नवी दिल्ली, 17 जून : लडाख सीमेवर (Ladakh Border) वर भारत-चीन संघर्षामुळे (India-China Rift) व्यापारी संघटना असणाऱ्या कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT)ने देशामध्ये चिनी उत्पादकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याकरता CAIT ने 500 हून अधिक कॅटेगरीतील उत्पादकांची यादी जाहीर केली आहे. लडाखमध्ये चीनी सैनिकांनी भारतीय सैनिकांवर केलेल्या हल्ल्यावर देशभरातील व्यापाऱ्यांनी टीकी केली आहे. चीनला संधी मिळाल्यावर ते भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देतात, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे. भारत आणि चीन यांच्यामध्ये तब्बल 45 वर्षांनी एवढा मोठा संघर्ष झालेला पाहायला मिळाला. गलवान खोऱ्यात (galwan valley) सुरू झालेला हा सीमा वाद आता दोन्ही देशातील संबंध आणखी बिघडवू शकतो.
(हे वाचा-भारत-चीन संघर्षावर अशी होती आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांची प्रतिक्रिया)
भारत- चीन सीमेवर सोमवारी रात्रीपासून झालेल्या हिंसक कारवायांमध्ये भारताच्या बाजूच्या किमान 20 सैनिकांचा मृत्यू झाल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितलं आहे. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. चीनचे किमान 43 सैनिक जखमी किंवा मृत्युमुखी पडले असण्याची शक्यता आहे, असंही वृत्तसंस्थेने म्हटलं आहे.
चीनची भूमिका देशहिताविरोधात असल्याने CAIT ने चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा आणि भारतीय उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी कॅटने 'भारतीय सामान, हमारा अभिमान' या अभियानाअंतर्गत 500 हून अधिक कॅटेगरीतील उत्पादनांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये 3000 पेक्षा जास्त उत्पादकांचा समावेश आहे, जे चीनमध्ये तयार होतात आणि भारतात आयात केले जातात.
(हे वाचा-'त्या' 3 तासात नेमकं काय घडलं, गलवान खोऱ्यातील INSIDE STORY)
या अभियानाच्या पहिल्या चरणात कॅटने या वस्तूंवर बहिष्कार टाकला आहे. या 500 कॅटेगरीमध्ये समावेश असणाऱ्या 3000 वस्तूंमध्ये रोजच्या वापरातील वस्तू, खेळणी, फर्निशिंग फॅब्रिक, टेक्सटाइल, बिल्डर हार्डवेअर, फुटवेअर, गारमेंट, स्वयंपाक घरात लागणाऱ्या वस्तू, लगेज, हँड बॅग, कॉस्मेटिक्स, गिफ्ट आयटम, इलेक्ट्रिकल तसंच इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन अपॅरल, खाण्याच्या काही वस्तू, घड्याळं, काही प्रकारचे दागिने,, वस्त्र, स्टेशनरी, कागद, फर्नीचर, लायटिंग, हेल्थ प्रोडक्ट्स, पॅकेजिंग प्रोडक्ट, ऑटो पार्ट्स, यार्न, फेंगशुई आयटम्स, दिवाळी तसंच होळीसाठी लागणारं सामान, चश्मा, टेपेस्ट्री मटेरियल यांचा समावेश आहे.
(हे वाचा-मुलाचा अभिमान आहे; भारत-चीन चकमकीत शहीद कर्नल यांच्या आईने व्यक्त केली भावना)
कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भरतिया आणि राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी कॅटचे हे अभियान स्पष्ट केले आहे. त्यांनी अशी माहिती दिली की, चीनमधून वार्षिक 5.25 लाख कोटी अर्थात 70 बिलियन डॉलरची आयात केली जाते. सुरूवातीच्या टप्प्यात 3000 वस्तूंवर बहिष्कार टाकला जाणार आहे. या वस्तू भारतात देखील बनतात मात्र चीनच्या वस्तू अधिक स्वस्त असल्याने त्यांची आयात केली जाते. भारत या वस्तुंवर चीनवर अवलंबता कमी करू शकतो. चीनमध्ये बनणाऱ्या वस्तू भारतात आयात होऊ नये हे या अभियानेचे उद्दिष्ट असल्याचे खंडेलवाल म्हणाले. कॅट हा विषय केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्यापुढे मांडणार आहे आणि या वस्तू भारतात निर्मित करण्यासाठी सरकारने देशातील लघू उद्योग, स्टार्टअप आणि अन्य उद्योगांना मदत द्यावी याकरता आग्रह देखील करणार आहे.
संपादन - जान्हवी भाटकर