मुंबई, 18 मे : राज्यसभेच्या सहा जागांसाठी लवकरच निवडणूक (Rajya Sabha Election) होणार आहे. या सहा जागांसाठी राज्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग येताना दिसत आहे. सहाव्या जागेवर संभाजीराजे (Sambhaji Raje) अपक्ष लढणार असल्याची घोषणा केली आहे. तर भाजप (BJP)कडूनही सहावी जागा लढण्याची तयारी असल्याचं बोललं जात आहे. त्यातच आता शिवसेनेने (Shiv Sena) एक मोठा निर्णय घेतला आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीराजे अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. इतकेच नाही तर संभाजीराजे यांनी सर्व आमदारांना पत्र लिहून पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. त्याच दरम्यान आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी म्हटलं आहे, शिवसेना सहावी जागा लढवणार आणि जिंकणार सुद्धा.
"आकडे आणि मोड दोन्ही मविआकडे..."
राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू करण्याची विरोधकांची इर्षा दिसू लागलीय.. भ्रष्टाचारातून पैसा .. त्यातून घोडेबाजार!हे दुष्ट चक्र कधी थांबेल? सहावी जागा शिवसेना लढेल. कोणी कितीही आकडे मोड करावी.. आकडे आणि मोड दोन्ही महविकास आघाडीकडे आहे. लढेंगे . जितेंगे. pic.twitter.com/VOXRKRDzdk
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 18, 2022
राज्यसभेच्या 6 व्या जागेसाठी महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू करण्याची विरोधकांची इर्षा दिसू लागलीय.. भ्रष्टाचारातून पैसा .. त्यातून घोडेबाजार!हे दुष्ट चक्र कधी थांबेल? सहावी जागा शिवसेना लढेल. कोणी कितीही आकडे मोड करावी.. आकडे आणि मोड दोन्ही महविकास आघाडीकडे आहे. लढेंगे. जितेंगे. असं ट्विट करत संजय राऊत यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेना उमेदवार देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
सध्या महाविकास आघाडीकडे 169 आमदार आहेत. शिवसेना 55, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44, इतर पक्ष 8 आणि अपक्ष 8 असं महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. तर भाजपकडे 113 आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे 106 आमदार, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष 5 आमदार अशा एकूण 113 आमदार भाजपकडे आहेत.
राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज असते. महाविकास आघाडीकडे 169 आमदार आणि भाजपकडे 113 आमदार आहेत. संख्याबळानुसार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. तर भाजपचे दोन उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतात. तिसरी जागा भाजपनं लढवल्यास फोडाफोडी करावी लागू शकते.
संभाजीराजेंचं सर्व आमदारांना पत्र
संभाजीराजे यांनी सर्व आमदारांना खुले पत्र लिहिले आहे. सहाव्या जागेसाठी कोणत्याही पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नाही, त्यामुळे मदतीचे आवाहन संभाजीराजे यांनी केलं आहे.
संभाजीराजे यांचं पत्र!
आपणांस कल्पना आहेच की, महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. या निवडणुकीत मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करीत आहे. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी कोणत्याही उमेदवारास विधानसभा सदस्यांच्या 42 मतांची आवश्यकता आहे. महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय संख्याबळाचा विचार करता, या सहा जागांपैकी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या पक्षांना प्रत्येकी एक व भाजपला दोन जागांवरती विजय मिळविणे शक्य वाटते. उर्वरित एक जागेकरिता कोणत्याही एका पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नाही. करिता, या जागेवरती अपक्ष म्हणून मला संधी देण्यात यावी, असे आवाहन मी सर्व राजकीय पक्षांना व अपक्ष आमदारांना केलेले आहे.
2007 पासून सामाजिक चळवळींच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात मी कार्यरत आहे. छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेली शिकवण आचरण करीत मी राजकारण विरहित कार्य करीत आलो आहे. राष्ट्रपतीनियुक्त खासदार असताना देखील कोणत्याही बाबतीत भूमिका घेताना वैयक्तिक राजकीय भवितव्याचा विचार न करता, सदैव समाजाला दिशा देण्याचीच भूमिका घेतली.
वाचा : संभाजीराजेंची वाट आता भाजपनेच अडवली, राज्यसभेची तिसरी जागा लढवणार?
संसदेत काम करीत असताना महाराष्ट्राच्या व देशाच्या हितासाठी कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता पक्षविरहित काम केले. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संतांच्या विचारांची बैठक असणारा हा महाराष्ट्र या विचारांवरून ढळू नये, यासाठी रस्त्यापासून ते संसदेपर्यंत मी झटत राहिलो. जनकल्याणालाच नेहमी व एकमेव प्राधान्य दिले. मात्र हे सर्व करताना लोकहिताची कामे करण्यासाठी हाती सत्तापद असणे हे किती सोयीस्कर असते, हे खासदाकीच्या कारकिर्दीत माझ्या लक्षात आले. याचमुळे, राज्यसभेच्या या सहाव्या जागेवर मी दावा करीत आहे. याकरिता मला आपणा सर्वांच्या मदतीची आवश्यकता आहे. माझी कारकीर्द व प्रामाणिक कार्यपद्धती पाहता, आपण सर्वजण राज्यसभेच्या या सहाव्या जागेसाठी मला निश्चितच सहकार्य कराल, अशी जाहीर अपेक्षा सदर पत्रान्वये मी व्यक्त करतो."
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra News, Rajya sabha, Sanjay raut, Shiv sena