मुंबई, 22 जून : अखेर सुरतमध्ये (Surat News) असलेल्या बंडखोर आमदारांना एअरलिफ्ट (Airlift to MLAs) केल्याचं समोर आलं आहे. काही तासांपूर्वीच सुरतच्या विमानतळावर तीन स्पाइसजेटची विमानं दाखल झाल्याचं सांगण्यात आलं होतं. आमदारांपर्यंत कोणी पोहोचू नये यासाठी त्यांना सुरतहून आसामच्या गुवाहाटीमध्ये एअरलिफ्ट करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार रात्री उशिरा सर्व आमदारांना एअरलिफ्ट करण्यात आलं. सुरतच्या ली मॅरेडियन हॉटेलमध्ये काही वेळापूर्वी तीन बसेस दाखल झाल्या होत्या. यातूनच आमदारांना एअरपोर्टपर्यंत नेण्यात आलं. बंडखोर आमदारांची पळवापळवी होऊ नये यासाठी त्यांना हलवण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय आमदारांचे नातेवाईकही त्यांना भेटायला येऊ शकतात. यासाठी सर्व बंडखोर आमदारांना हलवण्यात येणार आहे. सुरत एअरपोर्टवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिवसेनेच्या 5 बंडखोर आमदारांना सूरतमध्ये मारहाण? शिवसेनेचे बंडखोर आमदार सध्या सूरतच्या एका हॉटेलमध्ये आहेत. हे सर्व आमदार शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातला गेले आहेत. या आमदारांमध्ये नितीन देशमुख यांचादेखील समावेश आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आमदार नितीन देशमुख यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या पाच आमदारांना सूरतमध्ये मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पाचही आमदारांना महाराष्ट्र परत यायचं होतं. त्यातूनच त्यांना मारहाण करण्यात आल्याचा दावा केला जातोय. विशेष म्हणजे या मारहाणीची गंभीर दखल गृह खात्याकडून घेण्यात आली आहे. ज्या आमदारांना मारहाण झाली आहे त्या आमदारांच्या नातेवाईकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी नितीन देशमुख यांना मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तसेच आणखी दोन आमदारांना मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.