मुंबई, 23 जून : शिवसेनेत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली खदखद आता पत्रातून बाहेर आली आहे. शिवसेना आमदार संजय शिरसाठ (Sanjay Shirsath) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना उद्देशून जाहीर पत्र लिहलं आहे. या पत्रात शिरसाठ यांनी पक्षातील बडव्यांवर हल्लाबोल करत आमदारांचा असंतोष मांडला आहे. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) 'ही आहे आमदारांची भावना' या कॅप्शनसह हे पत्र ट्विट केलं आहे.
शिरसाठ यांचा लेटरबॉम्ब
श्री. उद्धवजी ठाकरे
मुख्यमंत्री, महाराष्ट्र
आमचा विठ्ठल हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांना वंदन करून हे पत्र लिहितोय
पत्रास कारण की...
काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दारं गेली अडीच वर्षं शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही थेट प्रवेश मिळाला नाही. मंत्रालयात सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्री सर्वांना भेटतात पण आमच्यासाठी तर सहाव्या माळ्याचाही प्रश्न आला नाही कारण तुम्ही मंत्रालयात कधी गेलाच नाही.
आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी, आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांमधून निवडून न येणाऱ्या, बडव्यांची मनधरणी करायला लागत होती. अनेक वेळा विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्हाला बोलवलंय असा निरोप बडव्यांकडून यायचा पण तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं. फोन केला तर बडवे फोन रिसिव्ह करत नसायचे. शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो.
तीन ते चार लाख मतदारांमधून निवडून येणाऱ्या आम्हा स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक का? हा आमचा सवाल आहे. मात्र याचवेळी आम्हाला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा दरवाजा उघडा होता. आमची ही सर्व गाऱ्हाणी पक्षात फक्त शिंदे साहेबच ऐकत होते आणि सकारात्मक मार्ग काढत होते.
हिंदुत्व, अयोध्या, राम मंदिर हे मुद्दे शिवसेनेचे आहेत ना? मग आता आदित्य ठाकरे अयोध्येला गेले तेंव्हा आम्हाला अयोध्येला जाण्यापासून तुम्ही का रोखलं? मी आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांचे लगेज चेक इन झाले होते, आम्ही विमानात बसणार इतक्यात तुम्ही शिंदे साहेबांना फोन करून सांगितले की आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका आणि जे गेलेत त्यांना तुम्ही स्वतः परत घेऊन या. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे एकही मत फुटले नव्हते मग विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर आमच्यावर इतका अविश्वास का दाखवला? आम्हाला रामल्लांचे दर्शन का घेऊ दिले नाही?
भाजप करणार सरकार स्थापनेचा दावा; सोमवारी शपथविधी होणार? वरिष्ठ नेत्यानी दिली महत्त्वाची माहिती
साहेब जेव्हा आम्हाला वर्षावर प्रवेश मिळत नव्हता तेव्हा आमचे खरे विरोधक काँग्रेस, राष्ट्रवादीचे लोक तुम्हाला नियमित भेटत होते. मतदारसंघातली कामं करत होते. निधी मिळाल्याचं पत्र नाचवत होते. भूमिपूजन आणि उद्घाटनं करत होते. तुमच्यासोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत होते. त्यावेळी आमच्या मतदारसंघातले लोक विचारायचे की मुख्यमंत्री आपला आहे ना? आपल्या विरोधकांना निधी कसा मिळतो? त्यांची कामं कशी होतात?
काल तुम्ही जे काही बोललात, जे काही झालं ते अत्यंत भावनिक होतं. पण त्यात आमच्या मूळ प्रश्नांची उत्तरं कुठेच मिळाली नाहीत. त्यामुळे आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे भावनिक पत्र लिहावं लागलं.
कळावे, लोभ असावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.