लडाख, 17 जून : गलवान खोऱ्यात सीमा वाद थांबण्याच नाव घेत नाही आहे. चर्चेतून हा विवाद सोडवण्यात यावा यासाठी भारताकडून प्रयत्न सुरू असतानाच विश्वासघात करण्यात आला. सोमवारी रात्री शांततापूर्ण चर्चेसाठी चीन सैनिकांना भेटण्यासाठी गेलेल्या भारतीय सैन्यातील अधिकाऱ्यांवर चीनच्या सैनिकांनी हल्ला केला. तब्बल तीन तास ही हिंसक झडप सुरू होती. चीनच्या सैनिकांनी पहिल्यांचा हल्ला करत दगडफेक केली आणि त्यानंतर काठीनं मारहाण करण्यास सुरुवाद केली आणि हा वाद पेटला.
चीननं पुन्हा एकदा गलवान खोऱ्यात मोठा धोका दिला. या परिसरात 1962 साली 33 भारतीय सैनिक शहीद झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा गेल्या काही दिवसांपासून सीमावाद धुमसत होता. त्यामधून सोमवारी रात्री धुमश्चक्री झाली. भारत- चीन सीमेवर सोमवारी रात्रीपासून झालेल्या हिंसक कारवायांमध्ये भारताच्या बाजूच्या किमान 20 सैनिकांचा मृत्यू झाल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितलं आहे. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. चीनचे किमान 43 सैनिक जखमी किंवा मृत्युमुखी पडले असण्याची शक्यता आहे, असंही वृत्तसंस्थेने म्हटलं आहे.
हे वाचा-लडाख सीमेवर भारत-चीनमध्ये झालेल्या चकमकीचं कारण आलं समोर, 3 जवान शहीद
त्या रात्री नेमकं काय घडलं?
दैनिक भास्करनं दिलेल्या वृत्तानुसार सोमवारी रात्री गलवान खोऱ्यात पेट्रोलिंग पॉईंट 14 जवळ संभाषण सुरू असताना हा हल्ला करण्यात आला. यामध्ये गोळीबार नाही तर तुफान दगडफेक आणि काठीने मारहाण करण्यात आली. जवळपास तीन तास ही धुमश्चक्री सुरू होती. चीन सैनिकांनी केलेल्या हल्लाला भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिलं. गलवान खोऱ्यात दोन्ही देशांचे सैनिक जखमी आहेत तर काही जण बेपत्ता असल्याचंही सांगितलं जात आहे. या संपूर्ण घटनेवर मात्र चीननं मात्र अजून कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण दिलं नाही.
हे वाचा-लडाख सीमेवर भारत-चीन चकमक; मोदी सरकारची पहिली प्रतिक्रिया
संपादन- क्रांती कानेटकर