नवी दिल्ली, 20 जानेवारी: उत्तर प्रदेशात विधानसभेची (
UP Election 2022) निवडणूक होणार आहे. तिथलं राजकारण रंगत चाललंय. नेत्यांच्या खासगी आणि राजकीय आयुष्यातल्या अनेक गोष्टी समोर आणल्या जात आहेत. त्याचं अनेकदा राजकीय भांडवलंही केलं जातंय. उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टीचे प्रमुख नेते अखिलेश यादव (
Akhilesh Yadav Latest News) हेदेखील सध्या अशाच कारणामुळे चर्चेत आहेत. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, अखिलेश यादव यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री यांच्या दुसऱ्या लग्नाची कहाणी अखिलेश यांना निवडणुकीत त्रासदायक ठरेल का, त्यांच्या यशाच्या मार्गात अडसर ठरेल का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
अखिलेश यादव यांना त्यांचे वडील आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्याबद्दल एका पत्रकाराने प्रश्न विचारला आणि त्यामुळे त्यांच्या काही जुन्या जखमा ताज्या झाल्या असं म्हटलं जातं. खरं तर ही गोष्ट मुलायम सिंह यांच्याबाबत 40 वर्षांपूर्वी घडली आहे. म्हणजे तेव्हा अखिलेश यादव फक्त 9 वर्षांचे होते. पण या घटनेबद्दल अखिलेश यादव यांना 40 वर्षांनंतर म्हणजे 19 जानेवारी 2022 रोजी पत्रकार परिषदेत एक प्रश्न विचारण्यात आला. पण अखिलेश यादव निरुत्तर झालेलेच दिसले. हा प्रश्न होता अपर्णा यादव यांच्याबद्दल. अपर्णा यादव या मुलायम सिंहांच्या सुनबाई आहेत. त्या मुलायम यांच्या दुसऱ्या पत्नी साधना यादव यांचा मुलगा प्रतीक यादव यांच्या पत्नी आहेत. अपर्णा यादव यांनी समाजवादी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचबद्दल हा प्रश्न विचारण्यात आला होता.
हे वाचा-'मोदीजी आम्हाला अत्याचारातून मुक्त करा'; PoK मधील व्यक्तीची मदतीसाठी हाक, VIDEO
पण साधना यादव नेमक्या कोण (
Who is Sadhana Yadav) आहेत आणि त्यांची आणि मुलायम सिंह यांची प्रेमकहाणी कशी सुरू झाली, ही कहाणीही मोठी रंजक आहे.
1982 मध्ये ही लव्हस्टोरी सुरु झाली असं सांगितलं जातं. तेव्हा मुलायम सिंह यादव यांचं लग्न झालं होतं आणि त्यांचा मुलगा अखिलेश 9 वर्षांचा होता. याच काळात काँग्रेसचा देशभरातला दबदबा कमी होत चालला होता. त्यावेळचं राष्ट्रीय लोकदल आणि विशेषत: यादवांचा दबदबा वाढत होता. मुलायम सिंह यांचं व्यक्तिमत्व आणि हसतमुख चेहऱ्यावर अनेक तरुणी फिदा होत्या, असं बोललं जातं. मुलायमसिंह तेव्हा 43 वर्षांचे होते. औरेया जिल्ह्यातील बिधूना गावातील एक 23 वर्षांच्या मुलीला राजकारणात काहीतरी करावंसं वाटत होतं. या सुंदर मुलीचं नाव होतं साधना गुप्ता. काही राजकीय कार्यक्रमांना तिनं हजेरी लावली. त्याचवेळेस तिची मुलायम सिंह यांच्याबरोबर नजरानजर झाली. आता यावेळी काय झालं हे केवळ अमर सिंह यांना माहित होतं, आता त्यांच्या मृत्यूनंतर ही गोष्ट कायम गुलदस्त्यातच राहिली.
