नवी दिल्ली, 9 डिसेंबर : न्यायव्यवस्थेतल्या उणिवांबाबत नेहमीच चर्चा होते; मात्र अनेक नागरिकही न्यायव्यवस्थेचा गैरवापर करतात व न्यायालयाचा वेळ वाया घालवतात. अशीच एक घटना आज सर्वोच्च न्यायालयात घडली. एका व्यक्तीनं यू-ट्यूबची मालक कंपनी असलेल्या गुगलविरोधात याचिका दाखल केली. यू-ट्यूबवरच्या सेक्शुअल जाहिरातींमुळे पोलीस भरती परीक्षेत अपयश आल्याचा आरोप त्याने केला होता. नुकसानभरपाई म्हणून गुगलने 75 लाख रुपये द्यावेत, असं त्या व्यक्तीने याचिकेत म्हटलं होतं; मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका रद्दबातल केली आणि न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याबद्दल याचिकाकर्त्यालाच दंड ठोठावला.
पोलीस भरतीत अपयश
याचिकाकर्ते आनंद किशोर चौधरी यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. मध्य प्रदेशातल्या पोलीस भरती परीक्षेमध्ये आपल्याला अपयश मिळण्यामागे यू-ट्यूबवरच्या सेक्शुअल जाहिराती कारणीभूत असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे यू-ट्यूबची मालक कंपनी असलेल्या गुगलने नुकसानभरपाईपोटी 75 लाख द्यावेत अशी मागणी त्यांनी याचिकेत केली होती. सर्वोच्च न्यायालयाने मात्र याबाबत त्यांनाच फटकारलं आहे. जनहितयाचिकेच्या गैरवापराचं हे उदाहरण असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
न्यायालयानं ठोठावला दंड
चौधरी यांची याचिका रद्द करून न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याबद्दल न्यायालयाने त्यांना एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. त्यावर चौधरी यांनी माफी मागून दंड माफ करण्याची विनंती केली; मात्र न्यायालयाने दंड भरावाच लागेल असं सांगून, ही याचिका लोकप्रियता मिळवण्यासाठीच दाखल केली असल्याचं म्हटलं. न्यायालयाने दंडाची रक्कम 1 लाख रुपयांवरून 25 हजार इतकी कमी केली.
हेही वाचा : कडाक्याच्या थंडीपासून बचाव करणारं अनोखं हीटर जॅकेट; हवं असेल तर 'येथे' खरेदी करू शकता
न्यायालयानं काय म्हटलं?
न्यायाधीश संजय किशन कौल आणि एस. ओक यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी केली. अशा याचिका म्हणजे जनहित याचिकेच्या गैरवापराचं सर्वोत्तम उदाहरण असल्याचं त्यांनी म्हटलं. ‘एखादी जाहिरात तुम्हाला आवडत नसेल, तुम्ही ती पाहू नका. मन भरकटवणारी जाहिरात पाहता कशाला? अशा प्रकारे याचिका करणं म्हणजे वेळ वाया घालवणं होतं. त्यामुळे याचिका रद्द ठरवून 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला जात आहे. ही रक्कम 4 आठवड्यांच्या आत भरावी लागेल,’ असं न्यायालयानं म्हटलं आहे.
हेही वाचा : या सोप्या Breathing Exercises बेली फॅट करतील कमी; बसल्या-बसल्या करू शकता
जाहिरातींमुळे मन भरकटल्याचा दावा
पोलीस भरती परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी यू-ट्यूबचं सबस्क्रिप्शन घेतलं होतं, असं चौधरी यांनी याचिकेत म्हटलं होतं; मात्र यू-ट्यूबवरच्या सेक्शुअल जाहिरातींमुळे मन भरकटायचं व अभ्यासावर परिणाम व्हायचा. म्हणून परीक्षेत नापास झाल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला होता; मात्र अशा प्रकारे विनाकारण याचिका करणं चुकीचं असल्याचं सांगत न्यायालयानं ती याचिका फेटाळली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.