नवी दिल्ली, 31 मे: नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राष्ट्रपती भवनात झालेल्या भव्य अशा कार्यक्रमात दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पंतप्रधान मोदींसह त्यांच्या सरकारमधील 57 मंत्र्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. या शपथविधी कार्यक्रमानंतर मोदी सरकारच्या पहिल्या कॅबिनेटची बैठक शुक्रवारी संध्याकाळी होणार आहे. ही बैठक साऊथ ब्लॉगमध्ये होण्याची शक्यता आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या कॅबिनेट बैठकीत मंत्रालयांचे वाटप होऊ शकते. मोदी सरकार 2.0 मध्ये एकूण 57 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. यात 24 कॅबिनेट मंत्री, 24 राज्य मंत्री तर 9 राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) आहे. मोदींनी यावेळी मंत्रिमंडळात 20 नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
वाचा- नरेंद्र मोदींचं 58 मंत्र्यांचं मंडळ एका क्लिकवर : स्मृती इराणी सर्वांत तरुण मंत्री
केंद्रीय मंत्री म्हणून भाजपचे अध्यक्ष अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, डी.व्ही.सदानंद गौडा, निर्मला सीतारमण आणि रामविलास पासवान यांचा समावेश आहे. शपथविधी कार्यक्रमात नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शहा, गडकरी आणि पासवान यांनी हिंदीत तर गौडा, निर्मला सीतारमण यांनी इंग्रजीत शपथ घेतली. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मंत्री असलेल्या सुषमा स्वराज, अरुण जेटली, राज्यवर्धन सिंह राठोड आणि मेनका गांधी यांचा यंदाच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाही.
या शपथविधी सोहळ्यासाठी देश-परदेशातून तब्बल 8 हजार पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले होते. बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ, भूतान यांचा समावेश असलेल्या ‘बिमस्टेक’ देशांचे प्रमुख उपस्थित होते. शिवाय, सिनेसृष्टीतील तारे-तारकांनीही सोहळ्याला हजेरी लावली. संध्याकाळी जवळपास 7 वाजता सुरू झालेल्या शपथविधी सोहळ्याची सांगता रात्री 8.05 वाजता करण्यात आली.
हे देखील वाचा- 'मैं ईश्वर की शपथ लेता हूं कि...', नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान
या सोहळ्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि अन्य दिग्गजही उपस्थित होते.
शरद पवार काँग्रेसचे नवे अध्यक्ष? राहुल गांधींसोबतच्या भेटीचा EXCLUSIVE VIDEO