Home /News /mumbai /

कोरोनाशी लढणारी अशीही 'आमची मुंबई', जमिनीखालीही पार पाडले जात आहे कर्तृव्य!

कोरोनाशी लढणारी अशीही 'आमची मुंबई', जमिनीखालीही पार पाडले जात आहे कर्तृव्य!

बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे मुंबईकरांना दररोज सुमारे चारशे कोटी लिटर पाण्याचा पुरवठा अव्याहतपणे करण्यात येत आहे.

मुंबई, 05 मे : महाराष्ट्रापुढे कोरोनाचे मोठे संकट उभे ठाकले आहे. राज्याची राजधानी मुंबईला कोरोनाचा मोठा विळखा बसला आहे. परंतु, तरीही  विविध नागरी सेवा सुविधा अव्याहतपणे देणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे मुंबईकरांना दररोज सुमारे चारशे कोटी लिटर पाण्याचा पुरवठा अव्याहतपणे करण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्यातील अधिकारी व कर्मचारी अक्षरश: दिवस-रात्र अव्याहतपणे कार्यरत आहेत. तर याचसोबत भविष्यातील गरजांचा अंदाज बांधून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प खात्यातील अभियंता आणि कर्मचारी नवनवीन प्रकल्प दीर्घकालीन नियोजनाचा भाग म्हणून हाती घेत असतात. याच अनुषंगाने या खात्याद्वारे सध्या दोन मोठे जलबोगदे बांधण्याचा प्रकल्प यापूर्वीच हाती घेण्यात आला आहे. तर पाच ठिकाणी जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. या कामांच्या अनुषंगाने करण्यात आलेले सूक्ष्म स्तरीय व दीर्घकालीन नियोजन आणि त्याची अंमलबजावणी यामुळे सध्याच्या 'लॉकडाउन'च्या काळाचा प्रतिकूल परिणाम न होता. निर्धारित वेळापत्रकानुसारच, ही कामे अव्याहतपणे सुरू आहेत, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प खात्याचे (Water Supply Projects) प्रमुख अभियंता शिरिष दीक्षित यांनी दिली आहे. जमिनीखाली बांधणार जलबोगदा भविष्यातील गरजांचा व लोकसंख्येचा अंदाज घेऊन त्यानुसार पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे गरजेचे असते. जेणेकरून नागरिकांना अव्याहतपणे पाणीपुरवठा होत राहील व असुविधा होणार नाही. या दीर्घकालीन नियोजनाच्या अनुषंगाने सध्या बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात दोन महत्त्वाच्या जमिनीखालील जलबोगद्यांचे काम प्रगतीपथावर आहे. यापैकी एक जलबोगदा हा चेंबूर ते वडाळा ते परळ यादरम्यान 9.7 किलोमीटर लांबीचा व 2.5 मीटर व्यासाचा बांधण्यात येत आहे. हा जलबोगदा बांधण्याचे काम पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार सुरू असून सध्याच्या लॉकडाऊनच्या काळातही अव्याहतपणे सुरू असलेल्या या जलबोगद्याच्या बांधकामामुळे भविष्यात 'एफ उत्तर', 'एफ दक्षिण' या दोन विभागांसह 'ई' व 'एल' या दोन विभागातील काही परिसरांना लाभ होणार आहे. हेही वाचा - डॉ. अमोल कोल्हेंची पत्नी आहे 'कोरोना योद्धा',रुग्णसेवेसाठी डॉ. अश्विनीही मैदानात या चारही विभागांच्या भविष्यातील लोकसंख्येचा अंदाज बांधून आणि भविष्यातील बदलांचा आणि गरजांचा वेध घेऊन हे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम निर्धारित वेळापत्रकानुसार वर्ष  2026 मध्ये पूर्णत्वास जाईल. तर दुसरा जलबोगदा हा चेंबूर ते तुर्भे (Trombay) यादरम्यान 5.5 किलोमीटर लांबीचा व 2.5 मीटर व्यासाचा असणार आहे. हा जलबोगदा बांधण्याचे कामही सध्या अव्याहतपणे सुरू आहे. या जलबोगद्यांमुळे भविष्यात 'एम पूर्व', 'एम पश्चिम' या दोन विभागांसह 'इ' व 'एल'' विभागातील काही परिसरांना लाभ होणार आहे. हे काम देखील भविष्यातील गरजांचा अंदाज बांधून हाती घेण्यात आले आहे. निर्धारित वेळापत्रकानुसार या जलबोगद्याचे काम हे वर्ष 2024 मध्ये पूर्ण होईल. पर्यायी जलवाहिन्या टाकण्याची मोठी कामे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अत्यावश्यक