मुंबई, 01 मे: कोरोना रुग्णांची (Coronavirus) संख्या प्रचंड वाढली आहे. रुग्णांचे बेड आणि इतर सुविधांअभावी प्रचंड हाल होत आहेत. त्यात कोरोना रुग्णांना अॅम्ब्युलन्स मिळाली नाही तर त्यांना रुग्णालयात (Hospital) पोहोचणंही कठीण झालंय. अशा कठीण परिस्थितीमुळं मुंबईतील (Mumbai) एका शिक्षकानं (Teacher) सामाजिक जबाबदारी (Social Responsibility) ओळखत कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोफत रिक्षासेवा (Free Auto Service) उपलब्ध करून देत आहेत.
घाटकोपरमधील दत्तात्रय सावंत हे व्यवसायानं शिक्षक आहेत. शाळेत मुलांना इंग्रजीचा विषय ते शिकवतात. पण अंशकालीन आणि अल्प वेतनावर ते काम करतात. त्यामुळं आर्थिक घडी नीट राहावी यासाठी सावंत हे रिक्षा देखील चालवतात. मुंबईत मार्च महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढतेय. निर्बंध, लॉकडाऊननं लोक मेताकुटीला आलेत. अशा परिस्थितीत एका वृद्धेवर आलेली वेळ पाहून सावंत यांना सर्व सामान्यांना मदतीचा हात देण्याची प्रेरणा मिळाली.
(हे वाचा-अजबच! ऑक्सिजनसाठी पिंपळाच्या झाडाखाली झोपले रुग्ण, प्रकृती स्थिर असल्याचा दावा)
सावंत यांच्या जवळ राहणाऱ्या वृद्ध महिलेला कोरोनाची लागण झाली होती. पण त्यांना रुग्णालयात जायला रिक्षाच मिळत नव्हती. रात्री उशिरा त्या सावंत यांच्याकडे आल्या. तेव्हा सावंत यांनी त्यांना लगेचच रिक्षातून रुग्णालयात सोडलं. पण अशा गरजू लोकांच्या अडचणीत आपण कामी यावं, या उद्देशानं त्यांनी कोरोना रुग्ण आणि नातेवाईकांसाठी घर ते रुग्णालय आणि रुग्णालय ते घर अशी मोफत रिक्षा सेवा सुरू केली.
(हे वाचा-22 तास मृतदेह रुग्णालयातच पडून; बीडमध्ये प्रेताशेजारीच कोरोना रुग्णांवर उपचार)
शिक्षक असल्याने सामाजिक जबाबदारीची जाणीव सावंत यांना होतीच. त्यातून त्यांनी हा संकल्प सोडला आणि गेल्या 15 दिवसांपासून ते रुग्ण आणि नातेवाईकांना मोफत सेवा देत आहेत. रुग्णाला रुग्णालयात किंवा घरी सोडल्यावर ते रिक्षा सॅनिटाईज करतात तसंच पूर्ण सुरक्षा किट घालूनच रिक्षा चालवतात. इतर रिक्षा चालकही त्यांच कौतुक करत आहेत. घाटकोपरमधील ते राहत असेला परिसर आणि सोशल मीडियावरही त्यांच्या कामाची चर्चा आहे.
स्थानिक नगरसेवक सूर्यकांत दळवी यांनीही त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना सुरक्षा किट, तसंच रिक्षात फवारणी करण्यासाठी सॅनिटाईजर उपलब्ध करून दिलं. ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनीही त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचा सत्कार केला. कोरोना संपेपर्यंत जनसेवेचं हे काम सुरू ठेवणार असल्याचं दत्तात्रय सावंत सांगतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Mumbai News