नवी दिल्ली, 15 जानेवारी: देशातील सगळ्यात मोठं राज्य असणाऱ्या उत्तर प्रदेशचं (Uttar Prdesh) चार वेळा मुख्यमंत्रिपद भूषविलेल्या आणि बहुजन समाज पार्टीच्या (BSP) अध्यक्षा मायावती (Mayawati) यांचा आज 65 वा वाढदिवस (Birthday) आहे. उत्तर प्रदेशच्या अत्यंत आव्हानात्मक राजकारणातही आपलं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या मायावती यांची राजकीय कारकीर्द अत्यंत विलक्षण प्रभावी आहे. एक शिक्षिका ते राज्याची मुख्यमंत्री, एका बलाढ्य पक्षाच्या नेत्या असा त्यांचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. त्यांची राजकीय कारकीर्दही नेहमीच वादग्रस्त आणि नाट्यमय राहिली आहे. त्यांच्या या प्रवासातील काही ठळक घटनांची नोंद घेत त्यांचा जीवनपट उलगडून दाखवणारा हा लेख.
मायावती यांचं मूळ गाव गौतमबुद्धनगर जिल्ह्यातील बादलपूर हे आहे. त्यांचे वडील प्रभुदयाल सरकारी कर्मचारी होते. गेल्या वर्षी त्यांचं निधन झालं. मुलांच्या शिक्षणासाठी प्रभुदयाल दिल्लीत आले. मायावती आणि त्यांच्या भावंडांचं शिक्षण दिल्लीत झालं. मायावती यांनी शिक्षकी पेशाची निवड केली आणि त्या शिक्षिका म्हणून काम करू लागल्या. त्यांच्या वडिलांची इच्छा त्यांनी आयएएस अधिकारी व्हावं अशी होती, मात्र राजकारणात शिरून त्या राज्याच्या सर्वोच्च पदावर पोहोचल्या.
(हे वाचा- IND vs AUS : नटराजनचा विक्रम, हा रेकॉर्ड करणारा पहिलाच भारतीय)
बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीराम (Kanshiram) यांच्या संपर्कात आल्यावर मायावती यांनी राजकारणात प्रवेश केला. 1989 मध्ये पहिल्यांदा त्या खासदार बनल्या, तर 1995 मध्ये उत्तर प्रदेशच्या अनुसूचित जातीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनण्याचा मान त्यांनी पटकावला. 2001 मध्ये कांशीराम यांनी त्यांना आपल्या पक्षाच्या वारसदार नेमलं. बदलत्या परिस्थितीत बहुजन समाज पार्टीचं अस्तित्व टिकवण्याचं सगळं श्रेय मायावती यांना जातं. अतिशय कडक आणि प्रभावी शासक म्हणून मायावती यांची ओळख आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत पक्षातील जुन्या नेत्यांना पक्षाशी बांधून ठेवणं आणि मतदार टिकवणं हे त्यांच्यासमोरचं मोठं आव्हान आहे.
राजकारणात त्यांनी अनेक चढ-उतार अनुभवले. मायावती यांच्याबाबतीत घडलेली एक दुर्दैवी घटना त्याच काय पण उत्तर प्रदेशची जनता आजही विसरू शकलेली नाही. उत्तर प्रदेशमधील राजकारणातील तो एक काळा दिवस आहे. या घटनेमुळं राजकारण कोणत्या थराला जाऊ शकतं, हे जनतेनं याची देहि याची डोळा अनुभवलं. 1995 मध्ये बसपानं (BSP) समाजवादी पार्टीशी (SP) युती करून सत्ता मिळवली होती. समाजवादी पार्टीला 109 तर बसपाला 67 जागा मिळाल्या होत्या. बसपाच्या पाठिंब्यावर मुलायमसिंग यादव मुख्यमंत्री बनले, मात्र दोन्ही पक्षांमधील कुरबुरीमुळे बसपानं आपला पाठींबा काढून घेतल्यानं मुलायमसिंग यांचं सरकार अल्पमतात आलं.
(हे वाचा- Indian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका...’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा!)
