Home /News /mumbai /

#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार!

#Mumbai26/11 : मला कसाबची मुलगी म्हणायचे आणि मी IPS आॅफिसर होणार!

मी खाली कोसळले समोर बघते तर एक दहशतवादी अंदाधुंद गोळ्या झाडत होता, जिथे त्याची नजर जाईल तिथे लोकांवर गोळ्या झाडतं होता...लोकांचा रडण्याचा, किंचाळण्याचा आणि गोळ्या झाडण्याच्या आवाजाने सीएसटी स्टेशन हादरून गेलं होतं...तो हसत हसत, चेहऱ्यावर कोणताही लवलेश नसताना गोळीबार करत होता...तो अजमल कसाब होता...

पुढे वाचा ...
मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्याला १० वर्षं पूर्ण होत आहे. २६ नोव्हेंबर 2008 ला मुंबईत १० दहशतवाद्यांनी निष्पापांची कत्तल करत हाहाकार माजवला होता. यामध्ये १६४ निष्पाप नागरिक आणि सुरक्षा अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. मुंबई पोलिसांचे कर्तबगार अधिकारी विजय साळस्कर, अशोक कामटे आणि हेमंत करकरे या हल्ल्यात शहीद झाले होते. तुकाराम ओंबाळे यांनी आपल्या प्राणांची आहुती देत अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडलं होतं. आजच्या दिवशीच म्हणजे २१ नोव्हेंबर 2012 रोजी क्रूरकर्मा अजमल कसाबला फासावर लटकवण्यात आलं होतं. दहशतवादी हल्ल्यात पकडला गेलेला एकमेव जिवंत दहशतवादी कसाब होता. जगातली ही पहिली घटना होती. पण कसाबला फासापर्यंत पोहोचवण्याच्या कामात मोलाची भूमिका बजावली ती देविका रोटावन या तरुणीने. त्यावेळी ती फक्त ९ वर्षांची होती. आम्ही देविकाला भेटलो आणि तिची कहाणी जाणून घेतली. गेल्या १० वर्षांतला तिचा अनुभव तिच्याच शब्दांत... "मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला दहा वर्ष झाली, पण आमचे आयुष्य जिथेच्या तिथेच आहे,मी जिथे राहते तिथे मला कसाबची मुलगी म्हणयाचे, तुम्ही इथं आल्यावर कुणालाही २६/११ वाली कुठे राहते विचारलं तर लोकं तुम्हाला कसाबची मुलगी इथं राहते म्हणून आणून सोडतील" तो दिवस मी आणि माझं कुटुंब कधीच विसरू शकत नाही. २६ नोव्हेंबर २००८ ला संध्याकाळी मी, माझा भाऊ आणि वडील असे आम्ही तिघे जण वांद्र्याहुन सीसीएसटीला जायला निघालो.सीएसटीहुन आम्हाला पुण़्याला जायचं होतं.सीसीएसटी स्टेशनवर पोहोचल्यावर आम्ही १२ क्रमांकाच्या प्लेटफॉर्म वर एक्स्प्रेसची वाट पाहत होतो. माझा भाऊ टॉयलेटसाठी गेला होता. तितक्यात अचानक एकच गोंधळ उडाला, गोळ्या झाडण्याचा आवाज येत होता, लोकं किंचाळत,आराडाओरड करत पळत होती, पप्पांनी माझा हात धरला आणि गर्दीसोबत पळत जाण्याचा प्रयत्न केला, तेवढ्यात माझ्या पायाला काही तरी लागलं, खूप वेदना झाली, मी खाली कोसळले समोर बघते तर एक दहशतवादी अंदाधुंद गोळ्या झाडत होता, जिथे त्याची नजर जाईल तिथे लोकांवर गोळ्या झाडत होता. लोकांचा रडण्याचा, किंचाळण्याचा आणि गोळ्या झाडण्याच्या आवाजाने सीएसटी स्टेशन हादरून गेलं होतं. तो हसत हसत, चेहऱ्यावर कोणताही लवलेश नसताना गोळीबार करत होता...