Home /News /mumbai /

'जनामनाची लाज असती तर मंत्रीपदाचे राजीनामे दिले असते'; शिवसेनेनं बंडखोरांना पुन्हा सुनावलं

'जनामनाची लाज असती तर मंत्रीपदाचे राजीनामे दिले असते'; शिवसेनेनं बंडखोरांना पुन्हा सुनावलं

जो भाजप सतत महाराष्ट्रावर हल्ले करीत आहे, त्याच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून हे लोक मार्गदर्शन घेऊन उत्साहाची उर्जा निर्माण करीत आहेत, असा टोलाही लगावण्यात आला

    मुंबई 28 जून : राज्यात आठवडाभरापासून राजकीय घडामोडींना (Maharashtra Political Crisis) वेग आलेला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत शिवसेनेना आणि अपक्ष असे जवळपास 50 आमदार सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. अशात ठाकरे सरकार (MVA Government) अल्पमतात येऊन कधीही कोसळण्याची शक्यता आहे. यादरम्यान या प्रकरणावरुन शिवसेना बंडखोर आमदार आणि भाजपवर सतत निशाणा साधत आहे. आता पुन्हा एकदा सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली गेली आहे. सामनाचा अग्रलेख - भारतीय जनता पक्षाची अलीकडच्या काळातील वक्तव्ये जनतेला गोंधळात टाकणारी आहेत. एका बाजूला चंद्रकांत पाटलांनी सांगायचे, शिवसेनेत जे सुरू आहे त्याच्याशी आपला संबंध नाही. तो त्यांचा अंतर्गत मामला आहे. त्याचवेळी रावसाहेब दानवे अंगास हळद लावून आणि मुंडावळय़ा बांधून बोलायचे, ‘आता फार तर एक-दोन दिवसच विरोधी पक्षात बसू. दोन-तीन दिवसांत राज्यात भाजपचे सरकार येईल.’ शिवसेनेतील बंडाशी संबंध नाही असे म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला दोन दिवसांत भाजपचे सरकार येईल, असं बोलायचं. त्यामुळे खरं काय? अविनाश भोसले आता ईडीच्या ताब्यात, आता काँग्रेस-राष्ट्रवादी रडारवर? मुंबईतील बंडखोरांच्या मुखपत्रात एक बातमी प्रसिद्ध झाली आहे. श्रीमान अमित शहांनी म्हणे बंडखोर आमदारांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मधुर संवाद साधला आहे. या संवादात म्हणे श्री. शहा यांनी बंडखोरांच्या अपात्रतेविषयी चर्चा केली. बंडखोर आमदारांवर कारवाई होऊ देणार नाही, असे आश्वासन श्री. शहा यांनी दिले असं प्रसिद्ध झालं. अमित शहा यांच्याशी संवाद पार पडल्यावर बंडखोर आमदारांत उत्साह संचारला. या उत्साहात भर पडावी म्हणून गृहमंत्री शहा यांनी बंडखोर आमदारांना केंद्रीय सुरक्षा पुरवली. गुवाहाटीमधील आमदार मंडळी शहा यांच्याशी झालेल्या संवादानंतर इतकी खूश झाली की, त्यांनी आपला आसाममधील मुक्काम आणखी सात दिवस वाढविला आहे. बंडखोर आमदारांमध्ये सात-आठ मंत्री आहेत, आमदार आहेत. आपली मंत्रालये, विभाग सोडून ते महाराष्ट्राबाहेर जाऊन बसले आहेत. कृषी, उच्च शिक्षण, पाणीपुरवठा, फलोत्पादन वगैरे खाती जनतेच्या जिव्हाळय़ाची आहेत, पण हे मंत्री त्यांचे विभाग वाऱ्यावर सोडून गुवाहाटीच्या ‘रॅडिसन ब्लू’ हॉटेलात बसले आहेत. जनामनाची लाज असती तर मंत्रीपदाचे राजीनामे देऊन ते राज्याबाहेर गेले असते, पण शिवसेनेने दिलेली मंत्रीपदे कायम ठेवून ते तत्त्वाची भाषा करीत आहेत. आम्ही म्हणे महाराष्ट्राच्या, हिंदुत्वाच्या हितासाठी भाजपबरोबर जात आहोत, पण काय हो मंडळी, महाराष्ट्रावर ‘फुटी’चे व ‘तुटी’चे संकट भाजपमुळे येऊ घातले आहे त्यावर गुवाहाटीमधील तुमचे दलबदलू प्रवक्ते अद्यापि तोंड का उचकटत नाहीत? सत्तानाट्याचा पुढचा अंक, भाजप ऍक्शन मोडमध्ये, मुंबईत पुन्हा कोरोना विस्फोट TOP बातम्या महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याची मोठी खतरनाक योजना भाजपमधील दिल्लीतील नेत्यांनी योजली आहे. महाराष्ट्राचे सरळ तीन तुकडे करायचे, मुंबईला वेगळे करायचे व छत्रपती शिवरायांचा हा अखंड महाराष्ट्र उद्ध्वस्त करायचा, असा हा डाव असल्याचे भाजपच्या कर्नाटकातील नेत्यांनीच उघड केले. यावर प्रखर हिंदुत्ववादी, महाराष्ट्रवादी म्हणवून घेणाऱ्यांचे काय सांगणे आहे? जो भाजप सतत महाराष्ट्रावर हल्ले करीत आहे, त्याच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून हे लोक मार्गदर्शन घेऊन उत्साहाची उर्जा निर्माण करीत आहेत. महाराष्ट्रात सरकार पाडण्याचे उद्योग नक्की कोण करीत आहे? हे डाव आता उघड झाले असूनही ही मंडळी त्यांच्याच नावाचा गजर करीत आहेत. पुन्हा सरकार व शिवसेनेच्या बाजूने जे उभे आहेत, त्यांच्यावर ‘ईडी’चे फास आवळून आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरूच आहे. हे सर्व खेळ महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आणखी किती काळ चालणार? छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या धर्मनिष्ठेचे व स्वराज्य प्रेमाचे दाखले आपण देतो, ते स्वराज्य प्रेम आज कोठे गेले? बात स्वाभिमानाची आणि हिंदुत्वाची करायची आणि हे असले भलतेच उद्योग करून महाराष्ट्रद्रोहय़ांचे हात बळकट करायचे. ‘‘महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्यांचे तुकडे करू,’’ असं शिवसेनेपैकी कोणी बोललं तर ‘‘यांच्यापासून आमच्या जीवितास धोका आहे हो S S,’’ म्हणून बोभाटा करायचा. बेळगावातील मराठी अत्याचारांवरही आता यांची तोंडे बंद पडतील. शिवसेनेने या सर्व विषयांवर फक्त प्रखर भूमिका घेतल्या नाहीत, तर रस्त्यावरचे लढे दिले. भारतीय जनता पक्षाशी जे पाट लावू इच्छित आहेत त्यांनी आपला महाराष्ट्र बाणा एकदा तपासून पाहावाच. दानवे म्हणतात त्याप्रमाणे राज्यात पुढील दोन दिवसांत त्यांचे सरकार येईल, बंडखोरांचे नाही. त्यासाठी ते उतावीळ आहेत, पण महाराष्ट्र हे पाप स्वीकारील काय?
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shivsena

    पुढील बातम्या