उद्या होणार शिवसेनेचा फैसला, उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदारांची बैठक

उद्या होणार शिवसेनेचा फैसला, उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदारांची बैठक

शिवसेनेचा मुकाबला हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी असून त्यांच्यासोबत सत्तेत जाणं परवडणारं आहे का याबद्दलची मतं आमदारांकडून जाणून घेतली जाणार आहेत.

  • Share this:

मुंबई 6 नोव्हेंबर : राज्यातला सत्तासंघर्ष आता निर्णायक टप्प्यात पोहोचलाय. सध्या अस्तित्वात असलेल्या विधानसभेची मुदत 8 नोव्हेंबरच्या रात्री संपणार आहे. त्यामुळे पुढचे दोन दिवस सत्तास्थापनेसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक उद्या गुरुवारी (7 नोव्हेंबर) बोलावली आहे. शिवसेना भवनात सकाळी 11.30 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे हे सर्व आमदारांची मतं जाणून घेणार आहेत. त्यानंतर शिवसेनेचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. भाजपने योग्य वाटा दिला नाही तर राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जायचं का असा शिवसेनेसमोर महत्त्वाचा प्रश्न आहे. शेवटच्या क्षणापर्यंत भाजपवर दबाव आणून शक्य तेवढं जास्त मिळविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.

राज्यात गावपातळीवर शिवसेनेचा मुकाबला हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी असून त्यांच्यासोबत सत्तेत जाणं परवडणारं आहे का याबद्दलची मतं आमदारांकडून जाणून घेतली जाणार आहेत. त्याचबरोबर त्यांची वेगळी मतंही उद्धव ठाकरे ऐकून घेणार असून त्यानंतर अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

VIDEO : शरद पवारांचा अमित शाहांना मिश्कील टोला, उपस्थितांमध्ये पिकला हशा

कोंडी फुटणार, चर्चेला सुरूवात होणार

सत्ता स्थापनेवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये कोंडी निर्माण झालेली आहे. दोन्ही पक्षांमधली चर्चा बंद आहे. अशी परिस्थिती असताना मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातल्या सर्व पालकमंत्र्यांची बैठक बोलावली होती. अवकाळी पावसामुळे उद्धवस्त झालेल्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावली होती. त्याला शिवसेनेचे 6 मंत्री उपस्थित होते. या बैठकीनंतर ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे आणि दिवाकर रावते यांची बंदव्दार चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय. या बैठकीत सत्ता स्थापनेची जी कोंडी निर्माण झाली होती ती फोडण्यासाठी चर्चा झाली. या आधी झालेल्या मंत्रिमंडळच्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी दांडी मारली होती. त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनी बैठकीत सहभागी होणं याला महत्त्व प्राप्त झालंय.

ही देखील सदिच्छा भेट.. राऊत म्हणाले, अस्थिर स्थितीवर पवारांनी व्यक्त केली चिंता

शिवसेनेचे दोन मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या झालेल्या बैठकीत काही प्रस्तावावरही चर्चा झाली. यात भाजप आणि शिवसेनेमध्ये आणि सरकारमध्ये समन्वय राहावा यासाठी एक समन्वय समिती स्थापन करण्यात यावी आणि त्याचं अध्यक्षपद हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना द्यावं असाही एक प्रस्ताव असल्याची माहिती 'दैनिक लोकमत'नं दिली आहे.

राज्यातील राजकीय कोंडी फोडणाऱ्या पवारांच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे!

शिवसेना राष्ट्रवादीची जवळीक साधत भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतोय. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाणं हे शिवसेनेसाठी भविष्यात फायद्याचं ठरणार नाही. ज्यांच्याशी कायम लढलो त्याच पक्षाशी सोबत करून सत्ता स्थापन केली तर लोकांना काय सांगणार असा शिवसेनेच्या काही नेत्यांचा सवाल आहे. त्यामुळे शिवसेने मुख्यमंत्रिपदाचा हट्ट सोडावा तर भाजपने मंत्रिपदाचं समसमान वाटप करावं असं सूत्र ठरण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आलीय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर त्यांची भूमिका पाहता भाजप आणि शिवसेनेत बोलणी होऊन पुढच्या दोन दिवसात  सत्तास्थापनेची कोंडी फुटू शकते अशी शक्यता व्यक्त केली जातेय.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 6, 2019, 4:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading