ठाणे, 26 नोव्हेंबर: ठाण्यातील राबोडीतील मनसेचे पदाधिकारी जमील शेख (Jameel Sheikh) यांची तीन दिवसांपूर्वी भर चौकात गोळी झाडून निर्घृण हत्या (Murder)करण्यात आली होती. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी यश मिळालं असून एकाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केलं असता त्याला 3 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तीन दिवसांपूर्वी जमील शेख यांची राबोडीत गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. नंतर आरोपी पसार झाले होते.
हेही वाचा...मनसे मोर्चाला हिंसक वळण, वीज कार्यालयाची तोडफोड, अभियंत्याच्या कॅबिनचीही नासधूस
हत्येचा आरोप राजकीय नेत्यावर...
जमील शेख यांच्या पार्थिवावर काल बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मनसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जमील याच्या हत्येमागे राजकीय नेत्याचा हात असावा, असा आरोप जमील यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
भाजप नेत्यानं उपस्थित केलं प्रश्नचिन्ह...
ठाण्यात एका महिन्यात 2 मनसे पदाधिकाऱ्यांची हत्या करण्यात आली आहे. यावरून भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (BJP Leader Pravin Darekar) यांनी कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. प्रवीण दरेकर यांनी ठाणे पोलीस आयुक्तांशी संपर्क साधून गुन्ह्यांतील आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी केली होती.
ठाण्यातील राबोडी येथे मनसैनिक जमील शेख हत्येप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी ठाणे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी फोन वरुन चर्चा केली. हत्येला 24 तास उलटून गेली तरी ठाणे पोलिसांना जमील शेख यांच्या मारेकऱ्यांचा काहीच सुगावा लागला नाही. त्यामुळे ठाणे पोलिस नेमकं करतायेत काय? असा सवाल प्रवीण दरेकर यांनी ठाणे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांना फोनवरुन विचारला होता.
जमील शेख यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी 6 विशेष तपास पथक तयार केले असून दुचाकीवरुन आलेले मारकेरी हे सराईत गुन्हेगार होते. त्यांच्या गाडीचा नंबर देखील बनावट होता. पण ठाणे पोलिस लवकरच जमील शेख यांच्या मारेकऱ्यांना पकडतील, असा विश्वास ठाणे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्याकडे व्यक्त केला आहे.
डोक्यात झाडली गोळी...
ठाण्यामध्ये सोमवारी मनसे पदाधिकारी जमील शेख यांची हत्या करण्यात आली. डोक्यात गोळी झाडून अज्ञात मारेकरी पसार झाले होते. या घटनेमुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली होती. जमील शेख यांची हत्या का करण्यात आली असावी, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
दुसरीकडे, या घटनेचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागला असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, जमीलच्या हत्येनंतर राबोडी भागात तणावाचे वातावरण झाल्याने घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
हेही वाचा...कार-टँकरचा भीषण अपघात, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यासह चार जण जागेवरच ठार
दरम्यान, गेल्या महिन्यात 27 तारखेला रोजी अंबरनाथमध्ये मनसेचे शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांची तीक्ष्ण हत्याराने हत्या करण्यात आली होती. अंबरनाथच्या पालेगाव परिसरातील जैनम रेसिडेन्सी परिसरात पाटील यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. हल्ल्याच्यावेळी पाटील यांनी त्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र, अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी वार केले. गंभीर जखमी अवस्थेत पाटील यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारा पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.