तो अजमल कसाब होता. माझ्या पायाला गोळी लागली, पायाचे हाड मोडले, काही वेळानंतर मी बेशुद्ध पडले. मी त्यावेळी फक्त नऊ वर्षांची होती जेव्हा मला जाग आली तेव्हा मी कामा हॉस्पिटलमध्ये होते. पप्पा आणि भावाला पाहुन मला रडू कोसळलं. पायाला प्रचंड वेदना होत होती. जणू कुणी पायावर दगड ठेवला. कामा हॉस्पिटलमध्ये महिनाभर माझ्यावर उपचार झाले पण पुढील ऑपरेशनसाठी मला जेजे रुग्णालयात हलवण्यात आलं तिथे माझ्यावर ऑपरेशन झालं. जेजे रुग्णालयात असताना माझा भाऊ माझ्यासोबत असायचा. पायाला जखम झाल्यामुळे तो ड्रेसिंग करायचा तिथे इतरही जखमी लोकं होती. माझ्या पायची ड्रेसिंग करत असायचा ते पाहुन इतर जण आमचीही ड्रेसिंग कर म्हणून विचारायचे...त्यानेही मोठ्या मनाने इतरांच्या जखमेचं पण ड्रेसिंग केलं पण त्याची एक चूक झाली. त्याने डॉक्टरांसारखे हातात गल्ब्ज घातले नाही, ना ही मास्क घातला तेव्हा त्याला फारसं काही कळत नव्हतं. त्याने उघड्या हाताने ड्रेसिंग केली पण त्यामुळे त्याला इन्फेक्शन झालं ते इतकं वाढलं की त्याच्या गळ्यात गाठ आली. आम्ही झोपडपट्टीत राहणारे आम्हाला काय करावं, सुचतं नव्हतं पुढे त्याचं ऑपरेशन करावं लागलं. पण इन्फेक्शनमुळे त्याची पुरती वाट लागली. त्याच्या पाठीचे हाड बाहेर वाकलं, त्याच्या पाठीला कुबड निघालं, माझा धडधाकट भावाला कायमची इजा झाली. माझ्या पायाला गोळी लागली नसती,ना दुखापत झाली असती तर आज माझा भाऊ इतरांसारखा धडधाकट राहिला असता. त्या एका गोळीने माझं आयुष्य बदलून टाकलं. जेजे रुग्णालयातून उपचार घेऊन आम्ही आमच्या गावी राजस्थानला गेलो त्यानंतर एकेदिवशी पोलिसांचा फोन आला. पप्पांना विचारलं साक्ष देणार का ? मी कसाबला पाहिलं होतं. पप्पांनी मी ठरवलं. ज्या कसाबने इतक्या जणांचा जीव घेतला त्याला शिक्षा झालीच पाहिजे. आम्ही मुंबईत आलो. मी नऊ वर्षांची होते. पायाला जखम अजूनही भरलेली नव्हती. कुबड्या घेऊन कोर्टात गेले होते. कोर्टात गेल्यावर कसाब बसलेला होता. मी पाहताच त्याला ओळखलं. त्याला पाहिल्यावर खूप राग येत होता. वाटत होतं, त्याच्यावर कुबड्या फेकून मारू पण तसं करू शकत नव्हते. कोर्टात मला शपथ दिली. न्यायाधीशांनी मला विचार कसमचा अर्थ तुला माहिती आहे का ? मी म्हटलं,"जर मी खरं बोलतेय तर देव मला साथ देईल नाहीतर शिक्षा" कोर्टातली प्रक्रिया पूर्ण झाली. मी साक्ष दिली ती एक देशाची जबाबदार नागरिक म्हणून मला आणि माझ्या पप्पांना याचा अभिमान आहे की आम्ही देशासाठी काही तरी करू शकलो. लोकांनी कौतुक केलं, सत्कार केले, खूप सारे इंटरव्यू झाले,खूप नेते भेटले आश्वासनं दिली,खूप बरं वाटत होतं,खूप लोकांनी मदतही केली.  