पालघर, 7 मे: पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर समजून 2 साधू आणि वाहनचालकाला दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. आता घटनेच्या तब्बल 20 दिवसानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घटनास्थळाला भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांच्यासोबत अधिकारी वर्ग व कार्यकर्त्यांचा मोठा गराडा होता. मात्र, यावेळी प्रसारमाध्यमांना प्रवेश व चित्रिकरण करण्यास निर्बंध घालण्यात आले.
गडचिंचले येथे झालेल्या तिहेरी हत्येप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कासा पोलिस ठाणे आणि गडचिंचले येथील घटनास्थळी भेट दिली. गुरुवारी सकाळी 11 वाजल्याच्या सुमारास गावात पोहोचल्यानंतर त्यांनी सरपंच, काही ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांशी चर्चा केल्याचे समजते. यावेळी हत्याकांडाचे प्रत्यक्षदर्शी जिल्हा परिषदेचे सभापती व काशिनाथ चौधरी, विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा, खासदार राजेंद्र गावित आणि स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा गराडा गृहमंत्र्यांसोबत होता.
हेही वाचा.. बीडमध्ये रेशनची साठेबाजी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, भाजप नेत्याविरुद्ध गुन्हा
गृहमंत्री व कार्यकर्त्यांना पोलिसांनी गावात सोडल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधी आणि कॅमेरामनला पोलिसांनी काही अंतरावरच रोखले. नंतर गृहमंत्री यांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 116 जणांना अटक केली आहे. त्यात 9 अल्पवयीन आहेत. तर या प्रकरणात कासा पोलीस ठाण्याचे दोन अधिकारी आणि तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच इतर 35 कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा... परप्रांतीय मजुरांच्या मदतीला धावून आला भाजप नेता, पुण्यात करत आहे 'पुण्या'चं कामएका आरोपीला कोरोनाची लागण...
गडचिंचले येथे झालेल्या साधूंच्या हत्याकांडातील एक आरोपीला कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. या आरोपीच्या सहवासातील इतर 20 सह आरोपी व 23 पोलिस कर्मचाऱ्यांना अलगीकरण करण्यात येत असून या सर्वांचे घशाचे नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
16 एप्रिल रोजी झालेल्या या हत्याकांडातील 22 आरोपी वाडा येथील पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. या सर्व आरोपींची कोरोना तपासणी 18 एप्रिल रोजी करण्यात आली असता सर्वांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले होते. दरम्यान, या रुग्णांचे दुसरे अहवाल शुक्रवारी रात्री उशिराने प्राप्त झाल्यानंतर त्यापैकी एक आरोपीला कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.