• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • रोगापेक्षा इलाज भयंकर, कोरोना लस घेण्यासाठी सर्वसामान्यांची पायपीट!

रोगापेक्षा इलाज भयंकर, कोरोना लस घेण्यासाठी सर्वसामान्यांची पायपीट!

न्यूज18 लोकमतच्या टीमने मुंबईतील 3 वेगवेगळ्या लसीकरण केंद्रावर गेले आणि तिथल्या परिस्थितीची पाहणी केली.

  • Share this:
मुंबई, 03 मार्च : देशभरात सर्वसामान्य लोकांसाठी कोरोना लसीकरण 1 तारखेपासून देशातील सर्व शहरांतील निवडक सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये सुरू झाले आहे. पण लसीकरण  केंद्रात प्रचंड गर्दी होत असल्यामुळे अनेकांना लस मिळावी यासाठी खूप भटकंती करावी लागली आहे. सर्वसामान्याना कोरोना लस द्यायला सुरुवात केल्यानंतर दोनच दिवसांत हजारो रुग्णांना ही लस घेण्यात अडचणी येत आहेत. न्यूज18 लोकमतच्या टीमने मुंबईतील 3 वेगवेगळ्या लसीकरण केंद्रावर गेले आणि तिथल्या परिस्थितीची पाहणी केली असता अनेकांनी अडचणीचा पाढाच आमच्या टीमकडे वाचला. मीरा भाईंदर येथील कुटुंब लस मिळावी म्हणून सकाळी सकाळी  कूपर हॉस्पिटलमध्ये पोहोचलं पण त्यांना तिथे तुमचं रजिस्ट्रेशन होणार नाही, असं सांगितल्यानंतर ते बीकेसी लसीकरण केंद्रावर पोहोचले. पण तिथेही जी गर्दी पहिली ते पाहता काढता पाय घेत ते गोरेगावच्या नेस्को लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचले. वय वर्षे 77, अशात नेस्को सेन्टरमध्ये गर्दी इतकी की भर उन्हात बसणं तर सोडून द्या पण उभं राहावं लागलं. तर लक्ष्मी अय्यर या थेट घटकोपरहून बीकेसी लसीकरण केंद्रावर पोहोचल्या. त्यांच्या मते, 'त्यांच्या आसपास एकही लसीकरण केंद्र नाही आणि लक्ष्मी सारख्या अनेक जणांनी भांडुप, मुलुंड या ठिकाणाहून सकाळी बीकेसीचं लसीकरण केंद्र गाठलं. एकतर लसीकरण केंद्रावर आपलं रजिस्ट्रेशन न करता ही जाता येते, हे लोकांना माहीत असल्याने लोक मोठ्या प्रमाणात बीकेसी लसीकरण केंद्रावर पोहोचले. त्यातच कोविन ऍपमधील बिघाडामुळे मंगळवारी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) लसीकरण केंद्रात ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील लोक लस मिळवण्यासाठी 2-2 तास रांगेत उभे होते. बीकेसी लसीकरण केंद्रातील गर्दीचा एक व्हिडीओही व्हायरल झाला. बीकेसी लसीकरण केंद्राचे डीन डॉ. राजेश ढेरे म्हणाले, "कोविन अॅपमधील त्रुटींमुळे सकाळच्या वेळी लसीकरण केंद्रात प्रचंड गर्दी झाली होती हे मी मान्य करतो. पण सकाळी 11.20 नंतर लसीकरण सुरळीत करण्यात आले आणि आम्ही काही जणांना ऑनलाइन एन्ट्री न करताच ऑफलाईन लस देऊन गर्दी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला."या लसीकरण केंद्रावर पाच हजार डोस उपलब्ध असल्याने लसीकरणाची कमतरता नाही, असेही ते म्हणाले. वॉक इन सुविधेविषयी ऐकून अनेक लाभार्थी थेट लसीकरण केंद्रावर आले. पहिल्या टप्प्याप्रमाणे जर दुसऱ्या टप्प्यातही फक्त रजिस्टर झालेले आणि वेळ घेऊन लोक आले तर सेंटरवर एकाच वेळी 50 लोकंही दिसणार नाहीत. 60 वर्षीय विवेक कदम म्हणाले, "मी वेबसाइटवर नोंदणी करण्याचा प्रयत्न केला, पण मला अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे मी थेट माझ्या जवळच्या केंद्रात पोहोचलो आहे."  एका महिलेला अशाच समस्यांना तोंड द्यावं लागलं, "माझ्या फोनमध्ये डझनभर ओटीपी आहेत. कोविन वेबसाईट उघडली , आम्ही आधारचे तपशीलही भरलं पण शेवटपर्यंत रजिस्टर झालंच नाही मग मी दहिसरच्या या केंद्रावर पोहोचले, मी राहते अंधेरीत. विद्या कौल यांनी सोमवारी अॅपवर आपल्या 80 वर्षीय आई-वडिलांची नावे नोंदवली. त्याचं निवडलेलं केंद्र मुलुंड होतं, पण वॉक-इनला परवानगी असल्यामुळे त्या आपल्या घराच्या जवळ बीकेसीत आल्या, "आम्ही सकाळी नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आणि अनेकदा प्रयत्न करत राहिले.  मुलुंड केंद्रावर दुपारी 4 वाजता आमची अपॉइंटमेंट  ठरली पण एवढं दूर जाण्यापेक्षा मी इथेच आले आणि लसीकरण झाले. 72 वर्षीय चंदर यांच्या मते " आजचा दुसराच दिवस आहे, आणि आपल्या देशाची एवढी लोकसंख्या आहे की, आपण अनेक गोष्टींसाठी रांगेत उभे राहून वाट पाहतो, मग लसीकरणासाठी का नाही? मला वाट पाहण्यास काहीच हरकत नाही." 72 वर्षीय विमलाबेन म्हणाल्या की, ती दोन तासांपासून वाट पाहत होती. "मी चार दिवस स्वत:ची नोंदणी करण्याचा प्रयत्न केला, पण तसं करू शकलो नाही. मी इथे माझ्या नवऱ्याबरोबर आहे. आम्ही वॉक-इन लाभार्थी आहोत आणि आमचा नंबर यायची वाट पाहत आहोत. लसीकरण केंद्रात प्रचंड गर्दी असल्यामुळे आमचा नंबर कधी येईल हे आम्हाला माहीत नाही." गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये असलेल्या राहिला खान यांनी सांगितले की, त्यांनी नोंदणी केली आणि सकाळी 9 वाजता अपॉइंटमेंट मिळाली. "आम्ही दोन तासांपासून वाट पाहत आहोत. फार काळ उभे राहण नाही. आमची पाळी कधी येईल माहीत नाही." 80 वर्षांवरील दोन ज्येष्ठ नागरिकांसोबत आलेले सलील कुलकर्णीच्या मते , "खूप प्रयत्न केल्यानंतर आम्ही त्यांचं रजिस्ट्रेशन केलं आहे आणि आता लसीकरण केंद्रावर आल्यावर कसंबसं 3 तासांनी लस मिळाली पण इथं नीट गर्दीच नियोजन नाही' पहिल्या टप्प्यातील लसीकरण करताना एका गोष्टीची काळजी घेण्यात आली ती म्हणजे लोकांना रजिस्टर झाल्यानंतर एक ठराविक वेळ देण्यात आली आणि त्या वेळेतच लोक लस घेण्यासाठी जायचे. अगदी ऍपमध्ये बिघाड निर्माण झाला तरी त्या त्या लसीकरण केंद्राच्या क्षमते एवढेच लोक पोहोचत होते. त्यामुळे लसीकरण करणं, एकमेकांत योग्य अंतर राखणे बऱ्यापैकी सुरळीत झालं. पण दुसऱ्या टप्प्यात रजिस्ट्रेशन न करता जाण्याची परवानगी असल्याने लसीकरण केंद्राच्या क्षमतेपेक्षा दुप्पट, तिप्पट गर्दी होत आहे.
Published by:sachin Salve
First published: