नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : राजकीय क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार दिल्लीत (Sharad Pawar in Delhi) दाखल झाले आहेत. शरद पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल हे सुद्धा उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे यापूर्वीच दिल्लीत आहेत. भाजपचे महाराष्ट्रातील नेते दिल्लीला पोहोचल्यानंतर आता शरद पवार दिल्लीत दाखल झाल्याने राजकीय गोटात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. (After Chandrakant Patil and Devendra Fadnavis now Sharad Pawar reaches Delhi)
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी आपले मुंबईतील नियोजित कार्यक्रम रद्द करुन अचानक दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल सुद्धा आहेत. एबीपी माझा वृत्तवाहिनीने या संदर्भात वृत्त दिलं आहे.
वाचा : चंद्रकांत पाटील यांच्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीस दिल्लीत, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
एबीपी माझाच्या वृत्तानुसार, दिल्लीत असलेल्या चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची पक्षश्रेष्ठींसोबत बैठक सुरू आहे. त्यातच शरद पवार दिल्लीत पोहोचले आहेत. मात्र, प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही पक्षाच्या नेत्यांचा हा दौरा यांचा संबंध नाहीये. असं सांगितलं जात आहे की, विरोधकांची दिल्लीत बैठक आहे आणि या बैठकीत सहभागी होण्यासाठी शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार या राजनाथ सिंह यांची भेट घेणार असल्याचं कळत आहे.
भाजप आणि राष्ट्रवादी नेत्यांच्या दिल्लीवारीने चर्चांना उधाण
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांचे मुंबईत काही कार्यक्रमम होते मात्र, त्यांनी ते रद्द करत दिल्लीला रवाना झाले आहेत. भाजप नेतेही दिल्लीत आहेत. राजकारणात सधी काय होईल याचा अंदाज वर्तवण्यात येऊ शकत नाही. शरद पवार दिल्लीत आल्याने आता भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या या दौऱ्यात वेगळं काही समीकरण होतं का हे पहावं लागेल.
वाचा : भाजप पदाधिकाऱ्याच्या हत्येनंतर नाशकातील वातावरण तापलं, भाजपने भुजबळांवर केला गंभीर आरोप
... म्हणून शरद पवार दिल्लीत
यासोबतच संसदेच्या डिफेन्स कमिटीची दुपारी बैठक आहे. शरद पवार हे या कमिटीचे सदस्य आहेत आणि त्या बैठकीसाठी शरद पवार दिल्लीत दाखल झाले असल्याचं बोललं जात आहे. मात्र, असे असले तरी राज्यातील भाजप नेते दिल्लीत असताना शरद पवारही दिल्लीत पोहोचल्याने चर्चांना उधाण आले आहे.
आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत खलबतं?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. चंद्रकांत पाटील यांचे कार्यालयीन सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करत शाह-पाटील यांच्या भेटीची माहिती दिली आहे. याशिवाय चंद्रकांत पाटील यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर देखील याबाबतची माहिती दिली होती.
"चंद्रकांत पाटील यांनी अमित शाह यांना भाजपच्या राज्यातील संघटनात्मक कामाची माहिती दिली. त्यांचे मार्गदर्शन घेतले. राज्याच्या सहकार क्षेत्रातील विशेषतः साखर उद्योगातील महत्त्वाच्या विषयांबाबतही चंद्रकांत पाटील यांनी अमित शाह यांना माहिती दिली. राज्यातील सद्यस्थितीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली", अशी माहिती भाजपकडून देण्यात आली आहे. पण या भेटीमागे अनेक कारणं असल्याच्या शक्यता आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांच्या तयारीबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi, Devendra Fadnavis, शरद पवार