Home /News /news /

गुजरात ते दिल्ली मोदींचा प्रवास !

गुजरात ते दिल्ली मोदींचा प्रवास !

अजय कौटिकवार,मुंबई आकाश स्वत:च्या कवेत घेण्याचा प्रयत्न करतोय रोंरावणारा सागर....माझी प्रेरणामूर्ती कोणीही किनारा गाठावा असा हा सागर नव्हे आव्हानं स्वीकारायची आपली ताकद असेल... तरच आपल्या हातांना प्रयत्नांचे फुल लाभेल.... 26 मे : नरेंद्र मोदींच्या `सृष्टी` या कवितेतल्या त्यांच व्यक्तिमत्व सांगणार्‍या या ओळी..आव्हानं...संकटं...वादळं...यांचा सततचा सामना...पराकोटीचं प्रेम आणि तेवढाच विरोध मिळवणारं भारतीय राजकारणातलं...वादळी आणि वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणजे...नरेंद्र मोदी....संघप्रचारक ते पंतप्रधानपदाचे उमेदवार....हा प्रवास आहे..त्यांच्या जिद्दीचा...कठीण परिश्रमाचा.धुर्त राजकारणाचा आणि अति महत्वाकांक्षी, चतुर राजकीय नेत्याचा... गुजरातच्या मेहेसाणा जिल्ह्यातल्या वडनगर या लहानश्या गावात 17 सप्टेंबर 1950 रोजी नरेंद्र मोदींचा जन्म झाला. सहा भावंडांमध्ये नरेंद्र तिसरे.. काहीतरी वेगळं करायचं या इच्छेमुळे वडिलांच्या पारंपरिक व्यवसायात त्यांचं मन फारसं रमलं नाही. वडनगरच्या रेल्वे स्थानकावर असलेल्या वडिलांच्या चहाच्या दुकानातही ते मदत करायाचे प्रचारामध्ये या `चहा`नं अनेक राजकीय पक्षांची झोप उडवली. वयाच्या 8 व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा संघाच्या शाखेत हजेरी लावली आणि 1967 मध्ये संघ कार्यासाठी वयाच्या 17 व्या वर्षी कायमचं घर सोडलं. याला सर्वात मोठं कारण ठरलं ते त्यांचं कथित लग्न. घरच्या ज्येष्ठ मंडळीच्या दबावामुळे त्यांनी मनाविरुद्ध लग्नाला होकार दिला. 17 व्या वर्षी त्यांचा जशोदाबेन यांच्याशी विवाह झाला. लौकिक अर्थानं त्यांचा विवाह झाला असला तरी सहजीवन कधी फुललंच नाही. घर सोडल्यानंतर नरेंद्र अहमदाबादमधल्या संघ मुख्यालयात राहू लागले. संघप्रचारक लक्ष्मणराव इनामदार यांच्या तालमीत ते तयार झाले आणि नंतर प्रचारक बनले. फाळणी...हिंदुत्व...हिंदुराष्ट्र...मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक हे संघाच्या बौद्धिकाचे त्या काळातले खास विषय. मोदींच्या कडव्या विचारांचा घट्ट पाया याच काळात तयार झाला. मोदींचं मुख्य कार्यक्षेत्र राहिलं ते गुजरात.चिमणभाई पटेल मुख्यमंत्री असताना विद्यार्थ्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात उभारलेल्या `नवनिर्माण आंदोलना`त मोदी सक्रीय होते. 1976 मध्ये आणीबाणीविरोधातही त्यांनी भुमिगत राहून काम केलं आणि राजकारणाची बीजं रोवली गेली. पुढं नरेंद्र मोदी अभाविपचे नेते बनले. याच काळात त्यांचा लालकृष्ण अडवाणींशी संबंध आला. त्यांच्याच शिफारशीवरुन 1987 मध्ये नरेंद्र मोदी भाजपमध्ये आले आणि गुजरात भाजपचे महासचिव बनले. लालकृष्ण अडवाणींच्या रथयात्रेतल्या त्यांच्या कामगिरीचा अडवाणींवर प्रभाव पडला नंतर मुरली मनोहर जोशींच्या कन्याकुमारी ते श्रीनगर या एकता यात्रेचेही ते प्रमुख होते. 1995 मध्ये गुजरातमध्ये भाजपचं सरकार आलं आणि केशुभाई पटेल मुख्यमंत्री बनले. लवकरच भाजपमध्ये अंतर्गत गटबाजीला उधाण आलं. केशुभाईंना सत्ता सोडावी लागली. शंकरसिंग वाघेलांनी बंड केलं. त्या राजकारणात मोदींना 1995 मध्ये दिल्लीत पाठवण्यात आलं. 2001 मध्ये भयंकर भूकंपानं गुजरात कोलमडून पडलं आणि मोदी गुजरातमध्ये परतले ते मुख्यमंत्री म्हणून पुढच्याच वर्षी गुजरातवर दुसरं संकट आलं आधी गोध्रा आणि नंतर गुजरातमधली दंगल यामुळे गुजरातमध्ये हजारो जणांचा बळी गेला. लाखो निर्वासित झाले आणि दोन समुदायांमध्ये अविश्वासाची भिंत उभी राहिली. मोदींना वाजपेयींनी राजधर्माची आठवण करुन दिली. मात्र या कशालाच मोदी बधले नाहीत. चौकशीच्या फेर्‍यात मोदी अडकले. सुप्रीम कोर्टानेही खास चौकशी पथक नेमलं. अजूनपर्यंत तरी त्यांच्याविरोधात पुरावे आढळून आले नाहीत. त्याचवेळेला दंगलींबद्दल माफी मागण्याचा मनाचा मोठेपणा न दाखवता `माझी चुक नाही, त्यामुळे मी माफी मागणार नाही` अशी भूमिका त्यांनी घेतली. ज्यावर ते आजही ठाम आहेत. सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरण, इशरत जहाँची हत्या आणि सध्याचं स्नूपगेट प्रकरण अशा अनेक वादग्रस्त प्रकरणांमध्ये मोदींचं नाव घेतलं जातं. पण मोदी या सगळ्याला पुरुन उरले. मोदींनी आपली प्रतिमा बदलण्यासाठी विकासाचं मॉडेल उभं केलं. विकास...सुशासन...या शब्दांचा वापर करत आपली कट्टर प्रतिमा बदलण्याचा मोदींचा प्रयत्न यशस्वी झाला. मोदी जेव्हा चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा `गुजरात का शेर` आता दिल्लीत चाल करून येणार हे निश्चित झालं. भाजपमधल्या परिवर्तनाच्या पर्वात संघाने मोदींच्या पारड्यात आपलं वजन टाकलं आणि मोदी पंतप्रधानपदाचे दावेदार बनले. लोकशाहीत संख्याबळ महत्वाचं असलं तरी...राजाचं मोजमाप केलं जातं ते त्याच्यामधल्या सह्रदयतेवर.इतिहास मोदींचं मुल्यमापनही याच कसोटीवर करणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: BJP, Election, Election2014, Gujrat, Loksabha, Rajnath singh, Sushma swaraj, अनंत गीते, गोपीनाथ मुंडे, जेटली, मंत्रिमंडळ, मुरली मनोहर जोशी, राजनाथ सिंह, रावसाहेब दानवे, संघ

पुढील बातम्या