Home /News /national /

पाकपासून अमेरिकेपर्यंत भारत-चीन संघर्षावर अशी होती आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांची प्रतिक्रिया

पाकपासून अमेरिकेपर्यंत भारत-चीन संघर्षावर अशी होती आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांची प्रतिक्रिया

भारत- चीन सीमेवर सोमवारी रात्रीपासून झालेल्या हिंसक कारवायांमध्ये भारताच्या बाजूच्या किमान 20 सैनिकांचा मृत्यू झाल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितलं आहे.

    नवी दिल्ली, 17 जून : भारत-चीन (india-china) यांच्यात तब्बल 45 वर्षांनी एवढा मोठा संघर्ष झालेला पाहायला मिळाला. गलवान खोऱ्यात (galwan valley) सुरू झालेला हा सीमा वाद आता दोन्ही देशातील संबंध आणखी बिघडवू शकतो. भारत- चीन सीमेवर सोमवारी रात्रीपासून झालेल्या हिंसक कारवायांमध्ये भारताच्या बाजूच्या किमान 20 सैनिकांचा मृत्यू झाल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितलं आहे. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. चीनचे किमान 43 सैनिक जखमी किंवा मृत्युमुखी पडले असण्याची शक्यता आहे, असंही वृत्तसंस्थेने म्हटलं आहे. या परिसरात 1962 साली 33 भारतीय सैनिक शहीद झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा गेल्या काही दिवसांपासून सीमावाद धुमसत होता. त्यामधून सोमवारी रात्री धुमश्चक्री झाली. दरम्यान, आंतरराष्ट्रीय मीडियानेही भारत-चीन प्रकरणाला महत्त्व दिल्याचं दिसून आलं. पाकिस्तानच्या डॉनपासून ते गार्डियन, वॉशिंग्टन पोस्ट, सीएनन, न्यूयॉर्क टाइम्स, बीबीसी यांनी कोणत्याही एका देशाची बाजू न घेता या प्रकरणावर भाष्य केलं. वाचा-'त्या' 3 तासात नेमकं काय घडलं, गलवान खोऱ्यातील INSIDE STORY पाकिस्तानच्या डॉन (Dawn) या वृत्तसंस्थेनं, दोन न्यूक्लिअर पॉवर देशांमधील आतापर्यंतची सर्वात मोठी चकमक अशा शब्दात भारत-चीन सीमा वादाचे वर्णन केले. दरम्यान पाकचे परराष्ट्र मंत्री शाह महम्मुद कुरेशी यांनी, या वादाला भारत जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. तर, गार्डियन (Guardian) या वृत्तपत्रानं 45 वर्षांनंतरची सर्वात मोठी चकमक, असे वर्णन करत 20 भारतीय जवानांच्या मृत्यूचीही नोंद घेतली आहे. न्यूयॉर्क टाईम्स (NY times) या वृत्तपत्रानं वादग्रस्त भारत-चीन सीमेवर दशकातील सर्वात भयंकर संघर्ष असा उल्लेख केला आहे. त्याचबरोबर भारतीय जवानांच्या शहीद होण्याची दखल घेण्यात आली आहे, मात्र यात चिनी सैन्याबाबत कोणतीही माहिती नाही आहे. तर, अमेरिकेच्या वॉशिंग्टन पोस्ट (Washinton Post) या वृत्तपत्रानं, 45 वर्षांत चिनी सैन्याविरुद्ध झालेल्या पहिल्या प्राणघातक चकमकीत 20 भारतीय सैनिक ठार, अशा हेडलाईनसह ही बातमी प्रसिद्ध केली आहे. सीएनएननं (CNN) वादग्रस्त सीमेवर चीनशी झालेल्या चकमकीत 20 भारतीय सैनिक ठार, असं म्हणत या वादावर भाष्य केलं आहे. तर, बीबीसीनं (BCC) आपल्या रिपोर्टमध्ये या वादाबाबत विस्तृत माहिती दिली आहे. बीबीसीनं दिलेल्या रिपोर्टमध्ये नकाशासह या भारत-सीमेवरील वादा यावर माहिती दिली आहे. भारत-चीनमध्ये नेमकं काय घडलं? दैनिक भास्करनं दिलेल्या वृत्तानुसार सोमवारी रात्री गलवान खोऱ्यात पेट्रोलिंग पॉईंट 14 जवळ संभाषण सुरू असताना हा हल्ला करण्यात आला. यामध्ये गोळीबार नाही तर तुफान दगडफेक आणि काठीने मारहाण करण्यात आली. जवळपास तीन तास ही धुमश्चक्री सुरू होती. चीन सैनिकांनी केलेल्या हल्लाला भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिलं. गलवान खोऱ्यात दोन्ही देशांचे सैनिक जखमी आहेत तर काही जण बेपत्ता असल्याचंही सांगितलं जात आहे. या संपूर्ण घटनेवर मात्र चीननं मात्र अजून कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण दिलं नाही. वाचा-मोठी बातमी! भारत - चीन सीमेवर किमान 20 सैनिक शहीद, चीनच्या बाजूचंही झालं नुकसान संपादन-प्रियांका गावडे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या