सुनीता एरॉन या लेखिकेनं अखिलेश यादव यांचं चरित्र ‘बदलाव की लहर’ लिहिलं आहे. यातील काही पानं मुलायम सिंह यांच्या या लव्हस्टोरीवरच आहेत. साधना आणि मुलायम सिंह यांच्या काही गाठीभेटी झाल्या. पण मुलायम सिंह यांच्या आईमुळे हे दोघे जास्त जवळ आले असं सुनीता यांचं म्हणणं आहे. मुलायम सिंह यांची आई मूर्ती देवी आजारी होत्या. मूर्ती देवी यांच्यावर लखनऊच्या एका नर्सिंग होममध्ये आणि त्यानंतर सैफई मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु असताना साधना यांनी त्यांची देखभाल केली असं म्हटलं जातं. सुनीता एरॉन लिहितात, ‘मेडिकल कॉलेजमध्ये एक नर्स मूर्ती देवी यांना चुकीच्या औषधाचं इंजेक्शन देत होती. त्यावेळेस तिथं उपस्थित असलेल्या साधना यांनी त्यांना तसं करण्यापासून थांबवलं. साधना यांच्यामुळे मूर्ती देवी यांचा जीव वाचला असं सांगितलं जातं. अर्थातच मुलायम सिंह यामुळे त्यांच्याकडे आकर्षित झाले आणि त्या दोघांचे रिलेशनशिप सुरु झाली. ही घटना घडली तेव्हा अखिलेश यादव शाळेत विद्यार्थी होते आणि मुलायम सिंह यांची पत्नी मालतीदेवी यादेखील त्यांच्यासोबत होत्या.
हे वाचा-"राष्ट्रवादीचं बळ वाढवण्याची काहींची छुपी नीती" शिवसेना आमदाराचा घरचा आहेर
अर्थात त्यावेळची परिस्थिती पाहता मुलायम सिंह यादव त्यांच्या साधनाबरोबरच्या नात्याचा जाहीरपणे स्वीकार करणं शक्य नव्हतंच. 1982 ते 1988 म्हणजे जवळपास सहा वर्षं मुलायम सिंह यांच्या या लव्हस्टोरीबद्दल फक्त अमर सिंह यांनाच माहिती होती. त्यांनीही ते कुणाला सांगितलं नाही. कारण मालतीदेवी आणि अखिलेश यादव यांच्यामुळे.
पण 1988 मध्ये परिस्थिती बदलली. मुलायम सिंह मुख्यमंत्रिपदासाठी अगदी प्रबळ दावेदार होते. साधना त्यांचे पती चंद्र प्रकाश गुप्ता यांच्यापासून वेगळ्या राहू लागल्या होत्या आणि तिच्या पदरात एक लहान मुलगाही होता. याच वेळेस मुलायम सिंह यांनी अखिलेश यादव यांची साधना यांच्याशी भेट घडवून दिली.
नेहा दीक्षित यांनी ‘कारवां’ मासिकात याबद्दल लिहीलं आहे. नाव न लिहीता या कुटुंबाच्या अगदी निकटवर्तीयांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी लिहीलं होतं, ‘1988 मध्ये मुलायम सिंह यांनी अखिलेश यादवची साधना गुप्ता यांच्याशी भेट करून दिली. तेव्हा अखिलेश यादव 15 वर्षांचे होते. अखिलेश यांना साधना अजिबात आवडल्या नव्हत्या. एकदा तर साधना गुप्ता यांनी अखिलेशला थोबाडीतही मारली होती. काही काळानंतर अखिलेश यांना आधी इटावा आणि त्यानंतर राजस्थानमधील धौलपूर इथं शिक्षणासाठी पाठवण्यात आलं.’
खरं तर या गोष्टीची इतकी चर्चाही झाली नसती. पण विश्वनाथ चतुर्वेदी या व्यक्तीनं या सगळ्या गोष्टी उजेडात आणल्या. त्यांनी 2 जुलै 2005 रोजी मुलायम सिंह यादव यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात एक प्रतिज्ञापत्र दाखल केलं. 1979 मध्ये 79 हजार रुपये संपत्ती असेलला समाजवादी नेता कोट्यवधीच्या संपत्तीचा मालक कसा बनला, असा सवाल त्यात विचारण्यात आला होता. सुप्रीम कोर्टानं सीबीआयला मुलायम सिंह यांच्या चौकशीचे आदेश दिले. चौकशी सुरु झाली. 2007 पर्यंत अनेक जुन्या गोष्टींचा तपास करण्यात आला आणि नवीन रिपोर्ट तयार करण्यात आला. त्यामध्ये या गोष्टी लिहिण्यात आल्या होत्या-
- 1994 सालापासून मुलायम सिंह यांची आणखी एक पत्नी आणि मुलगाही आहे.
- 1994 मध्ये प्रतीक गुप्ता यानं शाळेच्या फॉर्ममध्ये पालकांचा पत्ता म्हणून मुलायम सिंह यांचा अधिकृत पत्ता लिहिला होता
- त्यानं आईचं नाव साधना गुप्ता आणि वडिलांचं नाव एमएस यादव लिहीलं होतं.
- 2000 साली प्रतीकचे गार्डियन (पालक) म्हणून मुलायम यांचं नाव नोंदवण्यात आलं होतं.
- 23 मे 2003 मध्ये मुलायम यांनी साधनाला आपल्या पत्नीचं स्थान दिलं होतं.
हे वाचा-तुमचंही PVC Aadhar कार्ड बाद होणार का? जाणून घ्या UIDAI चा नवा निर्णय
साधना मुलायम सिंह यांच्या आयुष्यात 1988 मध्ये आल्या आणि 1989 मध्ये मुलायम सिंह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे तेव्हापासून ते साधनाला त्यांच्यासाठी लकी मानायला लागले. संपूर्ण कुटुंबाला ही गोष्ट माहिती होती. पण कोणीही काहीही बोलत नव्हतं. आता जेव्हा सगळंच उघड झालं तेव्हा 2007 मध्ये मुलायम यांनी उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती असल्याच्या त्यांच्या विरोधात सुरु असलेल्या खटल्यात सुप्रीम कोर्टात एक प्रतिज्ञापत्र दिलं. त्यामध्ये लिहीलं होतं- ‘साधना गुप्ता माझी पत्नी आणि प्रतीक माझा मुलगा असल्याचे मी मान्य करतो.’
त्यावेळी समाजवादी पार्टीत आणखी एक उत्तराधिकारी निर्माण झाला का अशीही भीती व्यक्त होऊ लागली. पण ही गोष्ट इथंच संपत नाही- अखिलेश आपल्या वडिलांवर बरेच नाराज होते. मुलायम सिंह यांनी एकट्याने संघर्ष करून 2012 सालची विधानसभा निवडणूक जिंकली आणि कारभार अखिलेश यादव यांच्याकडे सोपवला. त्यावेळेस ते म्हणाले होते, ‘बेटा, आता हे तू सांभाळ’. खरं तर अखिलेश यादव यांना तरुण नेतृत्व म्हणून मान्यताही मिळाली. पण यावेळच्या निवडणुकीत काहीसं चित्र बदलतंय असं म्हटलं जातं. 19 जानेवारी 2022 रोजी मुलायम आणि साधना यांची सून आणि प्रतीक यादव यांची पत्नी अपर्णा यादवनं भाजपमध्ये प्रवेश केला, तेव्हा विरोधकांनी एकच प्रश्न विचारायला सुरुवात केली, ‘अखिलेश, राजकारण, नाती, पार्टी सांभाळण्यात अपयशी ठरत आहेत का’? अर्थातच अखिलेश यांनी यावर काहीही उत्तर दिलं नाही. अपर्णा यांना शुभेच्छा असं म्हणून ते पत्रकार परिषदेतून निघून गेले.
पण अखिलेश यांच्या जखमेवरची खपली तर निघाली आणि त्यांच्या वडिलांची ही 40 वर्ष जुनी प्रेमकहाणी ही जखम पुढचे 49 दिवस म्हणजेच 10 मार्चपर्यंत भळभळत तर राहणारच.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.