नवी दिल्ली, 07 मार्च: पहिल्या EXIT POLL चा निकाल बाहेर येत आहे. रिपब्लिक टीव्हीने दाखवलेल्या मतदानोत्तर चाचणीत - UP Exit Polls 2022 मध्ये उत्तर प्रदेशात भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. पण तरीही गेल्या वेळच्या विधानसभा निवडणुकीसारखं निर्विवाद घवघवीत यश मात्र योगी सरकार टिकवू शकणार नाही असं चित्र आहे.
रिपब्लिकच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 262 ते 272 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर समजावादी पक्षाला 119 ते 134 जागा मिळतील. समाजवादीच्या जागा वाढलेल्या असल्या तरी काँग्रेस आणि बसपाचा सपशेल पराभव होण्याची शक्यता या एक्झिट पोलमध्ये वर्तवली आहे.
पक्ष | भाजप | सपा | कॉंग्रेस | बसपा | अपक्ष |
सीट | 262 ते 272 | 119 ते 134 | 3-5 | 7-15 | |
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातलं मतदान (UP Assembly election 2022)सोमवारी पार पडलं. मतदानोत्तर कल चाचणीत (Exit Polls 2022)कुठल्या पक्षाचं पारडं जड असेल आणि कोण कुणाला धूर चारेल याचा अंदाज येऊ शकतो.
उत्तर प्रदेशात 403 जागांच्या विधानसभेसाठी मतदारांनी कौल दिला आहे. याचा निकाल गुरुवारी (Assembly Election Result 2022 date)10 मार्चला लागेल. एकूण 7 टप्प्यात मतदान झालं. त्यापैकी अखेरच्या टप्प्यातलं मतदान 7 मार्चला मतदान यंत्रात बंदिस्त झालं आणि Exit Polls चा कल यायला सुरुवात झाली.
403 पैकी 325 जागा मिळवून भाजपने मित्र पत्राबरोबर गेल्या निवडणुकीत एक मजबूत सरकार दिलं होतं. एकट्या भाजपनेच 312 जागा खिशात घातल्या होत्या. त्या वेळी उत्तर प्रदेशात मोदींची लाट होती, असं म्हटलं जातं. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा भाजपने जाहीर केलेला नव्हता, तेव्हाचं हे घवघवीत यश आता पुन्हा मिळणार का हा प्रश्न आहे. योगी आदित्यनाथ सरकारला ते मागचं यश टिकवण्याचं मोठं आव्हान आहे. योगी आदित्यनाथ भाजपला किमान बहुमताचा आकडा गाठून देऊ शकतात का हेच पाहणं महत्त्वाचं आहे.
दुसरीकडे समजवादी पक्षाने गेल्या निवडणुकीत (Uttar Pradesh Assembly election 2017)47 जागा मिळवल्या होत्या. आता अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली सायकल किती वेगाने आणि जोरात मुसंडी मारते हे पाहावे लागेल. खरी स्पर्धा ही भाजप आणि समाजवादी पक्षातच आहे. बाकी विरोधक तर भाजपपुढे सपशेल आपटले होते. यात सर्वाधिक हानी झाली होती काँग्रेसची. राहुल गांधी आणि सोनिया गांधी या दोघांचेही पारंपरिक लोकसभा मतदारसंघ आहेत. तसंच उत्तर प्रदेशचा भार प्रियांका गांधींवर सोपवण्यात आला होता. असं असूनही ऐतिहासिक दारुण पराभवाला काँग्रेसला सामोरं जावं लागतं होतं. काँग्रेसने गेल्या निवडणुकीत फक्त 7 जागा जिंकल्या होत्या. मायावतींच्या बहुजन समाज पक्षाने (BSP)जेमतेम 19 जागा जिंकल्या होत्या.
भाजपला सर्वाधिक हात देणारे विभाग
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचा सर्वाधिक प्रभाव पूर्वेकडच्या भागात आहे. या पूर्वीय उत्तर प्रदेशात भाजपला 69 जागा गेल्या निवडणुकीत मिळाल्या होत्या. या शिवाय अवध प्रांतातूनही भाजपच्या जागांमध्ये मोठी वाढ झालेली बघायला मिळाली होती. 75 जागा इथून पक्षाला मिळाल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.