मध्य प्रदेशात भाजपचं सरकार नाही येणार; कमलनाथ खेळणार हा मास्टरस्ट्रोक?
ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिलेल्या हादऱ्यानं काँग्रेस अडचणीत आलं आणि मध्य प्रदेशात कमळ फुलणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पण मुख्यमंत्री कमलनाथ डॅमेज कंट्रोलचा भाग म्हणून मास्टरस्ट्रोक खेळण्याच्या पवित्र्यात आहेत.
भोपाळ, 10 मार्च : मध्य प्रदेशात ज्योतिरकादित्य शिंदे यांनी राजकीय भूकंप घडवला. ज्योतिरादित्य यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. त्यापाठोपाठ ज्योतिरादित्य समर्थक 21 आमदारांनीही राजीनामा दिला आणि मध्य प्रदेशातलं कमलनाथ सरकार अडचणीत आलं. ज्योतिरादित्य यांनी दिलेल्या हादऱ्यामुळे काँग्रेस अडचणीत आली आहे.
मध्य प्रदेशात कमळ फुलणार असल्याचे संकेत मिळत असतानाच कमलनाथ डॅमेज कंट्रोलचा भाग म्हणून मास्टरस्ट्रोक खेळण्याच्या पवित्र्यात आहेत. मध्य प्रदेश सरकारमधले ज्येष्ठ मंत्री आणि कमलनाथ समर्थक नेते पी. सी. शर्मा यांनी तसे स्पष्ट संकेत माध्यमांशी बोलताना दिले. विधानसभेतल्या संख्याबळावरून त्यांना प्रश्न विचारला असता शर्मा म्हणाले, "त्यांच्याकडे संख्याबळ असेल तर आमच्याकडेही उपाय आहे. कुछ नया होने वाला है. कमलनाथ यांचा मास्टरस्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळेल."
#MadhyaPradesh Congress leader PC Sharma on if they have the numbers: Certainly a new thing will come up. You will get to see Kamal Nath's masterstroke. pic.twitter.com/ARBEQqW8lg
शर्मा यांनी काँग्रेस नेमकं काय करणार हे सांगितलं नाही. कमलनाथ दिल्लीत सोनिया गांधी यांना भेटून आल्यानंतर भोपाळमध्ये तळ ठोकून आहेत. आता शर्मा यांच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
कमलनाथ यांचा मास्टरस्ट्रोक काय असणार यावर राजकीय विश्लेषक वेगवेगळे तर्क लढवत आहेत. यापैकी सर्वात जास्त शक्यता असलेला पर्याय म्हणजे कमलनाथ सरकारमधले सर्वच आमदार राजीनामा देणार. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सर्वांचाच राजीनामा घेतला, तर सहाजिकच विधानसभाच विसर्जित होईल. अशा परिस्थितीत भाजपकडे सरकार थेट जाऊ शकणार नाही. त्याऐवजी राज्यात फेरनिवडणुका घ्याव्या लागतील.
कमलनाथ यांचा हा मास्टरस्ट्रोक खरंच ठरला तर राज्यात मध्यावधी निवडणुका होतील. भाजप आणि काँग्रेस कुणालाच सहज काही हाती लागणार नाही. पक्षफुटीचा तोटा काँग्रेसला होईल पण त्याबरोबर सहानुभूतीचीही शक्यता आहे. त्यामुळे हाच पर्याय कमलनाथ शेवटचा म्हणून स्वीकारतील, असं काही विश्लेषकांचं म्हणणं आहे. तसं झालं तर मध्य प्रदेशात ऑपरेशन लोटसचे सध्याचे प्रयत्न तरी अपुरे पडतील आणि त्यांनाही त्यांची रणनीती बदलावी लागेल. कमळ फुलण्याची शक्यता दिसायला अजून वेळ लागेल.