ही देखील सदिच्छा भेट.. राऊत म्हणाले, अस्थिर स्थितीवर पवारांनी व्यक्त केली चिंता

ही देखील सदिच्छा भेट.. राऊत म्हणाले, अस्थिर स्थितीवर पवारांनी व्यक्त केली चिंता

राष्ट्रवादीने शिवसेनेला अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिल्याची माहिती मिळाली आहे.

  • Share this:

मुंबई,6 नोव्हेंबर: महाराष्ट्रात येत्या 48 तासांत नवं सरकार अस्तित्वात येणार असल्याची माहिती एकीकडे भाजपच्या सूत्रांनी दिली आहे. राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार स्थापन होईल आणि राजकीय पेच लवकरच सुटेल, असा विश्वासही व्यक्त केला जात असताना मात्र दुसरीकडे, सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-राष्ट्रवादीत खलबतं सुरू आहे. यामुळे राजकीय घडामोडीला वेग आला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत दुसऱ्यांदा 'सिल्व्हर ओक'वर जाऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये 10 मिनिटे चर्चा झाली. एका आठवड्यात राऊत यांची पवारांसोबतची दुसरी भेट होती. दरम्यान, ही देखील सदिच्छा भेट असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे. राजकीय अस्थिर स्थितीवर पवारांनी चिंता व्यक्त केली असून लवकर सरकार स्ठापन करा, असेही पवारांनी म्हटल्याचे राऊतांनी सांगितले. या भेटीनंतर संजय राऊत मातोश्रीकडे रवाना झाले आहेत.

संजय राऊतांनी गेल्या 31 ऑक्टोबरला शरद पवारांची भेट घेतली होती. दिवाळीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतल्याचे संजय राऊत यांनी सांगितले होते. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचेही ते म्हणाले होते. मात्र, आता सत्तास्थापनेचे भिजत घोंगडे असताना राऊत-पवारांची एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

राज्यात सरकार लवकर स्थापन करण्यासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. दिल्लीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल हे भाजपचे नेते नितिन गडकरी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्ठानी पोहोचले आहेत. उभय नेत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. एकमेकांचे कट्टर विरोधक नेत्यांच्या भेटीचा अर्थ काय लावावा, या चर्चेने खळबळ उडाली आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यात बुधवारी सायंकाळी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रपती राजवट आल्यास शिवसेना जबाबदार नाही- संजय राऊत

दरम्यान, राज्यातील सत्तास्थापनेचा पेच सुटणार असे वाटत असतानाच शिवसेनेने पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाबाबत ठाम भूमिका घेतली आहे. बुधवारी सकाळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेने कोणत्याही प्रकारच्या तडजोडीला तयार नसल्याचे स्पष्ट केले.

राज्य विधानसभेचा निकाल जाहीर होऊन 14 दिवस झाल्यानंतरही अद्याप सत्तास्थापनेचा पेच सुटलेला नाही. यासंदर्भात शिवसेनेने आतापर्यंत घेतलेली भूमिका पुन्हा एकदा सांगितली. भाजपकडून कोणत्याही प्रकारचा नवा प्रस्ताव येणार नाही किंवा आणि त्यांना नवा प्रस्ताव पाठवणार नाही. ठरल्या प्रमाणे करा, असे संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले. ज्या गोष्टींवर आधीच सहमती झाली आहे त्याच गोष्टी पुढे घेऊन चला. हाच एकमेव प्रस्ताव, असल्याचे राऊत म्हणाले.

भाजपसोबत मुख्यमंत्रिपदाबाबत सहमती झाली होती. ही सहमती आता नव्हे तर निवडणुकीच्या आधी झाली होती. त्यानुसारच युती झाली होती आणि आम्ही निवडणुक लढवली होती.

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास आम्ही जबाबदार नाही

राज्यात सरकार स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. यासंदर्भात विचारले असते राऊत म्हणाले, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास त्याला शिवसेना जबाबदार असणार नाही. जर राज्यावर कोणी राष्ट्रपती राजवट थोपवण्याचा प्रयत्न कर असेल तो महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या जनादेशाचा अपमान असेल. असे काही झाल्यास छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रावर झालेला अन्याय असेल आणि तो अधर्माचा विजय ठरेल, असे राऊत म्हणाले.राष्ट्रवादीने सत्तास्थापनेचा प्रस्ताव दिला आहे का यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, त्यासंदर्भात आम्ही बघून घेऊ काय करायचे.

मुख्यमंत्री शिवसेनेचा असावा, ही शेतकऱ्यांची इच्छा

महाराष्ट्रात सध्या इतरपण महत्त्वाचे प्रश्न आहेत. शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे राज्यातील विविध भागात जात आहेत. काल देखील उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. सर्व शेतकरी एकच मागणी करत आहेत की राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा, तरच शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील.

VIDEO : 'त्या' बैठकीबाबत संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 6, 2019 10:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading