नरेश पारीक, प्रतिनिधी चुरू, 7 जून : मनात तीव्र इच्छा असेल आणि काहीतरी करून दाखवण्याची पक्की जिद्द असेल, तर या जगात अशक्य असं काहीच नसतं. ही ओळ सत्यात उतरवणारे लाखात एक असतात. त्यापैकीच एक ठरले आहेत राजस्थानच्या चुरू कोतवाली पोलीस ठाण्याचे हवालदार सचिन मीणा. दहा वर्ष पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून चोख कर्तव्य बजावत असताना अभ्यास करून त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पद मिळवलं आहे. आता त्यांच्या मेहनतीचे 2 स्टार्स त्यांच्या गणवेशावर लागणार आहेत. आज स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी लाखो तरुण-तरुणी अक्षरशः रात्रीचा दिवस करून मन लावून अभ्यास करतात. दहा वर्ष पोलीस दलात कार्यरत असताना स्पर्धा परीक्षेत दुसऱ्याच प्रयत्नात यश मिळवणारे सचिन मीणा या लाखो तरुणांसाठी आदर्श ठरले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी कोणतीही शिकवणी न घेता स्वतः अभ्यास करून हे यश मिळवलं आहे.
कळायला लागल्यापासून पोलिसांचा दरारा पाहून आपणही पोलीस दलात दाखल व्हायचं असं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं. अखेर वयाच्या 19व्या वर्षी राजस्थानच्या पोलीस दलात हवालदारपदी त्यांची नियुक्ती झाली. परंतु तरीही आयुष्यात आणखी काहीतरी करायला हवं, ही इच्छा त्यांना स्वस्त बसू देत नव्हती. शिवाय साल 2016-17 मध्ये त्यांच्या पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी असलेले उमाशंकर शर्मा यांचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव पडला. आपल्यालाही अधिकारी व्हायचंय हे त्यांनी मनाशी पक्क केलं होतं. त्यासाठी नोकरीतून वेळ मिळेल तेव्हा ते अभ्यास करू लागले. मात्र पहिल्या प्रयत्नात स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यास त्यांना अपयश आलं. मग त्यांनी आणखी मन लावून अभ्यास केला. अभ्यास करण्याची पद्धत बदलली आणि दुसऱ्या प्रयत्नातच त्यांना यश मिळालं. ते पोलीस उपनिरीक्षक झाले. Mumbai hostel Crime : मुंबई बलात्कार आणि हत्या प्रकरणात धक्कादायक गोष्टी समोर; तरुणीची रुममेट.. आपल्या या यशाबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘मी ज्या पोलीस ठाण्यात ड्युटीवर जायचो तिथे माझी पुस्तकं सोबत न्यायचो, वेळ मिळाला की अभ्यास करायचो.’ त्याचबरोबर ‘सध्याच्या जगात तरुणमंडळी सोशल मीडियापासून जितकी दूर जातील आणि पुस्तकांजवळ येतील, तितकी यशस्वी होतील’, असा संदेशही त्यांनी तरुणांना दिला.