मराठी बातम्या /बातम्या /देश /

भारत जोडो यात्रेत राहुल गांधींच्या फिटनेसची चर्चा; असा असतो त्यांचा संपूर्ण दिनक्रम

भारत जोडो यात्रेत राहुल गांधींच्या फिटनेसची चर्चा; असा असतो त्यांचा संपूर्ण दिनक्रम

राहुल गांधींचा फिटनेस

राहुल गांधींचा फिटनेस

संपूर्ण भारत जोडो यात्रेदरम्यान गेल्या तीन महिन्यांपासून राहुल गांधी एकाच प्रकारचं रूटीन फॉलो करत आहेत. त्यामुळे त्यांच्या फिटनेसची चर्चा सुरू झाली आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 07 डिसेंबर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 7 सप्टेंबरपासून 'भारत जोडो' यात्रेला सुरुवात केली आहे. सध्या ही यात्रा राजस्थानमध्ये पोहोचली आहे. भारत जोडो यात्रेत आतापर्यंत राहुल गांधींनी सात राज्यांतून 2500 किलोमीटरहून अधिक अंतराचा पायी प्रवास केला आहे. या प्रवासात ते सतत धावताना, नाचताना, खेळताना आणि भाषण देताना दिसतात. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतल्या राजकीय पैलूंव्यतिरिक्त त्यांच्या फिटनेसचीही चर्चा आहे. दिनक्रमातलं सातत्य हे त्यांच्या फिटनेसमागचं कारण आहे. गेल्या तीन महिन्यांपासून राहुल न चुकता डेली रूटीन फॉलो करत आहेत. कडाक्याच्या थंडीतही त्यांनी आपला दिनक्रम बदललेला नाही. ते दिवसभरात एक मिनिटही झोपत नाहीत. रात्री जेवणानंतर आणि झोपण्यापूर्वी ते तासभर पुस्तकं वाचतात. 'दैनिक भास्कर'नं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

सुमारे 120 नेत्यांना घेऊन राहुल गांधींनी कन्याकुमारीपासून यात्रा सुरू केली. यामध्ये सुमारे 20 राज्यांतल्या काँग्रेस नेत्यांचा समावेश असून, त्यापैकी 30 टक्के महिला आहेत. या यात्रेच्या सुरुवातीला काही कलाकार संबंधित राज्यातलं लोकनृत्य सादर करत चालतात. त्यानंतर तिरंगा दल आणि त्यानंतर सेवा दल चालतं. यानंतर राहुल गांधी चालतात. राहुल गांधींभोवती 500 ते 800 मीटरच्या सर्कलमध्ये कोण राहणार, हे सर्व निश्चित केलेलं असतं. राहुल यांना 300 ते 400 मीटर अंतरावर विशेष सुरक्षा दिली जाते. यानंतर पोलिसांचा वेगळा बंदोबस्त असतो. यात्रेदरम्यान राहुल यांना भेटणारे अधिकारी आणि प्रवासीदेखील असतात. नवीन ठिकाणी गेल्यानंतर नवीन प्रवासी यात्रेत सहभागी होतात. राहुल यांच्या मागे सर्वसामान्य नागरिकांचा, तर सर्वांत शेवटी यात्रेसोबत असलेला वाहनांचा ताफा असतो.

या संपूर्ण भारत जोडो यात्रेदरम्यान गेल्या तीन महिन्यांपासून राहुल गांधी एकाच प्रकारचं रूटीन फॉलो करत आहेत. त्यामुळे त्यांच्या फिटनेसची चर्चा सुरू झाली आहे.

राहुल गांधींचा दिवस पहाटे साडेचार वाजता सुरू होतो. पहाटे साडेचारच्या सुमारास राहुल गांधी उठून तयार होतात आणि पाच वाजता नाश्ता करतात. सकाळच्या नाश्त्यात ते फळांना प्राधान्य देतात. यात्रेतले अनेक प्रवासी म्हणतात, की आम्ही कधी पहाटे पाच वाजता नाश्ता करू याची कल्पनाही केली नव्हती. राहुल नेहमी नाश्ता करून कॅम्प सोडतात. नाश्ता केल्यानंतर सकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी ध्वजारोहण होतं. बरोबर सहा वाजता राहुल गांधी यात्रा प्रारंभ करण्याच्या ठिकाणी पोहोचतात.

राहुल गांधी त्यांच्या सकाळच्या प्रवासादरम्यान विश्रांतीच्या ठिकाणापूर्वी तीन किलोमीटर अंतरावर टी-ब्रेकसाठी थांबतात. एखाद्या टपरीवर थांबूनही ते चहा पितात. यासोबत ते शेंगदाणा चिक्कीसारखे पदार्थ खातात. प्रवासादरम्यान ते आजूबाजूच्या व्यक्तींशी बोलतात. याशिवाय सोबत फिरणाऱ्या व्यक्तींनाही भेटतात. यानंतर लंच ब्रेकच्या ठिकाणी थांबतात.

