नवी दिल्ली, 30 जानेवारी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी आपल्याच पक्षात बंड केल्याने खरी शिवसेना कोणाचा असा वाद सध्या सुरू आहे. या वादावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. आज दोन्ही गटांना लेखी युक्तिवाद सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. ठाकरे गटाने आज लेखी स्वरुपात आपलं म्हणणं सादर केले. कुठल्याही पातळीवर तपासलं तरी न्यायाची बाजू आमची असल्याचा दावा ठाकरे गटाने निवडणूक आयोगासमोर केला आहे. तर शिंदे गटाने 124 पानांमध्ये आपली बाजू आयोगासमोर मांडलं आहे.
काय म्हणाले ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत?
"आमच्याच पक्षाला चिन्ह मिळायला हवं, मूळ शिवसेनेने मोठ्या प्रमाणात कागदपत्र सादर केली आहे. त्यामुळे मिंदे गटाने काय सादर केले याला महत्त्व नाही", अशी टीका शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे. एक आमदार असलेल्या पक्षातील आमदार निघून गेल्यावर त्या पक्षप्रमुखांनी काय करायचं? असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला. ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उमेदवाराला मतदान करण्यात आले आहे. आम्हाला चिन्ह मिळालं त्यावेळी शंभूराजे कुठे आमच्या पक्षात होते? शिंदे गटाच्या पाठीशी जी महाशक्ती आहे, ती संविधानाची चिरफाड करत असल्याचा आरोप सावतं यांनी केला. देशात कायद्याचे राज्य राहिले असून न्याय हा मूळ शिवसेनेलाच मिळाला पाहिजे, असेही अरविंद सावंत म्हणाले.
ठाकरे गटाने काय म्हणणं मांडलंय?
शिवसेना ठाकरे गटाने आज निवडणूक आयोगाला सादर केलेल्या लेखी युक्तिवादात एकनाथ शिंदे यांच्या बंडांची माहिती देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाला 20 जून 2022 पासूनच्या घटनाक्रमांची माहिती देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेले मुख्य नेतेपद हे शिवसेनेच्या घटनाविरोधी असल्याचा युक्तिवाद ठाकरे गटाने केला आहे. शिंदे गटाने पक्षावर आणि पक्ष चिन्हावर केलेला दावा हा चुकीचा असल्याचेही ठाकरे गटाने म्हटले.
वाचा - बीड मधील पंकजा मुंडे, क्षीरसागर यांच्या भेटीतील न घेतलेल्या 'चहा'ची चर्चा; का घेतला काढता पाय?
पक्ष म्हणजे आमदार-खासदारांचा नसतो. तर पक्ष हा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा असतो. आम्ही त्याचे पुरावे दिले आहेत. जवळपास तीन लाख पदाधिकारी आणि 20 लाख प्राथमिक सदस्यांचे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आली असल्याचे शिवसेना नेते अॅड. अनिल परब यांनी सांगितले. आमची बाजू उजवी आणि सत्यावर आधारीत असल्याने आमच्या बाजूने निकाल लागेल असा युक्तिवाद ठाकरे गटाने केला आहे.
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे काय म्हटले?
आज अंतिम मुदत होती, ठाकरे गटाच्या मुद्यांना आम्ही उत्तर दिलं आहे. पक्षाची मान्यता मतदानावर अवलंबून असते, आमदार, खासदार यांच्यावर अवलंबून असते, असे मुद्दे आम्ही मांडले. कायदेशीर बाजू आम्ही मांडली आहे. घटनेचा उल्लेख केला जातोय तो बाळासाहेब असताना घटना वेगळी होती. उद्धव यांच्या काळात घटना बदलली गेली. बाळासाहेब यांच्या वेळच्या घटनेनुसार आम्ही सादरीकरण केलं असल्याचं राहुल शेवाळे यांनी सांगितलं. आम्ही कोणीही स्वेच्छेने पक्ष सोडला नाही. उठाव एक दिवसात होत नाही, असंही शेवाळे यांनी सांगितलं.
अखेरच्या क्षणी उत्तर दाखल
निवडणूक आयोगाने दिलेली मुदत संपण्यास काही मिनिटांचा अवधी असताना शिंदे गटाच्या वकिलांनी निवडणूक आयोगात हजर राहत शिवसेना पक्षावर आणि धनुष्यबाणावर दावा केला. एकनाथ शिंदे यांचे मुख्य नेतेपद हे घटनात्मक आहे. पक्षाच्या लोकप्रतिनिधींची संख्या आमच्याकडे अधिक आहे. निवडणूक चिन्ह देताना संख्याबळ विचारात घेतलं जावं असा मुद्दा शिंदे गटाने उपस्थित केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.