वर्ष उलटत गेले. पण आमच्या आयुष्यात फार मोठा बदल झाला नाही. माझ्या पप्पांचा ड्रायफ्रुटचा व्यवसाय होता. आम्ही कमवून खात होतो,सुखी होतो पण 26/11 च्या घटनेनंतर अचानक सारं काही बदललं. लोकं म्हणायचे तुमच्या दुकानात कुणी बॉम्बस्फोट घडवतील, गोळीबार करतील, लोकांनी पप्पांना माल देण कमी झालं त्यामुळे पप्पांचा व्यवसाय बंद झाला. नातेवाईकही आम्हाला टाळायला लागले. नातेवाईक आम्हाला घरी बोलवत नव्हते. तेही असंच म्हणायचे, तुम्ही दहशतवाद्याविरोधात साक्ष दिली ते आम्हालाही मारतील, तुम्ही आला तर गोळीबार करतील, वाईट वाटायचं. आम्ही असा काय गुन्हा केला ज्यांची अशी शिक्षा मिळतेय. आम्ही नातेवाईकांच्या घरी एखाद्या कार्यक्रमाला गेलो तर बाहेरच थांबतो. माझं शैक्षणिक नुकसानही झालं. मला शाळेत कुणी प्रवेश देत नव्हते. मला प्रवेश दिला आणि कुणी बॉम्बस्फोट केला तर अशी भीती त्यांना होती.  एका संघटनेनं माझ्यासाठी लढा दिला त्यानंतर मला शाळेत प्रवेश मिळाला पण माझी चार वर्ष वाया गेली. शाळेत गेल्यानंतरही भीती वाटायची पण मी हिंमत सोडली नाही. मध्यंतरीच्या काळात मला टीबी झाला. घरची परिस्थिती बेताच त्यात आजार झाला. आमच्याकडे पैसे नव्हते खूप जणांना मदत मागितली. काही जण समोर आले त्यांनी आम्हाला मदत दिली पण खर्च काही भागत नव्हता. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टि्वट करून माहिती दिली. माझी आर्थिक परिस्थितीची जाणीव करुन दिली पण त्यांचे काही उत्तर आले नाही. दिल्लीतून एका अधिकाऱ्याने फोन केला होता. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार करायचा सांगितला. आम्ही त्यांना माहिती दिली सगळंं काही कळवलं. पप्पांनी मंत्रालयाचे उंबरठे झिजवले अखेर त्यांनी आर्थिक मदत केली. यात दीड वर्षांचा काळ गेला. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आर्थिक मदतीमुळे माझ्यावर उपचार होऊ शकले. पण, मला पंतप्रधान मोदींना भेटायचं अाहे त्यांना भेटून खूप काही सांगायचं आहे. मला मोठं होऊन आयपीएस ऑफिसर व्हायचं आहे, दहशतवाद्यांना ठार मारायचंय.ज्यांनी माझ्या मुंबईवर हल्ला केला त्या मास्टरमाईंड लोकांना धडा शिकवायचा आहे. आज दहा वर्ष उलटली...काळ कसा गेला काही कळलं नाही.पण या आज मागे वळून पाहिलं तर तो दिवस जशाचा तशाच आहे. त्या जखमा अजूनही ताज्या आहेत खूप चांगले वाईट अनुभव आले.आम्ही चांगले अनुभव मनाशी ठेवून जगतोय.आम्ही तिघेच एकमेकांसाठी सर्व काही आहे.मला लोकांना सांगावसं वाटतं ती आमच्यासोबत कशीही वागली पण आम्ही देशासाठी लढलो आणि लढत राहणार....!! आजच्या दिवशी सहावर्षांपूर्वी कसाबला फासावर लटकवण्यात आलं होतं. कसाबला फाशीच्या तख्तापर्यंत पोहोचवणाऱ्या महिला अधिकाऱ्याचे अनुभव याच मालिकेच्या पुढील भागात... ===============================
First published:

Tags: Mumbai

पुढील बातम्या