भोपाळ, 10 मार्च:मागील काही महिन्यांपासून नाराज असलेले काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्ष सदस्यत्वाच राजीनामा दिल्याने मध्य प्रदेशात राजकीय भूकंप आला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशभरात रंगोत्सवाची धूम असताना दिल्लीसह मध्य प्रदेशात राजकीय वातावरण तापलं आहे.
दुसरीकडे, मध्य प्रदेशातील काँग्रेसचं सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी खटपट सुरु केली आहे. मध्य प्रदेशात बंडखोरी करणारे 6 मंत्री हटवण्याबाबत मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज्यपालांना पत्र पाठवले आहे. इमरती देवी, तुलसी सिलावट, गोविंद सिंह राजपूत, महेंद्र सिंह सिसोदिया, प्रद्युमन सिंह तोमर आणि डॉ. प्रभुराम चौधरी या मंत्र्यांचा या पत्रात उल्लेख आहे. मध्य प्रदेशातल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा..मध्यप्रदेशात ‘कमळ’फुलणार, ज्योतिरादित्य समर्थक 20 आमदारांचे राजीनामे
Chief Minister Kamal Nath writes to Madhya Pradesh Governor, recommends the immediate removal of six ministers. pic.twitter.com/wcUxg6LKLt
— ANI (@ANI) March 10, 2020
मध्यप्रदेशात ‘कमळ’फुलणार?
मध्यप्रदेशातलं काँग्रेसचं कमलनाथ सरकार संकटात सापडलं आहे. पक्षाचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर पक्षाच्या 20 आमदारांनीही राजीनामा दिलाय. त्यामुळे सरकार अल्पमतात आलं आहे. या आधीही ज्योतिरादित्य शिंदे यांना मानणाऱ्या काही मंत्री आणि आमदारांनी राजीनामा दिला होता. ते मंत्री आणि आमदार बंगळुरमध्ये असल्याचं बोललं जातं आहे. भाजपचे पक्ष प्रभारी खासदार विनय सहस्त्रबुद्धे हे तातडीने भोपाळमध्ये दाखल झाले आहेत. तर दिल्लीतून तातडीने भोपाळमध्ये दाखल झालेले मुख्यमंत्री कमलनाथ हे डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न करत आहेत. मात्र परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर गेल्याचा अंदाज राजकीय क्षेत्रात व्यक्त केला जात आहे. त्यामुळे मध्यप्रदेशात कमळ फुलणार असल्याचं संकेत मिळत आहे.
हेही वाचा..काँग्रेसमध्ये भूकंप, ज्योतिरादित्य शिंदे यांचा राजीनामा
काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे हे गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले होते. तिथे तिनही नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला. ज्योतिरादित्य हे सायंकाळी भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. तर ते स्वतंत्र पक्ष काढतील असंही बोललं जातंय. या आधी मध्यप्रदेश सरकारमधल्या शिंदे समर्थकांनी राजीनामे दिले आहेत. कर्नाटक नंतर आता मध्यप्रदेशमध्ये सत्तेचं नाट्य रंगलं आहे. आता या नाट्याला आज गंभीर वळण मिळालं आहे. कमलनाथ सरकारच्या तब्बल 22 मंत्र्यांनी राजीनामे दिले आहे. एकाचवेळी 22 मंत्र्यांनी राजीनामे दिलेल्यामुळे काँग्रेस अडचणीत सापडले आहे. तर आमदारांनी पक्ष सोडू नये म्हणून त्यांना मंत्रिपदाचं आमीष दाखवलं जात असल्याचं बोललं जातं आहे.