कल्याण, 11 मे : कोरोनापाठोपाठ कल्याण-डोंबिलवीकर (KDMC) म्युकरमायकोसीसच्या (Mucormycosis) कचाट्यातही सापडल्याचं पाहायला मिळत आहे. केडीएमसी (KDMC) हद्दीत या आजारावर उपचार घेणाऱ्या दोन रुग्णांचा (Two Patient Died) मृत्यू झाला आहे. तर आणखी सहा रुग्णांवर याठिकाणी उपचार सुरू असल्याची माहिती महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय (CMO) अधिकारी डॉ.अश्विनी पाटील (Dr. Ashwini Patil) यांनी दिली आहे.
गंभीर अशा करोना रुग्णांना उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधाचे दुष्परीनाम रुग्णावर होत आहेत. त्यामुळं कोरोनानंतर होणाऱ्या म्युकरमायकोसिस आजाराने कल्याण डोंबिवलीत दोन बळी घेतले आहेत. ठाणे ग्रामीणमधले म्हारळ भागातील 38 वर्षीय तरूण तुकाराम भोईर आणि डोंबिवली पूर्वेकडील एका 69 वर्षीय बाजीराव काटकर या नागरिकाचा म्युकरमायकोसीस आजारानं मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. डोंबिवलीतील एम्स या खाजगी रुग्णालयात या रुग्णांवर उपचार सुरु होते. दरम्यान, या आजाराने ग्रस्त असलेल्या आणखी 6 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
(वाचा-Mucormycosis चा विळखा, उपचारासाठी ठाकरे सरकार खरेदी करणार 1 लाख इंजेक्शन, हाफकिनला दिली ऑर्डर)
कोरोना रुग्णांवर उपचारासाठी गरजेपेक्षा जास्त वापरली जाणारी औषधे, मधुमेह ग्रस्त रुग्णाच्या शरीरात उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधामुळं वाढणारं साखरेचे प्रमाण यामुळं अशा रुग्णांना म्युकरमायकोसीस आजार होण्याचे प्रमाण जास्त आहे. रुग्णांनी शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवावे तसेच डॉक्टरानी स्टेरॉइड सारख्या औषधाचा वापर गरजेनुसारच करावा असं आवाहन पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ अश्विनी पाटील यांनी केलं आहे.
ठाण्यात आढळला पहिला रुग्ण
ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात एका 56 वर्षीय महिलेलाही हा आजार झाल्याचं समोर आलं. या महिलेला कोरोना झाला होता मात्र याच दरम्यान त्या महिलेची रोग प्रतिकार शक्ती कमालीची कमी झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांचा अहवाल समोर आला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर शुभांगी अंबाडेकर यांनी महिलेची तपासणी केली असता, महिलेच्या डोळे वर आलेले दिसून आले तर उजव्या डोळ्याची हालचाल होत नसल्याचे तपासणी दरम्यान लक्षात आले, तसंच महिलेच्या उजव्या डोळ्यावर प्रकाश टाकल्यानंतरही डोळ्याची कोणतीच हालचाल होत नव्हती. तर महिलेच्या सिटीस्कॅन, ओर्बिट ब्रेन सिटी स्कॅन चाचणी अहवालात देखील अनेक लक्षणे आढळून आले. उजव्या डोळ्याच्या मासपेशींना सूज आली होती तसंच इतरही अंतर्गत लक्षणे वैद्यकीय चाचणी अहवालात दिसून आले. या आधारे तसंच म्युकोरमायकोसिस या आजाराची सांगितली गेलेली लक्षणं या महिलेत आढळल्याने या महिलेला म्युकोरमायकोसिस असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी स्पष्ट केलं.
(वाचा-Salute! चिमुरड्यांसह आई-वडिलांनाही झाला संसर्ग, तरी डॉक्टर आई बजावतेय कर्तव्य)
म्युकरमायकोसिस म्हणजे काय?
म्युकरमायकोसिस दुर्मिळ असला, तरी नवा नाही. प्रतिकारशक्ती (Immunity) कमी असलेल्या, अतिदक्षता विभागात (ICU) असलेल्या, तसंच अवयव प्रत्यारोपण (Transplantation) केल्या जाणाऱ्या रुग्णांमध्ये ब्लॅक फंगस (Black Fungus) म्हणजेच म्युकरमायकोसिस होणं तसंच त्यामुळे त्यांचा मृत्यू होणं अशा गोष्टी पूर्वीपासूनच घडत आहेत. पण कोविड-19 मुळे त्याची लागण होत असल्याची गोष्ट नवी आणि धोकादायक आहे, असं डॉक्टर्सचं म्हणणं आहे. कोविड-19 मधून चांगल्या पद्धतीनं बरं होत असलेल्या पेशंट्सना याची लागण होण्यामध्ये अचानक वेगाने वाढ होणं ही काळजीची बाब असल्याचं सांगितलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, KDMC, Mumbai News