नवी दिल्ली, 16 एप्रिल : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्लाझमा थेरपीचा (Plasma therapy) उल्लेख त्यांच्या मागच्या जनसंवादाच्या वेळी केला होता. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीदेखील या उपचार पद्धतीची परवानगी केंद्राकडे मागितली आहे. कोरोनाशी लढून ठणठणीत बरा झालेल्या रुग्णाच्या रक्ताचा वापर करून इतर अधिक गंभीर कोरोनाग्रस्तांवर इलाज करण्याची ही पद्धत आहे. ही उपचार पद्धत लवकरच भारतात सुरू होईल, अशी चिन्हं आहेत. प्लाझमा थेरपी हा आशेचा किरण आहे, असं केजरीवाल गुरुवारी म्हणाले.
कोरोनाव्हायरसने (CoronaVirus) जगभरात हाहाकार माजवला आहे. याचा नाश करणारं औषध आणि लस तयार करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप उपचार सापडलेला नाही. सध्या इतर आजारांवरील औषधांचा वापर करून उपचार केले जात आहेत. अशात आता कॉन्वलेसंट प्लाझ्मा थेरेपी (Convalescent plasma) या रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहे.
वाचा - मुंबईत कोरोनाचे कम्युनिटी ट्रान्समिशन नाही, 3585 व्यक्तींच्या चाचणीत 5 जणं बाधित
Convalescent plasma ही उपचारपद्धती कोरोनाव्हायरस रुग्णांवर यशस्वी ठरत असल्याचं अनेक अभ्यासात दिसून आलं आहे. महाराष्ट्रातही याच उपचारपद्धतीने कोरोनाव्हायरस रुग्णांवर उपचार केली जाण्याची शक्यता आहे. प्लाझ्मा थेरेपीसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
काय आहे कॉन्वलेसंट प्लाझ्मा थेरेपी?
याआधी एबोलासारख्या आजारावर वापरण्यात आलेली ही उपचार पद्धती कोविड-19 वरही परिणामकारक ठरत असल्याचं आता काही अभ्यासात दिसून आलं आहे. या उपचार पद्धतीत ब-या झालेल्या कोरोनाव्हायरसच्या रुग्णांचं रक्त इतर कोरोना रुग्णाला दिलं जातं.
अमेरिकेत कोरोनाग्रस्तांवर याच पद्धतीने उपचार करण्यात आले. 5 रुग्ण बरे झालेत, त्यामध्ये 3 भारतीय वंशाच्या नागरिकांचा समावेश आहे. ह्युस्टनमधील बेलर सेंट ल्युक मेडिकल सेंटरमध्ये 5 रुग्ण भरती होते.
दिल्लीतील AIIMS चे रणदीप गुलेरिया म्हणाले, "कोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी रुग्णाच्या शरीरात अँटिबॉडीज तयार होतात. रुग्ण बरा झाल्यानंतरही त्याच्या रक्तात या अँटिबॉडीज कायम असतात. अशा व्यक्तीच्या रक्तातील प्लाझ्मा कोरोना रुग्णाच्या शरीरात सोडले जातात. जेणेकरून त्या प्लाझ्मातील अँटिबॉडीज रुग्णाच्या शरीरातील व्हायरसशी लढतील."
"याला सरकारकडून परवानगी मिळाल्यास मोठ्या संख्येने रुग्णांवर ही उपचार पद्धती वापरून त्यांना वाचवता येईल. मात्र त्यासाठी कोरोनावर मात केलेल्या रुग्णांनी रक्तदान करणं गरजेचं आहे", असंही गुलेरिया म्हणाले.
अन्य बातम्या
2 वर्षांपासून अंथरुणाला खिळलेल्या रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू, चिंता वाढली
क्वारन्टाइन रुग्णांपासून नाही होणार कोरोना, नवी मुंबईचा पॅटर्न देशभर राबवणार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus