मुंबई, 9 एप्रिल : मुंबईचा कोरोना फैलावासाठी सर्वाधिक धोकादायक परिसर असलेल्या धारावीत आणखी एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. धारावीत आतापर्यंत हा तिसरा कोरोनाबळी आहे. आज केईएम रुग्णालयात दाखल असलेल्या 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ती धारावीच्या कल्याणवाडी परिसरात राहात असे.
मुंबईत वरळी, प्रभादेवीनंतर आता धारावी Coronavirus चा हॉटस्पॉट सर्वांत धोकादायक ठरत आहे. आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या धारावीत दाटीवाटीच्या घरांमुळे हा विषाणू वेगाने पसरतो आहे. मार्चच्या शेवटी धारावीत पहिला रुग्ण सापडल्याची बातमी आली होती. आता धारावीत 14 कोरोनारुग्ण आहेत. आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
धारावीत रेड झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. 10 भागांमध्ये भाजीविक्रीसुद्धा बंद आहे. ये-जा करणारे रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत.
वाचा - कोरोनाचा विळखा : 24 तासांमध्ये तब्बल 549 नवे रुग्ण, तर 17 जणांचा मृत्यू
मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत प्रचंड वेगाने वाढ होत असून ठराविक भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. लोकसंख्येची जास्त घनता असलेल्या मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
आतापर्यंत धारावीत सापडलेल्या 14 रुग्णांपैकी चौघे डॉ.बलिगा नगर परिसरात राहणारे आहेत. त्यातल्या एकाचा मृत्यू झाला. सोशल नगर परिसरात राहणाऱ्या एका 70 वर्षीय व्यक्तीचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यानंतर आज कल्याणवाडीतील महिला या विषाणूमुळे मृत्युमुखी पडली.
वाचा - पुण्यात कम्युनिटी स्प्रेडचा धोका टाळण्यासाठी अनेक परिसर सील
धारावीत सापडलेले कोरोनारुग्ण हे बहुतेक हाय रिस्क म्हणजे धोका असलेल्या वयातले आहेत. आतापर्यंत वैभव अपार्टमेंट, मुकुंद नगर, मदिना नगर, धनवाडा चाळ, मुस्लीम नगर, सोशल नगर, जनता सोसायटी, कल्याणवाडी या धारावीच्या भागांमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण सापडले आहेत. धारावीचा हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.
मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात चाळी आणि झोपड्या आहेत. त्यात दाटीवाटीने लोक राहतात. अशा ठिकाणी कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यास त्या परिसरात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यातच वरळी कोळीवाडा, घाटकोपर, धारावी सारख्या विभागातील दाटीवाटीने राहणाऱ्या लोकांच्या वस्तीत कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.
अन्य बातम्या
कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी असा आहे नरेंद्र मोदींचा ‘मास्टर प्लॅन’
Lockdown मध्ये गुगलवर काय सर्च करत आहेत भारतीय, वाचून बसेल धक्का
लॉकडाऊन हटवताच वुहानमध्ये मांस खरेदीला वेग, अमेरिकेकडून बाजार बंद करण्याची मागणी