सेवेचा भाग असणारा पाणीपुरवठा अव्याहतपणे सुरू राहावा; सध्या कार्यरत असलेल्या जलवाहिनीचे अंदाजे आयुर्मान लक्षात घेऊन ते संपण्यापूर्वीच पर्यायी व्यवस्था तयार करणे, आवश्यक असते. या अनुषंगाने सध्या पाच ठिकाणी मोठी कामे सुरू आहेत. यापैकी पहिले काम हे बाळकुम ते हजुरी पूल यादरम्यान 90 वर्ष जुन्या दोन ब्रिटिशकालीन जलवाहिन्यांना आहेत. या जलवाहिन्या जुन्या झालेल्या असल्याने त्यांना पर्याय म्हणून त्यांच्या लगत 4.5  किलोमीटर लांबीची व 3 मीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम पुढील वर्षी पूर्ण होईल. या कामामुळे जुन्या ब्रिटिशकालीन जलवाहिन्या भविष्यात खराब झाल्या तरी या पर्यायी जलवाहिन्या उपलब्ध असल्यामुळे पाणीपुरवठा अव्याहतपणे सुरू राहील. हेही वाचा - संपूर्ण मुंबई महानगराला भाजीपाला पुरवणाऱ्या बाजारातच घुसला कोरोना व्हासरस त्याप्रमाणेच हजुरी पूल ते सॅडल टनेल यादरम्यान आणि पवई ते मरोशी यादरम्यान देखील 90 वर्षे जुन्या प्रत्येकी दोन ब्रिटिशकालीन जलवाहिन्या सध्या कार्यरत आहेत. या जलवाहिन्या जुन्या झालेल्या असल्यामुळे कधीही खराब होऊ शकतात, हे लक्षात घेऊन पर्यायी व्यवस्था म्हणून या जलवाहिन्यांलगत नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या पर्यायी जलवाहिन्यांची लांबी अनुक्रमे 4.9 किलोमीटर आणि 6.3 किलोमीटर अशी आहे. तर दोन्ही जलवाहिन्यांच्या व्यास हा अनुक्रमे 3 मीटर व 2.4 मीटर इतका आहे. या दोन्ही पर्यायी जलवाहिन्या टाकण्याचे काम सध्या अव्याहतपणे सुरू असून ही दोन्ही कामे निर्धारित वेळापत्रकानुसार अनुक्रमे वर्ष 2021  व वर्ष 2022 मध्ये पूर्ण होतील. या व्यतिरिक्त जलवाहिनी टाकण्याचे चौथे मोठे काम हे येवई ते चिंचवली यादरम्यान सुरू आहे. 4.5 किलोमीटर लांबीच्या व 3 मीटर व्यासाच्या या जल वाहिनीचे काम सध्या प्रगतीपथावर असून या कामाचे वैशिष्ट्य म्हणजे वैतरणा व अप्पर वैतरणा तलावातील पाणी मुंबईपर्यंत आणणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांना पर्याय म्हणून ही जलवाहिनी टाकली जात आहे. हे काम पुढील वर्षी पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. हेही वाचा -मावळमध्ये घडली भयंकर घटना, मधमाशांच्या भीषण हल्ल्यात एकाच मृत्यू तर जलवाहिन्या टाकण्याच्या 5 कामांपैकी पाचवे काम हे भांडुप संकुल परिसरात सध्या सुरू आहे. जलबोगद्याने येणारे पाणी हे भांडुप संकुल परिसरातील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी आणण्याची व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने तब्बल 4 मीटर व्यासाची आणि एकशे पाच मीटर लांबीची जलवाहिनी टाकण्याचे काम सध्या अव्याहतपणे सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर जलशुद्धीकरण केंद्र हे अधिक सक्षमतेने वापरणे शक्य होणार आहे. हे काम देखील निर्धारित वेळापत्रकानुसार पुढील वर्षी पूर्ण होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक काळजी त्याचबरोबर सदर काम करणाऱ्या कंत्राटदारांना यापूर्वीच देण्यात आलेल्या सूचनेनुसार संबंधित  कामगारांच्या राहण्या-खाण्याची सुयोग्य व्यवस्था ही कामांच्या निकटच्या परिसरात करण्यात आली आहे. तसेच सर्व कामगारांना मुखावरणे, हॅन्ड ग्लोव्हज नियमितपणे देण्यात येत आहेत. तसंच कामगारांच्या कामाच्या ठिकाणी व राहण्याच्या ठिकाणी नियमितपणे 'सॅनिटायजेशन' देखील करण्यात येत असून 'फिजिकल डिस्टन्सिंग'चे पालनही काटेकोरपणे करण्यात येत असल्याची खातरजमा नियमितपणे करवून घेण्यात येत आहे. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

Tags: BMC, Corona, Mumbai

पुढील बातम्या