिमुरड्याला कुटुंबातील सदस्यांच्या संपर्कातून कोरोनाची लागण झाली. संपर्काच्या चाचण्या प्रशासनाने घेतल्या तेव्हा त्यात 7 एप्रिल रोजी आलेल्या अहवालात पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर या चिमुरड्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तब्बल महिनाभर या चिमुरड्यावर उपचार सुरू होता.
हेही वाचा - दापोलीतील खळबळजनक घटना, एका चुकीमुळे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना बसला हादरा!
या काळात त्याची तब्येत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अहवालांच्या दोन टोकांमध्ये हेलकावे खात होती. दरम्यान या चिमुरड्याच्या एक नव्हे दोन नव्हे तब्बल आठ चाचण्या झाल्या. त्यातल्या पहिल्या चार तर पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं.
अखेर या चिमुरड्याची पाचवी चाचणी निगेटिव्ह आली आणि पुन्हा आशा उंचावली. मात्र, पाच दिवसांनी घेतलेली सहावी चाचणी पुन्हा पॉझिटिव्ह आली. त्यानंतर 24 तासांनंतर सातवी चाचणी पुन्हा निगेटFव्ह आली. त्यानंतर पुन्हा पाच दिवसांनी 2 मे रोजी झालेली चाचणी निगेटिव्ह आली.
त्यानंतरही त्याच्या एक्स रे सहित विविध चाचण्या घेऊन चार दिवस त्याला पुन्हा डॉक्टरांनी निरीक्षणाखाली ठेवले. सर्व तपासण्या आणि चाचण्यांचे अहवाल समाधानकारक आल्यानंतरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोवीड उपचार पथकाने आज या बालकाला पूर्ण बरा झाल्यानंतर निरोप दिला.
हेही वाचा - पालघर साधू हत्यांकाडप्रकरण: तब्बल 20 दिवसानंतर समोर आली महत्त्वपूर्ण माहिती
आता हा चिमुरडा 14 दिवस घरातच क्वारंटाइन राहणार आहे. त्याने ज्या चिवटपणे कोरोना विरुद्ध झुंज दिली. त्याची जिद्द वाखाणण्यासारखीच आहे. डॉक्टरांनीही जिद्दीने उपचारांची शर्थ केली आणि त्याला कोरोनाच्या जबड्यातून बाहेर काढलंच. इथच कोरोना हरला.
या लहानग्या रूग्णाला निरोप देण्यासाठी अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे, उप अधिष्ठाता डॉ.अनिलकुमार बत्रा, डॉ.अपुर्व फावडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.शामकुमार सिरसाम, डॉ,अपर्णा वाहाने , वैद्यकीय उप अधीक्षक डॉ.दिनेश नैताम व इतर सर्व वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.