नवी दिल्ली, 11 मार्च : मध्य प्रदेशच्या राजकारणाला धक्का देत काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करताना ज्योतिरादित्य शिंदे भावुक झाले. 'माझं आयुष्य बदलणारं नवं वळण मी घेतलं आहे', असं सांगताना त्यांनी वडील माधवराव शिंदे यांची आठवण काढली. 'काँग्रेस पूर्वीची राहिलेली नाही. पक्ष बदलला आहे. त्यामुळे मी गेले काही दिवस व्यथित होतो. म्हणूनच मोठा निर्णय घ्यावा लागला', असं सांगताना ज्योतिरादित्य यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाबद्दल विश्वास दर्शवला. 'देशाचं भवितव्य पंतप्रधान मोदींच्या हाती सुरक्षित आहे', असं ते म्हणाले.
"आयुष्यात अशी काही वळणं येतात, ज्याने आयुष्य बदलून जातं. तसे माझ्या आयुष्या 2 दिवस महत्त्वाचे ठरले. पहिला दिवस 30 सप्टेंबर 2001 - ज्या दिवशी मी माझ्या पूजनीय वडिलांना गमावलं. या दिवसाने माझं आयुष्य बदललं. त्याबरोबर दुसरी तारीख 10 मार्च 2020. त्यांच्या 75 व्या जयंतीचा दिवस. जीवनात नवं वळण या दिवशी घेण्याचा निर्णय मी घेतला", असं ज्योतिरादित्य म्हणाले.
संबधित - मध्य प्रदेशात भाजपचं सरकार नाही येणार; कमलनाथ खेळणार हा मास्टरस्ट्रोक?
दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात त्यांनी पक्षात प्रवेश केला. जे. पी. नड्डा, विनय सहस्रबुद्धे, धर्मेंद्र प्रधान, मध्य प्रदेश बी. डी. शर्मा आदी उपस्थित होते.
"माझ्या आयुष्याचं ध्येय जनसेवा हेच होतं. सदैव मी मानलं की, भारत मातेच्या सेवेसाठी, जनसेवेसाठी राजकारण असावं. फक्त लक्ष्यपूर्तीचं माध्यम राजकारण असावं. गेल्या 18-20 वर्षांत मी श्रद्धेने देशाची सेवा करण्याचा प्रयत्न केला. पण आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याने मी व्यथित झालो आहे. दुःखी झालो आहे. सध्या काँग्रेसमध्ये सध्या जी स्थिती आहे - पूर्वीसारखी नाही."
वाचा - शिंदे घराण्याचं काँग्रेसशी नातं : संजय गांधींच्या प्लेन क्रॅशशी असा होता संबंध
"वास्तवाला नाकारणं, नव्या विचारांना जागा न देणं, नव्या नेतृत्वाला मान्यता न मिळणं या वातावरणात काम करणं अवघड आहे. राष्ट्रीय स्तरावर हीच स्थिती आहे. तीच स्थिती माझ्या राज्यात - मध्य प्रदेशात आहे", असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर टीका केली.
"2018मध्ये सरकार स्थापन झालं तेव्हा स्वप्न पाहिलं होतं. 18 महिन्यात सगळी स्वप्नं विस्कटली. शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं अजूनही पूर्ण करू शकलेलो नाही. मी स्वतः मंदसौरच्या घटनेसाठी सत्याग्रह केला होता. शेतकऱ्यांसाठी अद्याप काहीच झालं नाही. रोजगार नाही, वचनपत्रात म्हटलं होतं तो निधी अद्याप दिलेला नाही", असं म्हणत त्यांनी थेट कमलनाथ सरकारला लक्ष्य केलं.
भाजपत प्रवेश करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमनं उधलली. "भारताला विकासाच्या मार्गावर न्यायचं असेल तर दूरदृष्टी हवी. पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहा यांनी अशा विकासासाठी मंच दिला आहे. त्याच्या आधारे मी जनसेवा आणि राष्ट्रसेवा करू शकेन. जगात असा जनादेश कुठल्या नेत्याला मिळाला नसेल, तेवढा मोदींना मिळाला. दुसऱ्यांदा ते निवडून आले. त्यांच्यासारखा सक्रिय, प्रचंड क्षमता असलेला, समर्पित वृत्तीने काम करणारा आणि भविष्यातल्या आव्हानं ओळखून दिशा देणारा नेता दुसरा नाही. त्यांच्या हाती भारताचं भविष्य सुरक्षित आहे", असं ज्योतिरादित्य म्हणाले.
अन्य बातम्या
ज्योतिरादित्यंना कुटुंबियांची साथ; मुलगा म्हणाला, वडिलांच्या निर्णयाचा अभिमान
ज्योतिरादित्य शिंदे यांचा राजीनामा, मात्र सचिन पायलट ट्रेंडिंगमध्ये!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.