मुंबई, 25 जून : शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री आणि नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या विरोधात बंड पुकारलं आहे. विधानपरिषद निवडणुकीनंतर ही नाराजी उफाळून आली. सध्या शिंदे यांचा गुवाहाटीमध्ये मुक्काम असून आपल्यासोबत शिवसेनेचे बहुसंख्य आमदार असल्याचा त्यांचा दावा आहे. शिवसेनेच्या 55 पैकी 38 आमदारांच्या सहीचं पत्रं शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.
शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. राज्यात नव सरकार येणार की पुन्हा निवडणुका होणार या चर्ची सध्या सुरू आहेत. त्याचवेळी एक मोठी बातमी गृहखात्याच्या वरिष्ठ सूत्रांनी 'News18लोकमत'ला दिली आहे. शिवसेनेच्या नाराजीची मुख्यमंत्र्यांना कल्पना होती, तसा रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देण्यात आला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिवसेनेत अंतर्गत नाराजी आहे, काळजी घ्या असा गुप्तचर विभागाचा रिपोर्ट होता. मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना याबाबत माहिती देण्यात आली होती. गेली वर्षभर नाराजी असल्याचे गुप्तचर विभागाचे इनपूट होते. या इनपूटकडे दुर्लक्ष करण्यात आलं का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याकडं दुर्लक्ष केलं का? असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.
शिंदे गटाचं नाव ठरलं!
सध्या गुवाहाटी मुक्कामी असलेल्या एकनाथ शिंदे गटाचं नाव निश्चित झाल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे गटाला शिवसेना बाळासाहेब ठाकरे नाव देण्यासाठीच्या हालचाली सुरू आहेत. आज संध्याकाळी याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचं समोर येत आहे.आता या नावाला शिवसेनेकडून विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
VIDEO : शिवसैनिकांचा राडा! आमदार तानाजी सावंतांचे कार्यालय फोडले
'ठाकरे आणि शिवसेना हे नाव न घेता जगून दाखवावं', असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिलं होतं. त्यानंतर 24 तासांच्या आतच शिंदे यांच्या गटाचं नाव समोर आलं असून त्यांनी ठाकरे यांच्या आवाहनाकडं साफ दुर्लक्ष केल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवसेनेच्या आमदारांनी आणि नेत्यांनी शिंदे गटाला बाळासाहेबांचं नाव वापरण्याचा अधिकार नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. हे नाव स्वार्थासाठी घेतलेलं असून हे सगळं बंडखोरांना बाळासाहेबांना मिळवून दिलं तरीही अशाप्रकारे गद्दारी करणाऱ्यांना हा अधिकारी नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.