मुंबई, 26 मे : महाराष्ट्रापुढे कोरोनाचे महासंकट उभे ठाकले आहे. परंतु, दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारपुढे नवा राजकीय पेच निर्माण होण्याची चिन्ह आहे. विरोधकांकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपला सणसणीत टोला लगावत इशारा दिला आहे. संजय राऊत यांनी आज एकापाठोपाठ दोन ट्वीट करून राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं आहे. ‘कोरोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे. संशोधन जारी है. विरोधकांनी तात्काळ क्वारंटाइन व्हावे हेच बरे’ असा टोला राऊत यांनी भाजपला लगावला आहे.
करोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे. संशोधन जारी है.
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 26, 2020
विरोधकांनी तात्काळ quarantine व्हावे हेच बरे..
महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील .
Boomerang...
जय महाराष्ट्र
तसंच, ‘राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. पण महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील. भाजपवर हा बुमरँग पडेल’, असा इशाराही राऊत यांनी दिला आहे. हेही वाचा - पुण्यातील धक्कादायक घटना, कोरोनाबाधित तर्राट रुग्णाचा हॉस्पिटलमध्ये राडा त्याआधी राऊत यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीबद्दल ट्वीट केलं होतं. ‘शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सोमवारी संध्याकाळी ‘मातोश्री’वर भेट झाली. दोन नेत्यांमध्ये दीड तास चर्चा झाली. कुणी सरकारच्या स्थिरते बाबत बातम्यांचा धुरळा उडवीत असतील तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे. चिंता नसावी’ असा खुलासा राऊत यांनी केला होता.
मा. शरद पवार व मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे यांची काल संध्याकाळी मातोश्रीवर भेट झाली. दोन नेत्यात दिड तास चर्चा झाली. कुणी सरकारच्या स्थिरते बाबत बातम्यांचा धुरळा ऊडवीत असतील तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे. चिंता नसावी.
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 26, 2020
जय महाराष्ट्र !!@PawarSpeaks @CMOMaharashtra
सत्ता स्थापनेनंतर शरद पवार पहिल्यांदाच ‘मातोश्री’वर दरम्यान, सोमवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवास्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची महत्वाची बैठक झाली. सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार, बैठकीत फक्त उद्धव ठाकरे, शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत हेच उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील आणि केंद्रातील महत्वाच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याचं समजतं आहे. हेही वाचा - COVID 19: WHOचा मोठा निर्णय, भारतात मिळणाऱ्या या औषधाच्या वापरावर तात्पुरती बंदी विशेष म्हणजे, सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार यांनी मातोश्रीची पायरी चढलली. यावेळी त्यांनी राज्यातील परिस्थितीमुळे मुख्यमंत्र्यांवर नाराजी व्यक्त केल्याचंही समजतं आहे. येत्या गुरुवारी महाविकास आघाडीला 6 महिने पूर्ण होतायत त्याआधीच या सरकारवर सत्ता जाण्याचे ढग दाटले, असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. संपादन - सचिन साळवे