मुंबई, 25 जून : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुकारलेल्या बंडाचा शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून विरोध करण्यास सुरूवात केली आहे. शिंदे समर्थक आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या पुण्यातील कार्यालयाची संतप्त शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे. पुण्यातील बालाजी नगर भागात सावंत यांचे बंधू प्रा. शिवाजी सावंत यांच्या भैरवनाथ साखर कारखान्याचे कार्यालय आहे. या कार्यालयाला शिवसैनिकांनी लक्ष्य केलं.
शिवसेना आमदार तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयाची शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे pic.twitter.com/k2y7dVzupT
— News18Lokmat (@News18lokmat) June 25, 2022
शिंदे समर्थक आमदारांना धडा शिकवला जाईल असा इशारा काही शिवसेना नेत्यांनी यापूर्वी दिला होता. त्यानंतर शिवसैनिकांनी सावंत यांच्या कार्यलयाला धडा दिला. सावंत हे सत्ता असताना शिवसेनेत आले त्यांनी सर्व पद उपभोगली आणि आता पक्षाशी गद्दारी केली, असा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. गद्दारांना धडा शिकवण्याची सुरूवात पुण्यात झाली आहे, आता संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकारे आंदोलन केले जाईल असा इशारा संतप्त शिवसैनिकांनी दिला आहे. एकनाथ शिंदेंचा इशारा राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. आमदारांच्या कुटुंबीयांना काही झालं तर मुख्यमंत्री, शरद पवार, आदित्य ठाकरे, संजय राऊत जबाबदार असतील , असा इशारा शिंदे यांनी ट्विट करून दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र, आमदारांची संख्याच सह्यानिशी दाखवली ‘अलीकडेच पंजाब राज्यातही अशीच परिस्थिती घडली होती, जिथे राज्य सरकारने अनेक हायप्रोफाईल व्यक्तींची सुरक्षा काढून टाकली होती, त्यामुळे बहुतेक हायप्रोफाईल लोक गुंडांचे लक्ष्य बनले होते, हे नमूद करणे वावगे ठरणार नाही. राज्य आणि आमदारांची सुरक्षा काढून घेतल्याने महाराष्ट्र राज्यातही असाच परिणाम होण्याची शक्यता आहे,’ असा आरोप शिंदे यांनी या पत्रात केला आहे.