सत्ता टिकवण्यासाठी सपानं मायावतींशी वाटाघाटी सुरू केल्या, मात्र वाटाघाटी निष्फळ ठरल्या. मायावती यांच्या जीवनावर आधारित अजय बोस यांचं पुस्तर 'बहनजी'नुसार, सपाचे नाराज कार्यकर्ते लखनऊतील मीराबाई मार्गावर असलेल्या शासकीय गेस्ट हाऊसवर (Guest House) पोहोचले जिथं मायावती राहत होत्या. मायावतींवर चिडलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी लाठ्या काठ्या, शस्त्रं घेऊन त्यांच्या खोलीकडं धाव घेतली. परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली होती. मायावती खोलीची दारं-खिडक्या लावून आत बसल्या होत्या, पण संतप्त कार्यकर्ते दरवाजा तोडण्याच्या तयारीत होते. त्यावेळी भाजपचे आमदार ब्रह्मदत्त द्विवेदी तिथं पोहोचले आणि त्यांनी ठी घेऊन त्यांनी त्या शस्त्रधारी जमावाला तोंड दिलं आणि मायावती एका भयंकर संकटातून वाचल्या. घटना गेस्ट हाउस प्रकरण म्हणून ओळखली जाते.
द्विवेदी हे एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते. मायावती यांनी त्या घटनेनंतर कायम ब्रह्मदत्त द्विवेदी यांना आपला मोठा भाऊ मानलं. भाजपच्या विरोधात असणाऱ्या मायावतींनी त्यांच्याविरोधात मात्र कधीही आपला उमेदवार उभा केला नाही. फरुखाबादमध्ये त्या स्वतः द्विवेदी यांच्या प्रचारासाठी गेल्या होत्या. कालांतराने ब्रह्मदत्त द्विवेदी यांची गोळी घालून हत्या करण्यात आल्यानंतर मायावती त्यांच्या घरी सांत्वनासाठी गेल्या होत्या, तेव्हा देखील त्या खूप रडल्या होत्या.
या घटनेनंतर मायावती आणि मुलायमसिंग यादव यांच्यातील संबंध खूपच बिघडले. तरीही 2019 च्या लोकसभा निवडणूकीसाठी त्यांनी समाजवादी पक्षाशी युती केली. या निवडणूकीत 2014 मध्ये शून्य जागा मिळवणाऱ्या बसपानं दहा जागा मिळवल्या, मात्र समाजवादी पक्षाला जेमतेम 5 जागा मिळवता आल्या, त्यामुळं या अपयशाचं खापर अखिलेश यादव यांच्यावर डोक्यावर फोडून मायावती यांनी युती तोडली.
(हे वाचा- फक्त 20 महिन्यांच्या गोंडस चिमुकलीनं मरताना वाचवले पाच जणांचे प्राण...)
1995 ते 2012 या कालावधीत मायावती यांनी चार वेळा मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली. 1995 नंतर 1997 मध्ये त्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनल्या. 3 मार्च 2002 रोजी त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर, 13 मे 2007 रोजी चौथ्या वेळी त्यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रं हाती घेतली, 14 मार्च 2012 पर्यंत त्या या खुर्चीवर विराजमान होत्या. त्यानंतर मात्र जनतेनं भाजपला कौल दिल्यानं गेली दहा वर्षे मायावती आपला पक्ष टिकवण्यासाठी संघर्ष करत आहेत. आता 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणूकीत त्यांचा पक्ष कशी कामगिरी करतो हे पाहणं औत्स्युक्याचे ठरेल. 30 वर्षांच्या कारकिर्दीत चार वेळा मायावती यांना निवडणूकीत हार पत्करावी लागली आहे, त्याचवेळी पक्षातील बंडखोर नेत्यांनाही हाताळावे लागले आहे. 2012 पासून, उमेदवारी देण्यासाठी मायावती पैशाची मागणी करत असल्याचा आरोप करत, बसपातील अनेक ज्येष्ठ नेते पक्ष सोडून गेले आहेत. तरीही मायावती यांनी आपले मतदार टिकवून ठेवले आहेत, पण त्यांना निवडणूकीत जागा मिळवता आलेल्या नाहीत.
अनेक घोटाळे, वादग्रस्त निर्णय यामुळं मायावती यांची मुख्यमंत्री पदाची कारकीर्दही झाकोळली गेली, मात्र दर वेळी त्या नव्या जोमानं पुढं येत राहिल्या. त्यामुळं उत्तर प्रदेशसारख्या भल्या मोठ्या राज्यात पुरुष प्रधान राजकारणात आपलं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या मायावती यांची वाटचाल नक्कीच प्रेरणादायी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.