दुपारचं जेवण कँपमध्येच

दुपारी साडेतीन वाजता त्यांचा पुढील प्रवास सुरू होतो. तत्पूर्वी 11.30 वाजता राहुल दुपारचं जेवण घेतात. त्यांचं जेवण साधं आणि शाकाहारी असतं. शक्यतो ते एकटेच जेवतात. राहुल यांच्या दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाची फूड इन्स्पेक्टरकडून चाचणी घेतली जाते. नमुना घेतल्यानंतर जेवण राहुल यांच्यापर्यंत पोहोचतं. ते बाहेरून आणलेलं अन्न खात नाहीत. जेवणापूर्वी ते भारत यात्री आणि राज्य यात्रींच्या गटाला भेटतात. यासाठी 45 मिनिटं निश्चित करण्यात आलेली आहेत.

राहुल यांच्यासोबत प्रवास करणारे शत्रुघ्न शर्मा सांगतात की, दिवसाच्या ब्रेकमध्ये राहुल झोपत नाहीत. ते अनेक लोकांना भेटतात. आम्हाला भेटल्यानंतर ते कुटुंबाबद्दल विचारतात. व्हिडिओ कॉलवर प्रवाशांच्या कुटुंबीयांशी संवादही साधतात.

संध्याकाळच्या रेस्ट पॉइंटच्या तीन किलोमीटर आधी राहुल गांधी पुन्हा एक टी-ब्रेक घेतात. यानंतर कॉर्नर मीटिंग असेल तर ते नागरिकांना संबोधित करतात. यानंतर रात्रीचं जेवण असतं. काही वेळा ते प्रवाशांसोबत जेवण करतात. त्यानंतर रात्री कोणालाही भेटत नाहीत. राहुल गांधी रात्री झोपण्यापूर्वी सुमारे एक तास अभ्यास करतात. रात्री 11च्या सुमारास राहुल गांधी झोपायला जातात. त्यांची रोजची झोप सुमारे साडेपाच ते सहा तासांची असते. यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा नवीन दिवस सुरू होतो.

हे वाचा - झटका आळस! लवकर उठाल तर राहाल स्ट्रेस फ्री; पहा काय सांगतं संशोधन?

व्यायामाला सुट्टी नाही

दिवसभर प्रवास करूनही राहुल गांधी आपला नित्य व्यायाम विसरत नाहीत. दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते पुश-अप्स, सिट-अप्स, चिन-अप्स इत्यादी प्रकार करतात. याशिवाय रात्रीच्या जेवणानंतर 10 मिनिटं शतपावलीदेखील करतात.

वेळेचं काटेकोर पालन

यात्रेतले अनेक प्रवासी सांगतात की, राहुल गांधींच्या दिनचर्येत नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणाची वेळ ठरलेली असते. त्यात कधीही बदल होत नाही. तीन महिन्यांपासून हाच दिनक्रम आहे. सीताराम लांबा सांगतात, की पहाटे चार वाजता उठावंच लागतं. आणखी एक प्रवासी शत्रुघ्न शर्मा म्हणतात, की सुरुवातीला प्रवाशांना ही दिनचर्या कठीण वाटली; पण आता सवय झाली आहे. आता सर्व जण एकच दिनक्रम पाळतात.

हे वाचा - Gujarat Exit Poll Results : 'भारत जोडो'चा गुजरातमध्ये काँग्रेसला फायदा होणार का? काय सांगतात एग्झिट पोल

प्रवासी सांगतात, की जेव्हा हिवाळा वाढू लागला तेव्हा सकाळी सहाऐवजी सकाळी सात वाजता प्रवास सुरू करण्याचा प्रस्ताव आला होता; मात्र, प्रत्येक वेळी राहुल गांधींनी नकार दिला. सकाळी सहा वाजताचा प्रवास मॉर्निंग वॉक असल्याचं राहुल मानतात. त्यामुळे हिवाळ्यातही प्रवास सुरू करण्याची वेळ सकाळी सहाच ठेवली आहे.

उशीर झाल्यास प्रवेश नाही

प्रवासात जिथे जिथे रात्रीचा मुक्काम आहे, तिथे 16 फिरती वॉशरूम आहेत. यातली एक वॉशरूम राहुल गांधींसाठी राखीव आहे. बहुतेक जण पहाटे 4 ते 4.30 च्या सुमारास उठतात. प्रत्येकानं साडेपाच वाजता ध्वजारोहणासाठी पोहोचणं आवश्यक असतं. उशीर झाल्यास प्रवेश दिला जात नाही. कंटेनर हाउसमध्ये राहुल गांधींशिवाय 146 जणांच्या राहण्याची सोय आहे. ध्वजारोहणानंतर सहा वाजता राहुल गांधींचा प्रवास सुरू होतो. प्रवासी उतरल्यानंतर कंटेनर लॉक करून पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी पाठवले जातात.

आरोग्यात सुधारणा

राजस्थान युवा मंडळाचे अध्यक्ष आणि भारत जोडो यात्रेतले प्रवासी सीताराम लांबा यांनी सांगितलं, की या प्रवासाचा प्रवाशांच्या फिटनेसवरही परिणाम झाला आहे. जे किरकोळ आजारी होते, ज्यांना मधुमेह होता, तेही तंदुरुस्त झाले. दिनचर्या आणि वातावरण खूप छान आहे. प्रवासादरम्यान वेगवेगळ्या भाषा आणि प्रांतांचे लोक एकमेकांशी बोलतात. ज्यांना भाषा येत नाही ते एकमेकांशी हातवारे करत बोलतात. प्रवासात एक मिनी इंडिया तयार झाला आहे.

First published:

Tags: Bharat Jodo Yatra, Rahul gandhi, Rahul Gandhi (Politician)