..नाहीतर मी गाडीत बसून निघून जाईन, अजितदादा जेव्हा भडकतात

..नाहीतर मी गाडीत बसून निघून जाईन, अजितदादा जेव्हा भडकतात

विशेष म्हणजे, असा प्रकार पहिल्यांदाच घडला नाही, तर याआधीही अजित पवार असेच पत्रकारांना टाळून गाडीत बसून निघून गेले होते

  • Share this:

मुंबई, 01 जानेवारी : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार परखड बोलण्यासाठी ओळखले जातात. अनेक भाषणांमधून अजितदादांची फटकेबाजी पाहण्यास मिळते.  आज मंत्रालयामध्ये  झालेल्या बैठकीनंतर अजित पवार जेव्हा पत्रकारांना सामोरे गेले तेव्हा झालेल्या गोंधळामुळे ते चांगलेच भडकले.

मंत्रालयामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीला मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही उपस्थितीत होते. या बैठकीमध्ये खातेवाटप, केबिन वाटप आणि पालकमंत्रिपदाबाबत चर्चा झाली. ही बैठक संपल्यानंतर अजित पवार बाहेर आले असता पत्रकारांनी त्यांना घेराव घातला. यावेळी पत्रकारांनी प्रश्नांचा भडीमार सुरू केल्यामुळे एकच गोंधळ उडाला.  त्यामुळे अजित पवारांनी पहिले तुम्ही तुमचं संपवावा, हा आवाज बंद करा, असं आवाहन केलं. पण तरीही गोंधळ सुरूच होता. त्यानंतर अजित पवार चांगलेच भडकले. आवाज जर कमी झाला नाहीतर मी गाडीत बसून निघून जाईन, असा इशाराच त्यांनी दिला.

अखेर अजित पवारांनी हात जोडून सर्व पत्रकारांना 'तुम्ही शांत राहा, नाहीतर मी माझ्या पुढच्या कार्यक्रमाला निघून जाईल', असं म्हटल्यानंतर सर्व जण शांत झाले. त्यानंतर अजित पवारांनी पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना उत्तरं दिली.

मी बारामतीला चाललोय'

विशेष म्हणजे, असा प्रकार पहिल्यांदाच घडला नाही, तर याआधीही अजित पवार असेच पत्रकारांना टाळून  गाडीत बसून निघून गेले होते. त्यावेळी त्यांनी 'मी बारामतीला चाललोय' असं सांगून एकच गोंधळ उडवून दिला होता. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची जेव्हा सत्ता स्थापनेसाठी चर्चा सुरू होती. तेव्हा शरद पवार यांच्या निवासस्थानी 'सिल्व्हर ओक'वर राष्ट्रवादी, काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरू होती. या बैठकीतून अचानक अजितदादा बाहेर आले आणि गाडीत बसून निघाले होते. त्यावेळी पत्रकारांनी अजितदादांना गाठले असता त्यांनी  'मी बारामतीला चाललोय' असं उत्तर दिलं होतं. त्यानंतर खुद्द शरद पवार यांना बाहेर येऊन अजितदादा मस्करीने बोलले असतील, असं सांगून वादावर पडदा टाकला होता.

खाटेवाटपासह पालकमंत्र्यांचा होणार निर्णय

महाविकासआघाडी सरकार हे तिन्ही पक्षांनी एकत्र मिळून स्थापन केले आहे. त्यामुळे खातेवाटपाबाबत पक्षानुसार सविस्तर चर्चा झाली. खातेवाटपाबाबत जवळपास निर्णय झाला आहे. याची घोषणा उद्यापर्यंत होईल असं मला वाटतंय. शेवटी हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घेतील, असं अजित पवार यांनी सांगितलं. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या खाटेवाटपाची यादी ही शरद पवार यांच्याकडे देण्यात आली आहे, याबद्दल ते अंतिम निर्णय घेतील, असंही अजितदादांनी सांगितलं. तसंच या बैठकीमध्ये पालकमंत्री वाटपाबद्दलही चर्चा झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, आज दिवसभर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख नेत्यामध्ये खातेवाटप बाबत खलबतं सुरूच होती. पण अजूनही अधिकृतरित्या खातेवाटप जाहीर नाही. सकाळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात नवनियुक्त मंत्री अशोक चव्हाण आणि विजय वडेट्टीवार यांची पहिल्यांदा सकाळी दहा वाजता स्वतंत्र बैठक झाली. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली.

या बैठकीला काँग्रेसचे बहुतेक सर्व नेते तसंच आदित्य ठाकरे उपस्थित होते. या बैठकीनंतर न उद्धव ठाकरे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे सर्वजण पोहोचले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि अर्थमंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमवेत खातेवाटप चर्चा केली. या बैठकीत कालांतराने उपमुख्यमंत्री अजित पवार देखील सहभागी झाले.

बैठकीनंतर बाळासाहेब थोरात, जयंत पाटील आणि गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी खातेवाटपात पक्षात कोणताही मतभेद नाही. खातेवाटप आणि शासकीय बंगले वाटप लवकर केले जाईल, असं सांगितलं.

रात्री उशिरापर्यंत अधिकृतरित्या मुख्यमंत्री कार्यालय खातेवाटप जाहीर करेल का याची चर्चा मात्र दिवसभर प्रशासकीय पातळीवर राहिली. महाविकासआघाडीचे नेते खातेवाटपाचा तिढा सुटल्याचा दावा करत असतानाच उशिरापर्यंत खातेवाटप जाहीर झालेले नाही.

First published: January 1, 2020, 9:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading