दिल्ली, 7 मार्च: गेले काही दिवस उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभांची (Assembly Elections) रणधुमाळी सुरू आहे. आज (7 मार्च) उत्तर प्रदेशातल्या सातव्या म्हणजेच अखेरच्या टप्प्यातलं (Last Phase Voting) मतदान सुरू आहे. ते संपल्यावर ही रणधुमाळी संपेल आणि मग वेध लागतील ते 10 मार्चचे. 10 तारखेला मतमोजणी (Vote Counting) होणार असून, त्यानंतर प्रत्येक राज्याचं चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, आज मतदान संपल्यानंतर सायंकाळी सहा वाजता अॅक्सिस माय इंडियाच्या सहकार्याने आज-तक एक्झिट पोल (Exit Poll) जाहीर करणार आहे. त्यातूनही 10 तारखेच्या निकालांचं चित्र काही प्रमाणात स्पष्ट होऊ शकणार आहे. या पार्श्वभूमीवर, मतमोजणीचे (Assembly Election Result) निकाल हाती येण्याआधीच अनेक राजकीय हालचालींना वेग आला असून, कोणाशी आघाडी करायची, कोणाला फोडायचं, याची गणितं बांधली जाऊ लागली आहेत. ‘आज तक’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. उत्तर प्रदेश (UP Election) लोकसभा निवडणुकीतल्या विजयाचा रस्ता उत्तर प्रदेशातून जातो, असं म्हटलं जातं. कारण उत्तर प्रदेश हे मोठं राज्य आहे. म्हणूनच उत्तर प्रदेशातल्या निवडणुकीवर सर्वांचं लक्ष आहे. उत्तर प्रदेशात 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्याचं, तर 7 मार्चला शेवटच्या म्हणजेच सातव्या टप्प्याचं मतदान झालं. भाजप आघाडी, समाजवादी पक्ष आघाडी, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेस यांच्यामध्ये या राज्यात लढत आहे. निषाद पार्टी आणि अपना दल (एस) हे पक्ष भाजपसोबत आहेत. आरएलडी, महान दल, सुभासपा, अपना दल (के) आणि समाजवादी पक्ष यांची युती आहे. आपलंच सरकार येईल, असा विश्वास सर्वांकडूनच व्यक्त केला जात असला, तरी एकमेकांशी मोट बांधण्याच्या कसरतीही सुरू झाल्या आहेत.
‘भाजपला (BJP) यूपीची सत्ता मिळू न देण्यासाठी गरज भासली, तर आम आदमी पक्ष समाजवादी पक्षाला (SP) सरकार स्थापनेसाठी मदत करील,’ असं वक्तव्य आम आदमी पक्षाचे (AAP) राज्यसभा खासदार आणि यूपी प्रभारी संजय सिंह यांनी दोनच दिवसांपूर्वी केलं आहे. ‘आप हा पक्ष यूपीमध्ये पकड मिळवू लागला आहे. नागरिक आता विकासाच्या नावावर मतं देऊ लागले आहेत. यूपीला आता जातीच्या राजकारणातून वर यावं लागेल. सारे पक्ष आमच्या जाहीरनाम्याची कॉपी करत आहेत, मग ती 300 युनिट विजेची गोष्ट असो किंवा आणखी काही,’ असं सिंह यांनी सांगितलं. दरम्यान, उत्तर प्रदेशात भाजप पूर्ण बहुमताने पुन्हा एकदा सरकार स्थापन करील, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केला आहे. गोवा (Goa Election) गोवा हे छोटंसं राज्य असलं, तरी तिथल्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. अनेक वर्षं गोव्याचं मुख्यमंत्रिपद सांभाळलेले लोकप्रिय नेते मनोहर पर्रीकर यांच्या पश्चात होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यात त्यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना हव्या असलेल्या मतदारसंघात भाजपने तिकीट न दिल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे. 40 सीट्स असलेल्या गोव्यात काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत आहे; मात्र आप, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, एमजीपी आदी पक्षांनी या वेळी जोर लावल्यामुळे सर्वांचं लक्ष निकालाकडे आहे. गेल्या वेळी काँग्रेस (Congress) पक्षाने गोव्यात सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या; मात्र तरीही सरकार स्थापन करण्यात भाजपला यश मिळालं होतं.
2017 साली काँग्रेसने 40 पैकी 17 जागा जिंकल्या आणि तीन जागा जिंकलेल्या गोवा फॉरवर्ड पार्टीसह अनौपचारिक आघाडीही केली होती; मात्र केवळ 13 जागा जिंकलेल्या भाजपने राजकीय खटपटी करून सरकार स्थापन करण्यात यश प्राप्त केलं होतं.
त्यामुळे या वेळी कोणाला बहुमत मिळतं का आणि ते नाही मिळालं तर कोणाची कोणाशी आघाडी होते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरत आहे. मणिपूर (Manipur Election) गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने 21 जागा जिंकून एनपीपी आणि नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ) आदींसह अनेक पक्षांसोबत आघाडी करून सरकार स्थापन केलं होतं. मणिपूरमध्ये भाजपने सरकार स्थापन करण्याची ती पहिलीच वेळ होती. या वेळी मात्र चित्र वेगळं आहे. या तिन्ही पक्षांनी या वेळी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली असून, एकमेकांविरोधात उमेदवार उभे केले होते. तत्पूर्वी 2017पर्यंत मणिपुरात सलग 15 वर्षं काँग्रेसचं सरकार होतं. काँग्रेसने चार डावे पक्ष आणि जनता दल (सेक्युलर) या पक्षांसोबत युती करून यंदा निवडणूक लढवली आहे. मणिपुरात दोन टप्प्यांत मतदान झालं असून, 10 मार्चला निकाल आहे. गेल्या वेळी भाजपने काँग्रेस आमदारांना आपल्या बाजूला वळवलं होतं. या वेळी या दोन्ही पक्षांची परस्परांच्या नेत्यांवर नजर आहे. त्यामुळे नेमकं काय होतं, ते लवकरच कळेल. पंजाब (Punjab Election) पंजाबमध्ये वर्षानुवर्षं केवळ दोन पक्षांत होणारी निवडणूक यंदा पहिल्यांदाच पाच पक्षांत रंगणार आहे. त्यामुळे निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. पंजाब काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री राजिंदरसिंग भट्टल यांच्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ‘पंजाबमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी आम आदमी पक्षाची मदत घ्यावी लागली, तर त्यांच्याशी जरूर आघाडी करू,’ असं ते नुकतंच म्हणाले आहेत.
हे आपलं वैयक्तिक मत असल्याचं नंतर त्यांनी स्पष्ट केलं; मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेक राजकीय हालचालींना वेग आला आहे, एवढं मात्र नक्की. सुरुवातीला भट्टल यांनी काँग्रेस एकट्याने सरकार स्थापन करण्यात यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त केला होता. त्यानंतर आता त्यांनी आपची मदत लागल्यास ती घेण्याचा विचार मांडला आहे.
या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोपांची राळ उडवली आहे. त्यामुळे भट्टल यांच्या या वक्तव्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरम्यान, ‘पंजाबच्या नागरिकांनी आम आदमी पक्षाला आपला कौल दिला आहे,’ असा विश्वास पंजाब आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्ष नेते हरपालसिंग चीमा यांनी व्यक्त केला आहे.
उत्तराखंड (Uttarakhand Election) या राज्यातही सरकार स्थापनेसाठीच्या हालचाली विविध पक्षांमध्ये सुरू झाल्या आहेत. अनेक नेते वेगवेगळी वक्तव्यं करू लागले आहेत. अपक्ष उमेदवार आणि छोटे पक्ष यांच्यावर अन्य राजकीय पक्षांच्या नजरा आहेत. ‘जिंकून येण्याची शक्यता असलेले काँग्रेसचे अनेक उमेदवार संपर्कात असून, गरज पडल्यास या सर्वांना भाजपमध्ये घेतलं जाईल,’ असा दावा भाजपचे आमदार महेंद्र भट्ट यांनी केला आहे.
दरम्यान, उत्तराखंडच्या काँग्रेस नेत्यांनी दिल्लीत तळ ठोकला आहे. निकालानंतर उद्भवलेल्या परिस्थितीत जुळवाजुळवीच्या गणितासाठीचं हे होमवर्क असावं, असं म्हटलं जात आहे. राज्यात कोणालाच बहुमत मिळालं नाही, तर समाजवादी पक्ष, उत्तराखंड क्रांती दल, आम आदमी पक्ष आणि अपक्ष उमेदवारांची भूमिका महत्त्वाची ठरेल. ‘बहुजन समाज पक्ष कोणाला साथ देणार याचा निर्णय बहन मायावती (Mayawati) घेणार,’ असं बसप नेते (BSP) आणि लक्सर मतदारसंघातून उभे राहिलेले उमेदवार शहजाद यांनी सांगितलं. एक्झिट पोल्सविषयी अधिक माहिती शेअरचॅटच्या या लिंक वर क्लिक करून मिळेल. पंजाब काँग्रेसमधून बाहेर पडलेले माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Capt. Amarinder Singh) यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि निवडणुकीनंतरच्या शक्यतांबद्दल चर्चा केली. दरम्यान, काँग्रेस आपल्या उमेदवारांना निकालापूर्वी राजस्थानात नेऊन ठेवण्याचा विचार करत आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी 6 मार्चला पक्षाच्या उच्चपदस्थ नेत्यांसोबत याबद्दल चर्चा केली. भाजपने यूपी, गोवा, मणिपुरात स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा विश्वास व्यक्त केला असला, तरीही अन्य शक्यताही पक्षाच्या नेत्यांकडून आजमावल्या जात आहेत. एकंदरीतच राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला असून, नेमकी कोणती समीकरणं मांडली जात आहेत, ते 10 तारखेच्या निकालानंतरच कळेल.