मुंबई, 07 एप्रिल : मुंबईत स्फोटकांनी कार सापडल्या प्रकरणी अटकेत असलेल्या पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी NIA कोर्टात पत्र दिले असल्याची माहिती समोर आली आहे. या पत्रात शिवसेनेचे (Shivsena) नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचा उल्लेख असल्याचे समोर आले आहे. पण, अनिल परब यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे
अनिल परब यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर लावण्यात आलेल्या आरोपांचं खंडन केलं आहे. 'माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आणि माझ्या दोन्ही मुलींची शपथ घेऊन मी सांगतो की हे खोट आहे. मला बदनाम करण्यासाठी केलेले आरोप आहे. मी कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार आहे' असं अनिल परब म्हणाले.
MPSC Exams: एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी
'आज सचिन वाझे यांनी NIA कोर्टात पत्र दिले. त्यात माझ्या नावाचा उल्लेख केला आहे. जून ऑगस्ट 2020 ला वाझे ला SBUT ट्रस्टीकडून 50 कोटी घेण्याचा आरोप केला आहे. जानेवारी 2021 ला मी मुंबई महापालिका कंत्राटदाराकडून 2 कोटी रुपये जमा करण्याच्या सूचना दिल्या. मुळात हे दोन्ही आरोप खोटे आहे, त्याचे पत्रही खोटे असेल, असं परब म्हणाले.
सरकारची बदनामी करण्यासाठी हे पत्र आहेत. सचिन वाझे हा कोठडीत आहे. त्याने अजून कोणाकडे तक्रार केली नाही. अशी पत्रं बाहेर काढून सरकारला बदनाम केले जात आहे. वाझे काही काळ शिवसेनेत होते, प्रदीप शर्मा पण शिवसेनेचे उमेदवार होते, हे मान्य करतो. पण वाझेंना शिवसेनेने असं काम करायला सांगितलं नाही, असंही परब म्हणाले.
केंद्रीय यंत्रणेचा वापर करून शिवसेनेच्या मागे ससेमिरा लावला आहे. बदनामीचा हा लेटर बॉम्ब काढून आम्हाला काही होणार नाही. मला चौकशीला बोलवा, मी तयार आहे. जर मी दोषी असेल तर मला माझे पक्षप्रमुख फासावर लटकवतील, मी पूर्णपणे कायदेशीर लढणार मी लढाईच्या तयारीत आहे. अश्या धमक्यांना मी घाबरत नाही, मला टार्गेट करून मुख्यमंत्र्याना टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे, असंही परब म्हणाले.
राज्यावर आणखी एक संकट, उद्यापर्यंत पुरेल इतकाच लशींचा साठा शिल्लक
'भाजपचे पदाधिकारी आम्ही तिसरा बळी घेऊ म्हणत होते. त्यामुळे भाजप ने हे बनवलेला प्रकरण आहे. वाझे हे पत्र देणार आहे हे भाजपला आधीपासून माहीत होतं म्हणून ते गाजावाजा करत आहे, पण त्यांनी राजीनामा मागितला तर आम्ही राजीनामा देणार नाही, असंही परब यांनी स्पष्ट केले.
'आजच्या पत्रात माझ्यावर, देशमुख आणि अजित पवार यांच्या जवळचे घोडावत यांच्यावर आरोप केले आहे. माझ्यावर केलेले हे आरोप खोटे आहे. मी आज कुठल्याही चौकशीला समोर जाईल तयार आहे. मला चौकशीला बोलवावं मी जायला तयार आहे, असंही परब यांनी ठणकावून सांगितले.
CBI चौकशीचा निर्णय आला आणि आज हे पत्र आलं आहे,परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांना पत्र लिहिलं त्यात हा उल्लेख नाही. आतापर्यंतच्या पत्रात कुठेही असा उल्लेख नाही. NIA ची चौकशी स्फोटकांची आहे पण त्याचा शोध अजून लावला नाही, माझी नार्को टेस्ट केली तरी मी सामोरं जाण्यासाठी तयार आहे. NIA, CBI, रॉ कुठलीही चौकशी लावली तरी मी तयार आहे, असंही परब म्हणाले.