• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • #Mumbai 26/11- ‘थोडं घाईत आहे… नंतर फोन करतो’ पण तो फोन कधी आलाच नाही

#Mumbai 26/11- ‘थोडं घाईत आहे… नंतर फोन करतो’ पण तो फोन कधी आलाच नाही

तीन मुली आणि पतीच्या येण्याकडे आस लावून बसलेल्या पत्नीला कायमचं एकटं सोडून अरुण चित्ते गेले

  • Share this:
मुंबई, २३ नोव्हेंबर : २६ नोव्हेंबर २00८ची रात्र... मनीषा चित्ते घरी तीन मुलींसोबत एकट्याच होत्या. त्यांना पतीचा फोन आला. 'ड्युटी संपलीय, तरी साहेबांबरोबर जावं लागेल. मुंबईत गडबड झालीये...' हे ऐकल्यावर मी त्यांना म्हटलंही... की, स्वतःच्या जीवाला जपा. तो आमचा अखेरचा संवाद... मनीषा चित्ते सांगत होत्या. मनीषा यांचे पती अरुण रघुनाथ चित्ते पोलीस कर्मचारी होते. विजय साळस्कर यांच्या गाडीचे ते चालक म्हणून काम करायचे. नेहमीप्रमाणे आपली ड्युटी संपवून चित्ते घरी परतत होते. घरी परतत असताना त्यांना विजय साळसकरांचा फोन आला. मुंबईवर हल्ला झाला असून ते तिथे जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच रात्री दहशतवाद्यांच्या हल्ल्यात साळसकांबरोबरच चित्ते यांनाही वीरमरण आलं. २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला आजही मुंबईकर विसरलेले नाहीत. आतापर्यंत मुंबईकरांनी अनेक आघात उरावर झेलले. पण या हल्ल्याची मुंबईकरांना चांगलीच किंमत चुकवावी लागली. २६/११ च्या हल्ल्याला १० वर्षं पूर्ण होतायेत. १६४ नागरिकांचे या हल्ल्ल्यात नाहक बळी गेले. भारताचा कणा मोडण्याच्या उद्देशाने आलेल्या दहशतवाद्यांचा इरादा निष्फळ ठरवत दुसऱ्या दिवसापासून मुंबई नेहमीसारखीच ताठ मानेने चालायला लागली होती. पण, या हल्ल्यात ज्यांचं सर्वस्व गेलं त्यांचं काय? आज १० वर्षांनी त्या १६४ जणांना आणि मुंबई पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सामान्य नागरिक विसरला असेल. पण, त्यांच्या घरच्यांचं काय? म्हणतात ना ‘ज्याचं जळतं त्यालाच कळतं...’ ते आपल्या माणसाला विसरले का? विसरू शकतात का? या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना माहित असूनही कोणी बोलू शकणार नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका विरांगनाबद्दल सांगणार आहोत जी शहीद नवऱ्याचा शेवटचा व्हिडिओ पाहून त्यांच्या आठवणीत जगते. अरुण यांच्या जागी दुसरं कोणी असतं तर त्यांनी 'ड्युटी संपलेली असताना कशाला जा...' असं म्हणतं त्या गोष्टीकडे कानाडोळा केला असता. मात्र अरुण हे वेगळ्याच मातीचे बनले होते. आपले साहेब एकटे जात आहेत हे कळल्यावर अरूणही ड्युटी संपलेली असताना त्यांच्यासोबत घराच्या अर्ध्या वाटेवरून जायला निघाले. साळसकरांसोबत जाताना वाटेतच त्यांनी पत्नीला फोन केला. ‘मुंबई दहशतवादी हल्ला झाला असून साहेबांसोबत जात आहे,’ असा संदेश अरुण यांनी पत्नी मनिषा चित्ते यांना दिला. मनिषा फोनवर नवऱ्याला स्वतःच्या जीवाला जपा सांगत होत्या. तर दुसरीकडे बायकोशी बोलता बोलता ते गर्दीला दूर सारण्याचा प्रयत्न करत होते. ‘सध्या थोडं घाईत आहे, नंतर फोन करतो’ असं म्हणतच ते तिथे जमलेल्या जमावाला दूर करत होते. पण अचानक अजमल कसाब आणि अब्बू इस्माईलने विजय साळसकर, अशोक कामटे आणि हेमंत करकरे यांच्यावर बेछूट गोळीबार केला. यात अरूण चित्तेही शहीद झाले. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि चार संसार उद्ध्वस्त झाले. दहशतवाद्यांशी दोन हात करताना अरूण चित्ते यांना वीरमरण आलं. पण त्यांच्या मागे राहिलेल्या त्यांच्या पत्नी आणि ३ चिमुरड्या मुलींचं काय? हा विचार आजही केला तर अंगावर काटा येतो. १० वर्षांपूर्वी अरूण यांची सर्वात मोठी मुलगी कोमल फक्त ८ वर्षांची, दुसरी मुलगी स्नेहल ७ वर्षांची होती. तर आयुष्य म्हणजे नक्की काय हेच माहित नसलेली त्यांची तिसरी मुलगी खुशी ४ वर्षांची होती. आपल्या वडिलांना वीरमरण आलं, पण म्हणजे नक्की काय हे समजण्याची जाणही त्यांच्यात नव्हती अशावेळी त्यांच्या डोक्यावरून पित्याचं छत्र हरपलं. तीन मुली आणि पतीच्या येण्याकडे आस लावून बसलेल्या पत्नीला कायमचं एकटं सोडून अरुण चित्ते गेले. आज १० वर्षांनंतरही मनिषा आपल्या मुलींसोबत मुंबईत धारावी येथील पोलीस कॉलनीमध्ये राहत आहेत. अरुण चित्ते यांच्याबद्दल सांगताना मनिषा म्हणाल्या की, "त्या दिवशी त्यांनी मला अर्ध्या तासाने असे दोन तीन कॉल केले. पण माझ्या मनातही असं काही होईल याची कल्पना नव्हती. एका क्षणात आमचं अख्खं आयुष्य बदलून गेलं. मी कोलमडून गेले. त्यांचं जाणं मन सतत अमान्य करत होतं. पण मेंदू काही तरी वेगळंच सांगत होता." "कित्येक दिवस मी याच संभ्रमात काढले. मुली फारच लहान होत्या. पुढचं भविष्य संपूर्ण अंधःकारात दिसत होतं. पण कुटुंबाच्या पाठिंब्याने आजपर्यंतचे दिवस काढले. सुरुवातीला त्यांची फार आठवण यायची. फार एकटं वाटायचं. पण माझं रडू कोणाला दाखवू शकत नव्हते. मीच तुटले तर मुलींचं काय या विचाराने स्वतःला सावरायचे." "आज १० वर्षात मुलीही मोठ्या झाल्या आहेत. आता जगणं सोप्पं झालं आहे. पण अजूनही असा एकही दिवस नसेल जेव्हा मला त्यांची आठवण येत नाही. घरातल्या एखाद्या चांगल्या प्रसंगावेळी मला त्यांची प्रत्येकवेळी आठवण येते." जगासाठी मनिषा आज वीरपत्नी... मुलींसाठी धैर्याने उभी राहिलेली आई असेल, पण त्यांनी काय गमावलं याची जाणीव त्या सोडून इतर कोणालाच होऊ शकत नाही. #Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार! #Mumbai26/11:'कसाबने हल्ला केला तेव्हा मी त्याच गाडीत होतो' #Mumbai26/11 : कसाबला फासापर्यंत नेणारं Mission X 'या' महिला अधिकाऱ्यानं केलं पूर्ण
First published: