नवी दिल्ली, 15 जानेवारी : ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका’, असा थेट इशारा लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे (Army chief Gen MM Naravane) यांनी चीनला दिला आहे. सेना दिवसाच्या (Army Day) निमित्तानं ते बोलत होते. राजधानी दिल्लीमध्ये करिअप्पा परेड ग्राऊंडमध्ये परेडचं निरीक्षण तसंच सैनिकांना शौर्य पुरस्कार दिल्यानंतर ते बोलत होते.
‘बलिदान व्यर्थ जाणार नाही’
गेल्या वर्षभरात चीन सोबत उत्तर सीमेवर निर्माण झालेल्या तणावामुळे भारतीय लष्करासमोर नवं आव्हान निर्माण झालं आहे. लष्करप्रमुखांनी त्याचा उल्लेख आपल्या भाषणात केला. “चीनशी सुरु असलेल्या संघर्ष तुम्हाला कल्पना आहे. चीनशी संघर्ष करताना गलवानमध्ये हुतात्मा झालेल्या सैनिकांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, असं मी देशाला आश्वासन देतो. भारतीय लष्कराच्या सन्मानाची कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आम्ही चर्चा आणि राजकीय वाटाघाटीमधून प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत, पण आमच्या धैर्याची कुणीही परीक्षा पाहू नये,’’ असा इशारा त्यांनी दिला.
पाकिस्तानला खडसावलं!
सेनाप्रमुखांनी या भाषणात पाकिस्तानला खडसावलं. “त्याचा नापाक हेतू यशस्वी होऊ देणार नाही. लष्करानं नियंत्रण रेषेवरील त्यांच्या कृतींना सडेतोड उत्तर दिलं आहे. दहशतववाद्यांना आश्रय देण्याची पाकिस्तानला खोड आहे. 300 ते 400 दहशतवादी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांचा हेतू कधीही पूर्ण होणार नाही, असं नरवणे यांनी सांगितलं.
आज का साजरा होतो Army Day?
15 जानेवारी 1948 रोजी लेफ्टनंट जनरल (नंतरचे फिल्ड मार्शल) के.एम. करिप्पा यांनी भारतीय सैन्याचे (Indian Army) पहिले कमांडर इन चीफ म्हणून पदभार स्विकारला होता. ब्रिटीश कमांडर सर फ्रान्सिस बूचर यांच्याकडून त्यांनी सूत्र हाती घेतली होती. त्याच्या स्मरणार्थ दरवर्षा 15 जानेवारी हा दिवस 'आर्मी डे' म्हणून साजरा केला जातो.
(हे वाचा-'...तर मी माघार घेते', मुंडेंवर केलेल्या आरोपानंतर मागे हटणार रेणू शर्मा?)
जगातील सर्वात शक्तीशाली लष्करापैकी एक असलेल्या भारतीय लष्करानं स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत पाच युद्ध जिंकली आहेत. त्याचबरोबर देशांतर्गत तसेच विदेशातही अनेक लष्करी ऑपरेशन यशस्वी केली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India china, Indian army