मुंबई, 12 नोव्हेंबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर सकाळी 7.30 वाजता हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया सुरू झाली. मुंबईतील एच एन रिलायन्स रुग्णालयात (H N Reliance Hospital) ही शस्त्रक्रिया पार पडली. वरिष्ठ आँर्थो सर्जन डाँक्टरांच्या टीमने सुमारे तासभर ही शस्त्रक्रिया केली. सकाळी 08.45 वाजता डाँक्टरांची टीम आँपरेशन करून बाहेर आली आणि त्यांनी आँपरेशन यशश्वी झाल्याचं सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आँपरेशनची माहीती त्यांच्या कुटुंबीयांनाही देण्यात आली आहे. (CM Uddhav Thackeray Health updates)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती एच.एन. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ अजित देसाई आणि डॉ शेखर भोजराज यांनी दिली आहे. या शस्त्रक्रियेदरम्यान मुख्यमंत्र्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर होती व आता शस्त्रक्रियेनंतर त्यांना रुग्णालयातील त्यांच्या कक्षात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती उत्तम आणि स्थिर आहे असेही डॉक्टरांनी सांगितले आहे. डॉ अजित देसाई हे ह्रदयरोग तज्ञ असून डॉ शेखर भोजराज हे स्पाईन सर्जन आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठीचा त्रास सुरू होता. त्यातून बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा मानेचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे बुधवारी (10 नोव्हेंबर) कॅबिनेटच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी आपल्या आरोग्याबाबतची माहिती दिली होती. मानेजवळील स्नायू दुखावले गेले असून सोमवारी केलेल्या तपासणीत हे स्पष्ट झालं. सुरुवातीला घरीच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. पण, तपासणी केली असता डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. अखेर, मुख्यमंत्र्यांनी शस्त्रक्रिया करण्यास होकार दर्शवला आणि ते रुग्णालयात दाखल झाले.
हाँस्पिटलमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित आहेत. गेले काही दिवस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठ आणि मान दुखीचा त्रास होत होता. त्यामुळे वरिष्ठ डाँक्टरांच्या सल्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ही लहान शस्त्रक्रिया करण्यात आली. कालच त्यांच्यावर विवध वैद्यकिय चाचण्याही करण्यात आल्या होत्या त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर आज ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
वाचा : विधान परिषदेच्या मुंबई मतदारसंघासाठी शिवसेनेतून 'या' नावांची चर्चा, बडे नेते शर्यतीत
मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता कार्यभार एकनाथ शिंदेकडे?
मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता कार्यभार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे. त्यामुळे अनेकांकडून सवाल उपस्थित केले जात आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी स्वत: याबद्दल खुलासा केला आहे.
मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता कार्यभार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे. त्यात कुठलेही तथ्य नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्यावर उद्या एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, त्यानंतर अवघे तीन ते चार दिवस आराम केल्यानंतर ते पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू होतील. आई जगदंबेचा कृपाशीर्वाद आणि तमाम जनतेच्या सदिच्छा उद्धव ठाकरे साहेबांसोबत आहेत. त्यामुळे समाजमाध्यमावर फिरणाऱ्या खोट्या आणि खोडसाळ मेसेजस आणि पोस्टवर विश्वास ठेवू नये, ही नम्र विनंती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Uddhav thackeray