मुंबई, 27 फेब्रुवारी : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्या बाळासह हजर राहणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिर यांचं नाव चर्चेत आलं होतं. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांचं कौतुक केलं होतं. पण, मुंबईत अधिवेशनासाठी आलेल्या सरोज अहिर यांच्या डोळ्यात पाणी आले. आपल्याला बाळासह राहण्यासाठी कोणतीही व्यवस्था न करण्यात आल्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. आपल्या अडीच महिन्याच्या लेकीसह राष्ट्रवादीच्या आमदार नागपूर अधिवेशनात हजेरी लावली होती. आमदार अहिर आपल्या बाळाला घेऊन अधिवेशनाला आल्यामुळे सर्वच आमदारांनी त्यांचं कौतुक केलं होतं. त्यावेळी हिरकणी कक्ष स्थापन केला जाईल, असं आश्वासनच मुख्यमंत्री शिंदेंनी दिलं होतं. पण, आज मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी अहिर आपल्या लेकीसह आल्यात. पण त्यांना धक्काच बसला. (आता कणखर लढावू बाणा गळून पडला, सुषमा अंधारेंची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट) हिरकणी कक्षाच्या बोर्ड व्यतिरिक्त तिथे काहीही नव्हतं. कक्षामध्ये बाथरूमची व्यवस्था नव्हती. सगळीकडे धूळ पसरलेली होती. अशा कक्षामध्ये बाळाला कसं घेऊन बसणार, असं म्हणत अहिर यांनी नाराजी बोलून दाखवली. एवढंच नाहीतर सार्वजनिक शौचालयात जाऊन त्यांनी हात धुतले आणि त्यानंतर बाळाला घेतलं. मी जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी इथं आले होते. 8 दिवसांआधीच प्रधान सचिवांना भेटले. आज मी इथं आले होते, परंतु, हिरकणी कक्षाची फक्त पाटी आहे. मला महिना भर सभागृहात हजर राहणार असेल तर कक्षामध्ये जागा द्यावी अशी विनंती केली. मी एकही दिवस सभागृह बुडवलं नाही. मी आहे त्या परिस्थितीत काम केलं. गरोदर असताना सुद्धा आली होती. एक आई म्हणून माझं बाळ सुरक्षित राहावं अशी अपेक्षा होती. पण हॉलमध्ये धूळ होती, अशा वातावरणात आजारी बाळाला ठेवू शकत नाही, असं म्हणत अहिर आपल्या बाळाला विधिमंडळातून घेऊन गेल्या. (इंदुरीकर महाराजांचं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना खास आवाहन, म्हणाले… VIDEO) जर माझी अशी अवस्था असेल तर राज्यातील महिलांसाठी काय मागणी करू. दोन महिन्यापूर्वी पत्र दिले होते. दोन महिने झाले तरी कक्ष उभे राहिले नाही. फक्त सुचना देत आहे. आज माझ्यावर अन्याय झाला पण राज्यातील महिलांना तरी न्याय मिळावा. मी आज अचानक आली नाही. मी मागच्याच आठवड्यात आली होती. फक्त नावाची पाटी लावून कक्ष तयार होत नाही. झोपडपट्टीतली महिला सुद्धा बाळाला चांगलं ठेवते, मी शौचालयामध्ये हात धुवून बाळाला घेतलं, तिथे वाशरुमची व्यवस्था नाही. तुमचं हिरकणी कक्ष तुम्हाला लखलाभ असो, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.