मुंबई, 27 मे : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असून दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाय योजनांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय.
हेही वाचा -धडक दिल्यानंतर झाडासह टँकर धावत होता, विचित्र अपघाताचा VIDEO व्हायरल
तसंच गेल्या दिवसांपासून महाविकास आघाडी अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. अलीकडे भाजप नेत्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. या सगळ्या घडामोडींवर पडद्यामागे होत असलेल्या राजकारणावरही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विशेष म्हणजे, 'महाराष्ट्रात काँग्रेस सत्तेत आहे, मात्र आम्हाला मोठे निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस नाराज असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
हेही वाचा -काँग्रेस नेत्या अलका लांबा यांच्या अडचणीत वाढ, उन्नावनंतर लखनऊमध्ये FIR दाखल
राहुल गांधी म्हणाले की, 'कोरोनाची राज्यातली स्थिती गंभीर आहे. दाट वस्ती आणि प्रचंड मोठ्या लोकसंख्येमुळे महाराष्ट्रातली परिस्थिती बिघडली आहे. राज्य सरकार त्यांचं काम करत आहे. काँग्रेस राज्यात सत्तेत असली तरी मोठे निर्णय घेण्याचे अधिकार आम्हाला नाहीत. पंजाब, छत्तिसगड आणि राज्यस्थानमध्ये आम्ही तातडीने निर्णय घेऊ शकतो. पण महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी आहे.'
केंद्र सरकारने राज्य सरकारला आणखी मदत केली पाहिजे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. तसंच काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही 'राज्यात काँग्रेसचं नाही तर शिवसेनेचं सरकार आहे', असं वक्तव्य केलं होतं.